Reading Time: 4 minutes

सन 2020 साली सुरू झालेली “अतुल्य भारत”  ही पर्यटनाला प्रोत्साहन देणारी मोहीम आठवतेय का? या मोहिमेमुळे भारतातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. आज पर्यटन व्यवसाय हा देशातील महत्वपूर्ण उद्योग असून त्याने आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 199.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सची भर टाकली आहे. सन 2028 पर्यंत हा आकडा 512 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर जाईल असा  इंडिया ब्रँड इक्विटी फाऊंडेशनचा अंदाज असल्याने  या दोलायमान क्षेत्रात गुंतवणुकीच्या विविध संधी आहेत. प्रवास आणि पर्यटन क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून यात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकेल. 

शेअर बाजाराने घेतली पर्यटन क्षेत्राची दखल

  • अलीकडेच राष्ट्रीय शेअरबाजाराने निफ्टी टुरिझम इंडेक्स इंडिया हा नवा निर्देशांक निर्माण केला असून तो निफ्टी 500 मध्ये समाविष्ट असलेल्या प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील 17 सर्वोत्तम कंपन्यांचा मागोवा घेईल.
  • ज्यांना अप्रत्यक्षपणे या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे ते याप्रकारच्या निर्देशांकात गुंतवणूक करणाऱ्या फंड योजना, इंडेक्स फंड, इटीएफ यात गुंतवणूक करू शकतात.

भारताची प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी : 

  • प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात भारताने उल्लेखनीय वाढ दाखवली आहे. देशाने आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये पसंती मिळवण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक वारसा, विशालता आणि ऐतिहासिक कलाकृतीच्या विविधतेचा खजिना देशी विदेशी पर्यटकांपुढे खुला केला आहे.
  • वर्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या सन 2024 च्या निर्देशांकानुसार भारताने दक्षिण आशियातील सर्वोच्च म्हणजे 39 वे स्थान प्राप्त केले असून सन 2021 मध्ये आपण 54 व्या स्थानावर होतो.
  • अल्पावधीतील ही प्रगती उल्लेखनीय आहे. प्रवास आणि पर्यटन हे मोठे उद्योग असून त्यात अनेक उप-उद्योग असल्याने पर्यटन वाढीतून त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होत असतो.
  • कोविड कालावधीनंतर यासंबंधीत उद्योगांच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली असून यातील हॉटेल आणि पॅकेज हॉलिडे व्यावसायिक आघाडीवर आहेत, त्यामुळे यातील समभागांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
  • पायाभूत सुविधांच्या विकासामुळे वाहतूक साधनांच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी जाता येणे सहज शक्य आहे. 
  • भारतातील लोकप्रिय “इझी ट्रिप प्लॅनर” या प्रवासी अँपच्या अहवालानुसार पर्यटन व्यवसायात म्हणजे “बुकिंग करून सहल” आयोजित करण्यात वार्षिक 26% वाढ अपेक्षित आहे. तर भारतातील एकूण प्रवास आणि पर्यटन उद्योगात 7.1% ची वार्षिक वाढ अपेक्षित आहे. 
  • सध्या या क्षेत्रांचे सकल राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) योगदान 6% असून सन 2029 पर्यंत हेच  10% हून अधिक असेल असा अंदाज आहे. 
  • याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, देशासाठी परकीय चलन मिळवणारा हा  तिसरा सर्वात मोठा उद्योग आहे. 
  • सन 2024 च्या अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून त्याचा चांगला परिणाम या उद्योगावर होईल. 
  •  हा एक वैविध्यपूर्ण क्षेत्र असून त्यास अनेक इतर उद्योगांची मदत मिळते. उदा.  पर्यटनासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्याने वाहतूक हा पर्यटन उद्योगाचा प्रमुख घटक आहे.

वाहतूक सेवा आणि सुविधा : 

विमान वाहतूक: विमान उद्योगात कमी किमतीच्या तसेच प्रिमियम सेवा उपलब्ध असून वाढत्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या मागणीमुळे त्यात वाढ होत आहे.

रेल्वे वाहतूक: भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठे नेटवर्क असलेली वाहतूक सेवा असून त्यामुळे दुर्गम भाग शहरांशी जोडला जातो. महाराजा एक्सप्रेस, राजधानी, राज्य राणी एक्सप्रेस यासारख्या गाड्या आरामदायी प्रवासानुभवाची पूर्तता करतात.

हॉटेल निवास: आलिशान हॉटेल, रिसोर्ट, होमस्टे अशी यात विस्तृत श्रेणी आहे. ताज, ओबेरॉय, मेरियेट सारखी प्रिमियम हॉटेल्सच्या साखळ्या महत्वाच्या शहरात असून अन्य परवडणारी हॉटेल्स उपलब्ध आहेत. ऑनलाईन बुकिंगची सोय असल्याने प्रवास सुलभ आणि सोयीप्रमाणे करता येणे ग्राहकांना शक्य झाले आहे.

टूर ऑपरेटर आणि ट्रॅव्हल एजन्सी: सहली आयोजित करण्यात लोकांच्या खास गरजेनुसार पॅकेज देण्यात त्याच्या राहण्या-फिरण्याच्या व्यवस्थेत समन्वय साधण्यात यांची मोलाची भूमिका आहे. “मेक माय ट्रिप”, “यात्रा”, “क्लिअर ट्रिप” सारख्या ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीजनी ही बाजारपेठ वाढवली आहे.

सांस्कृतिक आणि वारसा पर्यटन: भारतात अनेक नैसर्गिक, सांस्कृतिक स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, स्मारके आणि वन्यजीव अभयारण्ये आहेत. त्यामुळे देशाचा पर्यटन विभाग, देशात सांस्कृतिक धार्मिक पर्यटन सेवेचे उपक्रम राबवतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून स्वदेश दर्शन, प्रसाद यासारखे पर्यटनाला चालना देणारे उपक्रम राबवले जातात.

वैद्यकीय पर्यटन: स्पर्धात्मक किमतीत उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा आपल्याकडे उपलब्ध असल्याने अनेक रुग्ण केवळ उपचारासाठी आपल्या देशात येतात. त्यामुळे “वैद्यकीय पर्यटन” ही नवी संकल्पना उदयास आली आहे. चेन्नई, मुंबई दिल्ली ही शहरे वैद्यकीय पर्यटन केंद्रे म्हणून उदयास येत आहेत.

साहस पर्यटन: हिमालयातील ट्रेकिंग, उद्यानांमध्ये वॉटर राफ्टिंग, राष्ट्रीय उद्यानांमध्ये वन्यजीव सफारी यामुळे अनोखे साहसी अनुभवांच्या शोधात असलेले देशी विदेशी पर्यटक याकडे आकर्षित होऊ शकतात.

पर्यटन उद्योगावर प्रभाव पाडणारे घटक-

  • थेट परकीय गुंतवणूक- या व्यवसायात 100% थेट गुंतवणूक करण्यास परवानगी आहे. इतर क्षेत्रात आलेल्या थेट गुंतवणूकीतील 2.57% भाग यात आला आहे.
  • पायाभूत सुविधांचा विकास: यास प्रोत्साहन देण्याचे गेल्या अनेक वर्षांचे सरकारी धोरण असल्याने त्याचा या उद्योगाचा विकास होण्यास हातभार लागला आहे.
  • वाढती मागणी: लोकांचे राहणीमान उंचावत असल्याने क्रयशक्ती वाढत आहे. लोक नियमित पर्यटन करतात त्यामुळे हा व्यवसाय वाढण्यास हातभार लागत आहे.
  • सरकारी घोरण: सरकारचे धोरण पर्यटनास अनुकूल आहे. पर्यटन मंत्रालयाकडून देशी, विदेशी पर्यटकांसाठी स्वदेश दर्शन योजना चालू केल्या आहेत ज्या संपूर्ण व्यवसायास चालना देऊ शकतात.

एनएसई पर्यटन निर्देशांकातील 6 महत्वाच्या कंपन्या आणि त्यांच्या व्यवसायाचे महत्व-

  • इंटरग्लोब एव्हीएशन: इंडिगो या नावाने अनेक मार्गांवर विमान सेवा पुरवते नियमित उड्डाणे, रास्त दर ही याची वैशिष्ट्ये त्यामुळे या कंपनीला भविष्यात उज्वल संधी आहेत.
  • अपोलो हॉस्पिटल: सर्व प्रकारच्या प्रिमियम आरोग्य सेवा देणारी कंपनी. वैद्यकीय पर्यटनाचा सर्वाधिक लाभ या कंपनीस होऊ शकतो.
  • इंडियन हॉटेल आणि इआयएच हॉटेल: देशभरात प्रमुख शहरात यांची स्टार हॉटेल्स आहेत. आदरातिथ्य क्षेत्र आणि त्याला पूरक व्यवसाय करतात.
  • आयआरसिटीसी: भारतीय रेल्वे वाहतुकीशी संबंधित कंपनी असून ती वेगवेगळ्या सहली आयोजित करते. पर्यटनपूरक ट्रेन चालवते. पॅकेज टूर्स ठरवून देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत आहे. नुकत्याच त्यांनी भारत दर्शन सहली काढल्या असून त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
  • नारायण हृदयालय : विविध ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स हे यांचे वैशिष्ट्य अपोलो हॉस्पिटलप्रमाणेच नावारूपाला येत आहे.
  • या सहाही कंपन्या निफ्टी पर्यटन निर्देशांकाचा भाग असून गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना त्यांनी उत्तम परतावा दिला आहे.

उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखातील तपशिलासाठी स्टॉकएजवरून संदर्भ घेण्यात आला आहे. लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून ते संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून उल्लेख केलेल्या शेअर्सची कोणतीही शिफारस हा लेख करीत नाही)

#niftytourismindexIndia

#incredible India

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutes तुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…