“मार्केट जोरात वर चाललंय सर, ही युलिप पॉलिसी घ्या, फायद्यात रहाल..”
“मार्केट’ भरपूर खाली गेलंय साहेब, ही युलिप पॉलिसी घ्या, स्वस्तात मिळतील युनिट्स..”
“अलाणा फलाणा प्लॅन कायमचा बंद होतोय..आताच घेऊन टाका, नंतर मिळणार नाही..”
“अमका तमका प्लॅन नवीन आलाय.. आधी कधीही नव्हता, घेताय ना?”
अशी अनेक एकमेकांविरोधी विधाने बेधडकपणे करणाऱ्या, गळेपडू मार्केटिंगचे किंग असलेल्यांकडून काल एक नवीन ‘फंडा’ ऐकायला मिळाला.
“पॉलिसीहोल्डर्सना ‘IPO’ मधे स्पेशल Quota आहे बरं का साहेब, पॉलिसीहोल्डर्स नसाल, तर घेऊन टाका एखादी पॉलिसी..”
‘LIC’ चा ‘IPO’.. मी काय करेन?
- ‘Life Insurance Corporation Of India’ म्हणजेच LIC च्या बहुचर्चित ‘IPO’ ची कोणतीही महत्वाची माहिती उदा. आकारमान, तारीख वा किंमत पट्टा ई. आजमितीस जाहीर झालेली नसताना त्याबद्दल कोणताही अंदाज बांधणे चुकीचे आहे, याची कल्पना असूनही मला स्वतःला एक छोटा गुंतवणुकदार म्हणून या इश्युकडून फारशा अपेक्षा नाहीत, हे मी आधीच सांगतो.
- मुळात ‘बाजारभाव’ हा मागणी व पुरवठा यांच्यावर अवलंबून असतो हे जिथे स्पष्ट आहे तिथे कोट्ट्यावधींच्या संख्येने असलेल्या पॉलिसीधारकांनी (हा ही एजंट्स लोकांचा अभिमानाचा मुद्दा) आधीच ‘स्पेशल कोट्यातून’ शेअर्स मिळवले, तर खुल्या बाजारातून वाढीव दराने शेअर्स कोण घेणार?
- हे मान्य, की पॉलिसीहोल्डर्सकरीताचा कोटाही मर्यादित आहे, कदाचित सर्वांनाच त्यातून शेअर्स मिळणारही नाहीत, परंतु एकुणांत या ‘आयपीओ’चा अगडबंब आकार बघता याप्र्कारे भागधारक कोट्यातून शेअर्स मिळविणाऱ्या किरकोळ गुंतवणुकदारांची संख्याही फार मोठी असेल, त्या मानाने या कोट्यात स्थान न मिळणारी मंडळी नगण्यच असतील.
- निदान सध्यातरी आयपीओच्या लिस्ट होण्याच्या वेळी आलेली बाजारभावातील उसळी ही सर्वसामान्य, किरकोळ गुंतवणुकदारांच्या ‘FOMO’ ( Fear of Missing Out) अथवा ‘कोणत्याही परिस्थितीत मला हा शेअर हवाय’ या पाठलागू वृत्तीतून आलेली दिसते आहे.
- यामुळे मध्यम वा छोट्या आकाराचे व त्यातही किरकोळ गुंतवणुकदारांना कमीत कमी कोटा असलेल्या ‘आयपीओ’चे भाव वाढताना दिसतात.
- याउलट आकाराने मोठ्या ‘आयपीओ’मध्ये संस्ठागत गुंतवणुकदारांच्या बेभरवशी वर्तनामुळे काय होते, ते आपण ‘PayTm’ मधे अनुभवतो आहोतच.
- ‘LIC’ ही कंपनी जुनी आहे, या कंपनीने कमावलेला विश्वास व नावलौकिक (Goodwill) प्रचंड आहे, व्याप्ती पार खेडोपाडी आहे. हे खरे असलेही, तरी प्राप्त माहितीनुसार भारत सरकार या इश्युमार्फत मालकीच्या केवळ 10% निर्गुंतवणुक करणार आहे.
- त्यामुळे या कंपनीचे व्यावसायिक दृष्टिने कितीही व्युहात्मक (strategic) महत्व असले, तरी कंपनीतील निर्णायक हिस्सा (Controlling Stake) दृष्टिपथांत येईपर्यंत कोणीही बडी देशी वा विदेशी वित्तीय संस्था या इश्यूमध्ये फार रस दाखवतील, असे मानावयाचे कारण नाही.
- बाकी ‘आमची कंपनी सरकारी आहे’ हे कारण एखाद्या अज्ञानी, छोट्या गुंतवणुकदाराला पॉलिसी विकायलाच छान असते. बड्या गुंतवणुकदारांना कंपनीच्या शेअर्सचा इश्यू विकायला नाही.
- आजच्या घडीला आपल्या बाजारात व्यवहार होणाऱ्या एकाही सरकारी कंपनीला तिच्या खासगी स्पर्धक कंपनीपेक्षा अधिमुल्य मिळाले आहे, असे उदाहरण नाही. मग ती कंपनी कोणत्याही क्षेत्रातील असो, हा मुद्दा गुंतवणुकदारांनी लक्षांत ठेवायला हवा.
- कंपनीत वारंवार होणारा सरकारी,अनाठायी हस्तक्षेप, व्यवस्थापनातील भोंगळ कारभार, कामगार संघटनांचा त्रास आणि गेले काही वर्ष दिवसेंदिवस खासगी कंपन्यांकडून हिसकावला गेल्याने सतत कमी होणारा विमा बाजारातील हिस्सा, याकडे पहाता या कंपनीच्या शेअरला खूप काही भव्यदिव्य किंमत मिळेल आणि जागतिक कीर्तीच्या वित्तीयसंस्था हा शेअर ‘मिळेल त्या किंमतीला’ विकत घ्यायला रांग लावून उभ्या रहातील, हा वेडा आशावाद ते एजंट्सच करु जाणोत.
- या महा आयपीओच्या गदारोळावरुन मला मी या व्यवसायात नवीन असतानाच्या, 25 एक वर्षांपूर्वीच्या सरकारकडून अशाच एका प्रतिष्ठेच्या बनविल्या गेलेल्या आयपीओची आठवण झाली.
- ते बहुधा 1993 साल असावे. ‘निर्गुंतवणुक’ हा शब्द तेव्हा आजच्या ‘व्हॅक्सिनेशन’ या शब्दासारखाच नवीन पण सर्वप्रचलित झाला होता.
- अशात केंद्रसरकारने त्यांच्या ताब्यात असलेल्या, ‘LIC’ सारख्याच महत्वाच्या ‘Industrial Bank Of India’ ऊर्फ ‘IDBI’ चे खासगीकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याकाळचा न भूतो असा सर्वात मोठा, 2000+ कोटींचा ‘IPO’ म्हणून ‘IDBI’ बाजारात उतरली.
- उदारीकरणामुळे दिसू लागलेले भारतीय अर्थव्यवस्थेचे दैदिप्यमान भविष्य, त्यात भारताच्या औद्योगिकिकरणाचा कणा असलेली आयडीबीआय, प्रचंड मोठी ग्राहक यादी, अशी बलस्थाने पहाता ह्या इश्यूवर जागतिक वित्तीय संस्थांच्या उड्या पडतील, असा इश्यूच्या व्यवस्थापकांनी दणकून प्रचार केला होता.
- त्यावेळी आजच्यासारखा वायदेबाजार (F&O) नव्हता तर शेअर्सचे ‘A’ आणि ‘B’ व अन्य गट असत. ‘अ’ गटांतील शेअर्सना दहावीत बोर्डांत आलेल्या विद्यार्थ्थ्यांचा मान असे. हा ‘IDBI’ चा शेअर पहिल्याच दिवशी ‘A’ गटांत सामील होईल, असे जाहीर करण्यात आले. असा पराक्रम करणारा बाजाराच्या इतिहासांतील तो पहिलाच शेअर होता.
- मात्र इश्यू जाहिर करतानाचा व्यवस्थापक मंडाळींचा उत्साह नंतर कमी कमी होऊ लागला आणि इश्यू चालू व्ह्यायच्या काही दिवसच आधी, बहुधा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने, तांत्रिक कारणे देऊन हा आयपीओ पुढे ढलकण्यात आला.
- शेवटी काही काळाने ह्या इश्यूची भागविक्री 130 प्रति शेअर (चुभुद्याघ्या) अशी करण्यात आली होती. इश्यूला जेमतेम प्रतिसाद मिळाला आणि सहाजिकच त्याची निराशाजनक भावाने नोंदणी झाली. पुढे बराच काळ यातील गुंतवणुकदार चांगल्या परताव्याच्या (Returns) प्रतिक्षेत होते.
- मंडळी, भारतीय आयुर्विमा महामंडळाबद्द्ल माझ्या मनांत नेहमीच आदराची भावना आहे. ती देशाच्या प्रगतीची साक्षीदार असलेली एक महत्वाची संस्था आहे हे निर्विवाद, पण शेअरबाजार हा आंधळ्या प्रेमावर, खरेतर भय व लोभ (Fear & Greed) वगळता कोठल्याच भावनेवर चालत नाही. तेथे ‘भाव भगवान है’ हे तत्व कसोशीने पाळले जाते, ‘बाप दाखव नाहीतर..’ अशा सत्यशोधक बाण्याने पै पै कमविण्यासाठी अक्कल आणि घाम गाळावा लागतो.
तेव्हा ‘LIC’ ही या भूतलावरील कोणताही कमकुवतपणा वा दोष नसलेली, सर्वांचे कल्याण करणारी एकमेवद्वितिय संस्था आहे, अशी आंधळी श्रद्धा बाळगणाऱ्या भक्तांकडून मिळणारा –
“LIC चे शेअर्स मिळायला हवेत तर, पॉलिसी आहे का ते पहा (शक्यतो नवीनच घ्या)” या सल्ल्यामुळे नवीन विमा पॉलिसी काढणे, म्हणजे, एरवी काहीही उपयोग नसलेली गळ्यातील घुंगुरमाळ फुकट मिळते म्हणून म्हैस विकत घेण्यासारखे आहे. बाकी मी अन्यवेळी अनेकदा लिहिलेला ‘The greater fool theory’ खेळ या ‘IPO’त ही असेलच, मात्र ‘हम जहां खडे रहे थे..लाईन वहा पर खतम हुई..’ असे होऊन आपण एखाद्याला मूर्ख बनविण्यासाठी आपल्यानंतर कोणीच शिल्लक नाही असे होणार नाही, (जे PayTm मधे झाले) याची काळजी घ्यावी.
ज्या प्रमाणे ‘LIC’ नेहमी ‘जीवन के बाद भी’ आम्ही असू, अशी खात्री देते, मीही खात्री देतो की ‘LIC’ चे शेअर्स घ्यायचेच असतील, तर ते ही ‘लिस्टींग के बाद भी’ असतीलच की, घाई कशाला?
-प्रसाद भागवत
(टीपः गेले काही दिवस ‘LIC’ उर्फ आयुर्विमा महामंडळातर्फे या आयपीओची पूर्वतयारी म्हणून त्यांच्या ग्राहकांनी आधी नसल्यास डिमॅट अकाउंट उघडावे असा प्रचार केला जात आहे. या IPO संदर्भांत माझा नवीन पॉलिसी घ्येण्याबाबत आक्षेप जरुर आहे. परंतु, हा ‘डिमॅट अकाउंट उघडावे’ हा सल्ला मात्र अतिशय योग्य असून ज्यांचे अकाउंट नाही, त्यांनी तो लगेच अंमलात आणावा.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies