‘मेडिकल टुरिझम’ म्हणजे दुसऱ्या देशात जाऊन आजारावर उपचार करून घेणे. अनेक देशांनी असे पर्यटन जाणीवपूर्वक वाढविले आहे. भारतातही असे पर्यटन वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र त्यासाठीचे विशिष्ट धोरण नसल्याने हा विषय पुढे जाऊ शकला नाही. आता लवकरच असे धोरण जाहीर होण्याची शक्यता असून त्याचा भारताला मोठा लाभ होईल.
आपल्या आजारावर चांगले उपचार मिळावेत, यासाठी अमेरिकेतून खासगी विमानाने बंगळूरला अलीकडेच एक रुग्ण आला. त्याला येथे आणण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये फक्त प्रवासावर खर्च झाले. हा रुग्ण हा श्रीमंत असेल, म्हणून खर्चाचा विषय बाजूला ठेवू. पण त्याला भारतात उपचार घ्यावे वाटतात, हे येथे महत्वाचे आहे. भारतातील आरोग्य व्यवस्था अमेरिकेपेक्षा चांगली आहे, हे येथे सिद्ध करावयाचे नाही. मात्र विकसित देशांची बरोबरी करू शकेल, अशा आरोग्य सुविधा भारतात निर्माण होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच भारतात उपचार करून घेणाऱ्या विदेशी नागरिकांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत चालली आहे. जगात ‘मेडिकल टुरिझम’ असे नाव त्याला देण्यात येते. भारतीय मानसिकतेत ही बाब बसणारी नसली तरी असा विचार करणारे अनेक देश जगात असून ते या प्रकारे परकीय चलन मिळवीत आहेत. शिवाय, वैद्यकीय क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत व्यावसायीकरण झाले आहे, हे आपण नाकारू शकत नाही. ही सर्व स्थिती आणि भारताने या क्षेत्रात मिळविलेले यश लक्षात घेता ‘मेडिकल टुरिझम’ वर भर देण्याचा स्वागतार्ह निर्णय सरकारने घेतला आहे.
‘मेडिकल टुरिझम’ ची गरज का ?
अमेरिका आणि युरोपमध्ये आरोग्याच्या सुविधा फार चांगल्या आहेत आणि प्रत्येक जण मेडिकल इन्शुरन्स काढत असल्याने तेथे त्यांना वैद्यकीय उपचाराचा फारसा खर्च येत नाही, हे आपण ऐकून आहोत. पण त्यामुळे तेथील वैद्यकीय उपचार प्रचंड महाग झाले आहेत आणि तेथे आजारी पडले की डॉक्टरची लगेच भेट मिळत नाही, त्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते, हेही आपण ऐकले आहे. त्यामुळेच अनिवासी भारतीय जेव्हा भारतात येतात, तेव्हा त्यांचा येथे इन्शुरन्स नसतानाही ते येथे उपचार करून घेतात, असे आपण पाहिले आहे. कारण विकसित देशांपेक्षा भारतात अतिशय स्वस्तात आणि अर्थातच चांगले उपचार होतात, असे त्यांना वाटते. ‘मेडिकल टुरिझम’चा सरकार गंभीरपणे विचार करते आहे, याचे हेच कारण आहे. अर्थात, सध्या अनेक विदेशी नागरिक भारतात येवून उपचार करून घेतातच, पण त्याचे स्वरूप संघटीत नसल्याने त्याविषयीची खात्रीशीर माहिती मिळू शकत नाही. हीच गोष्ट ठरवून केली आणि त्यात येणारे अडथळे दूर केले तर भारतासाठी एक नवे दालन खुले होईल, यासाठी ‘मेडिकल टुरिझम’ चे धोरण राबविले जाणार आहे.
हे ही वाचा – प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्णसंधी
विकसित देश महागडे
आयुर्वेद उपचार ही भारताने जगाला दिलेली देण आहे. त्याच्याकडे जग आकर्षित झाले आहे. त्यामुळेच काही भारतीय वैद्य अनेक देशात उपचार करतात. मात्र आयुर्वेद उपचारांचे प्रमाणीकरण झाले नाही, म्हणून त्याला एक शास्त्र म्हणून काही देशांमध्ये मान्यता मिळालेली नाही. आयुर्वेदाचे संशोधन झालेल्या तसेच एक उपचार पद्धती म्हणून अधिक स्वीकार झालेल्या केरळमध्ये त्याचा वापर अधिक आहे. अनेक विदेशी नागरिक केरळमध्ये आयुर्वेद उपचारांसाठी येतात तसेच त्याचे महत्व लक्षात घेवून अनेक जण तेथे आयुर्वेदाचे शिक्षण घेवून परदेशात वैद्य म्हणून काम करत आहेत. पण भारतातील ‘मेडिकल टुरिझम’ हा काही केवळ आयुर्वेदापुरता मर्यादित असणार नाही. तर तो अॅलोपथी उपचारासाठीही असणार आहे. त्याचे कारण विकसित देशात महागडी ठरणारी वैद्यकीय सेवा, भारताचे समतोल हवामान आणि आधुनिक वैद्यकीय सेवांबाबत भारताने अलीकडील काळात केलेली प्रगती. शिवाय जगाला औषधांचा पुरवठा करणारा भारत एक प्रमुख देश असल्याने भारतात ती तुलनेने स्वस्त आहेत.
८० अब्ज डॉलरची उलाढाल
भारतीय पर्यटन खात्याच्या एका अभ्यासानुसार २०१६ मध्ये भारतात उपचार घेण्यासाठी सुमारे सव्वा लाख विदेशी नागरिक आले होते, ही संख्या २०१९ मध्ये सात लाख झाली होती. पण कोरोना साथीमुळे ही संख्या २०२० मध्ये पावणे दोन लाख इतकी कमी झाली. आता कोरोनाचे संकट दूर झाल्याने असे रुग्ण येण्यास पुन्हा सुरवात झाली आहे. यावरून या क्षेत्राला संघटीत करून ‘मेडिकल टुरिझम’ धोरण राबविले जाणार आहे. इतर देशात उपचार करून घेण्यास जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून त्यात सुमारे ८० अब्ज डॉलरची उलाढाल होते. सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांनी ‘मेडिकल टुरिझम’ ला संघटीत रूप देऊन यातील मोठा वाटा आपल्याकडे घेतला आहे तर मेक्सिको, ब्राझील आणि तुर्कस्ताननेही त्यात चांगला जम बसविला आहे. यातील मोठा वाटा घेण्याची क्षमता भारतात असूनही त्यासाठीचे सरकारी धोरण निश्चित झाले नसल्याने तो आज मिळू शकत नाही. नेमकी हीच त्रुटी आता दूर होणार आहे.
‘मेडिकल टुरिझम’चे विविध पैलू
आगामी काळात सरकारकडून ‘मेडिकल टुरिझम’ विषयीचे धोरण जाहीर होईल. त्याचे काही पैलू असे- १. पर्यटन, आरोग्य, हवाई वाहतूक, वाणिज्य आणि आयुष विभाग एकत्र येवून या धोरणात योगदान देतील. २. देशातील चांगली रुग्णालये त्यासाठी निवडली जातील, त्यांना दर्जा प्रदान करण्यात येईल आणि त्यासंबंधीची सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध असेल. ३. आयुर्वेद, योगा आणि नॅचरोपथी भारताचीच असल्याने त्याचा जगात स्वीकार वाढेल, असे प्रयत्न केले जातील. ४. इन्क्रेडिबल इंडिया अंतर्गत ‘हिल इन इंडिया’ अशी मोहीम हाती घेतली जाईल, ज्यात भारतात या क्षेत्रात स्वस्तात उपलब्ध असलेल्या सेवासुविधांचा जगभर प्रचारप्रसार केला जाईल. ५. आयुष व्हिसा सुरु करण्यात येईल, म्हणजे उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांना प्राधान्याने व्हिसा मिळेल तसेच त्याच्या नोंदी ठेवणे शक्य होईल. सध्या अशा रुग्णांना प्रवासी व्हिसावर भारतात यावे लागते. ६. विकसित देशात डॉक्टरांची भेट घेण्यास बरीच प्रतीक्षा करावी लागते, ही तेथील त्रुटी लक्षात घेवून फोनवर उपचार सल्ला देण्याच्या सेवेला जागतिक व्यापार संघटने (डब्ल्यूटीओ) कडून मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. ७. विकसित देशांमध्ये भारतीय वैद्यकीय पदव्यांना मान्यता नाही, मात्र भारतीय डॉक्टर जगात अतिशय निष्णात मानले जातात. ही स्थिती लक्षात घेता भारतातील वैद्यकीय पदव्यांची मान्यता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ८. ‘मेडिकल टुरिझम’ ची भारतातील उलाढाल सध्या (२०१९) पाच ते सहा अब्ज डॉलर आहे, ती २०२६ पर्यंत १३ अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. ‘मेडिकल टुरिझम’ मध्ये भारत आज जगात साधारण सहाव्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा – Travel Insurance: प्रवास विम्याच्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
शेतीला अनुकूल हवामान आणि सुपीक जमिनीचे अधिक प्रमाण, यामुळे भारत हा जगातील अनेक देशांना धान्य पुरविणारा देश आहे आणि तो या क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतो. कारण शेती करणाऱ्यांचे प्रमाण अजूनही भारतात अधिक आहे. त्यासंबंधीच्या सरकारी धोरणात सुधारणा झाली तर शेती निर्यात वाढते आहे, असे गेल्या काही वर्षांत लक्षात आले आहे. तोच धडा ‘मेडिकल टुरिझम’ बाबतही उपयोगी ठरणार आहे. कारण कुशल मनुष्यबळ, हवामान, वैद्यकीय पायाभूत सुविधा, औषधांची निर्मिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयुर्वेद, योगा आणि नॅचरोपथीचा उगमच भारत असल्याने मिळणारा फायदा, अशा सर्व बाजूंनी ‘मेडिकल टुरिझम’ ला मोठी संधी आहे.
२८ जुलै २०२२ अखेर गुंतवणूक करण्यासाठीच्या चांगल्या फार्मा कंपन्या –
कंपनीचे नाव | २७ जुलैचा भाव
(रुपये) |
बाजारमूल्य
(कोटी रुपये) |
तीन वर्षांतील परतावा |
sun pharma | ८८० | २,०८,५९८ | ९८ टक्के |
cipla | ९६७ | ७७,७४५ | ७९.३१ टक्के |
Divis Labs | ३७२० | ९८,२०७ | १४५ टक्के |
Granules India | २९६ | ७,३३७ | २४६ टक्के |
Abbott India | १९,५१९ | ४१,१८१ | १०१ टक्के |
Aurobindo Pharma | ५३० | ३१,१३६ | -२३ टक्के |
Zydus Lifesciences | ३५० | ३४,८७८ | -५८ टक्के |