Loan Against Property
मालमत्तेवर मिळणाऱ्या कर्जाबद्दल (Loan Against Property) माहितीपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. आजच्या लेखात आपण या कर्ज प्रकाराबद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत.
“आता तर मला एमएस करायला जाऊ द्याल ना बाबा”, आज शाल्मलीने हातातली ट्रॉफी मिरवत तिच्या बाबांना विचारले.
तिच्या बाबांच्या चेहर्यावरून लेकीबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. मात्र काही क्षणात त्याची जागा चिंतेने घेतली. आपण तर तिला असे वचन दिले की जर नंबर मिळवलास तर जा एमएस करायला. एकतर एकुलती एक लेक आपल्या डोळ्यासमोर वाढलेली तिला दूर सोडणे नकोसे झालेले. त्यात एवढा खर्च देखील परवडणारा नव्हता.
त्यावरही त्यांच्या लाडक्या शाल्मलीने पर्याय काढला. ती म्हणाली, “तसं पण तुम्ही आता निवृत्त झाला आहात. आपण तिघेही जावूया तिकडे. म्हणजे तुम्हाला पण काळजी नाही आणि मला पण घरचे जेवण मिळेल”
तसे तर परदेशात जायचे स्वप्न प्रत्येक मध्यम वर्गीयाप्रमाणे त्यांनी पण पहिले होते. मात्र आता शाल्मलीला एकटीला पाठवण्याइतके सुद्धा पैसे नसताना तिघांनी कसे जायचे हा यक्षप्रश्नच होता. त्यामुळे तिचे बाबा तिला म्हणाले, “बेटा इतके पैसे जमवणे कठीण आहे, बघू काहीतरी.”
तिने यावरही उपाय शोधून ठेवला होता. “बाबा आपण आपल्या बंगल्यावरती कर्ज काढूया. तुम्हाला मिळणार्या पेन्शन मध्ये दोन वर्षांचे हफ्ते भरून आपण आरामात तिकडे दिवस काढू शकतो. नंतर तर माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण पूर्ण कर्ज लवकर फेडून टाकू.”
तिची कल्पना उत्तम असली तरी तिच्या बाबांना असे कर्ज घेण्याबाबत खात्री वाटत नव्हती. मग काय दोघांनी मिळून बँकेत कर्ज विभागामध्ये काम करणाऱ्या तिच्या लाडक्या काकाला -वैष्णवला फोन लावला.
भावाच्या सगळ्या शंका समजल्यावर काकाने माहिती सांगायला सुरुवात केली-
हे नक्की वाचा : वैयक्तिक कर्ज का, कधी आणि कशासाठी?
Loan Against Property: मालमत्तेवर मिळणारे कर्ज
- एखाद्या व्यवसायासाठी जागा घ्यायची आहे, लग्नासाठी पैसे लागत आहेत, उच्चशिक्षणासाठी लागणारा खर्च इ. कोणत्याही वैध कारणासाठी आपल्या कोणत्याही मालमत्तेवर कर्ज काढता येते.
- वर्षाला 8.8 टक्के इतक्या कमी व्याजदरापासून आपल्या मालमत्तेवर वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणासाठी कर्ज घेता येते. अर्थात त्याला नियम व अटी लागू आहेत. त्याचा कालावधी 15 ते 20 वर्षांपर्यंत इतका मोठा निवडता येतो आणि हे कर्ज आपण सुलभ हप्त्याने फेडू शकतो.
आता तुम्हाला असलेले गैरसमज दूर करतो, काका पुढे सांगू लागला –
१. आपले घर तारण म्हणून ठेवण्यापेक्षा अन्य ठिकाणाहून जास्त व्याजदराने कर्ज घेणे –
- आपल्याकडे घर तारण ठेवण्याशिवायही आणखी पर्याय आहेत ज्यामुळे आपल्याला कर्ज मिळू शकते.
- घर अथवा आपली कोणतीही मालमत्ता तारण ठेऊन आपणास बाकीच्या कर्जाच्या तुलनेत जास्त कर्ज तेही कमी व्याजदराने मिळू शकते.
- आपल्याकडून जर नियमित हफ्ते फेडल्या जाणार असतील तर मालमत्ता तारण ठेवल्याने काहीही अडचण येत नाही. कारण कर्ज कसेही घेतलेले तरी त्यात आपण कर्जाचे हफ्ते नियमित भरणे गरजेचेच असते.
२. तारण ठेवलेली मालमत्ता आपणास वापरता येत नाही –
- हा निव्वळ गैरसमज आहे. कर्जाच्या संपूर्ण काळात आपण तारण ठेवलेली मालमत्ता वापरण्याचा आपणास हक्क आहे.
- आपणास कर्ज फेडणे शक्य न झाल्यास ती मालमत्ता संबंधित कर्ज दात्यांच्या ताब्यात जाते. अशा प्रकरणात कर्ज देणार्या संस्थेस ती मालमत्ता विकून निधि मिळवण्याचा अधिकार असतो.
३. मालमत्तेच्या मूल्या इतके कर्ज मिळते –
- आपण तारण ठेवलेल्या मालमत्ते इतके मूल्य आपल्याला कधीच मिळत नसते.
- वित्त संस्था आपणास मालमत्ता मूल्याच्या 70% ते 90% कर्ज उपलब्ध करून देतात, अर्थात नेमकी किंमत ही मालमत्तेच्या पुनर्विक्री मूल्यावर आणि वित्तीय संस्थेच्या धोरणांवर अवलंबून असते. म्हणूनच आपणास मालमत्ता तारण ठेवायची असेल तर त्याच्या किमतीचा अंदाज काढून त्याप्रमाणे आपणास मिळणार्या कर्जाच्या रकमेचा अंदाज येईल.
महत्वाचा लेख: कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी
४. फक्त निवासी मालमत्तेवर कर्ज मिळते –
- हे देखील अगदी चुकीचे आहे. आपली कोणतीही मालमत्ता मग ती निवासी असो अथवा व्यावसायिक असो आपण त्यावर कर्ज काढू शकता.
- आपल्या कोणत्याही वैध कारणासाठी आपल्या मालकीच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर कर्ज काढू शकतो.
५. कर्जासाठी आपले उत्पन्न उत्तम असणे गरजेचे आहे –
- आपले कर्ज मंजूर होणे हे आपल्या उत्पन्नावर आधारित असते. कारण यावरूनच आपण कर्ज परतफेड करू शकता हे समजते.
- असे जरी असले तरी आपण जर कर्जाची परतफेड करण्याचे प्रयोजन कसे करणार आहात दाखवू शकलात, तर या कारणामुळे आपणास कर्ज मिळण्यास मुळीच अडचण येणार नाही.
६. मालमत्तेवरील कर्जावर उच्च व्याज लागते –
- मालमत्तेवर मिळणार्या कर्जाचा व्याजदर हा आपण निवडलेली वित्त संस्था, आपला क्रेडिट स्कोअर, आपल्या मालमत्तेची अवस्था इ. वर अवलंबून असतो.
- मालमत्तेवर मिळणार्या कर्जाचा व्याजदर हा परवडणारा ठेवलेला असतो. फक्त आपण आपला क्रेडिट स्कोअर चांगला ठेवायचा आणि आपली मालमत्ता देखील सुस्थितीत ठेवायची.
“झाल्या का सगळ्या शंका दूर?” काकाने विचारले. काकाला त्या दोघांच्या चेहर्यावरच उत्तर मिळाले. स्वप्न पूर्ण होणार म्हणून शाल्मलीची कळी खुळलेली होती, तर तिचे बाबा देखील तिच्या भविष्यासाठी उत्तम निर्णय घेण्यास अडसर येणार नाही म्हणून समाधानी होते.
हे झाले एक उदाहरण मात्र आपणास बर्याच वैयक्तिक अथवा व्यावसायिक कारणासाठी लागणार्या कर्जासाठी आपल्या मालमत्तेवर कर्ज घेणे हा उत्तम पर्यायांपैकी एक आहे आणि ते घेताना मनात येणार्या शंकांचे निरसन आम्ही आजच्या लेखात करायचा प्रयत्न केलाय. हा लेख आपल्याला आणि आपल्या जवळच्या मालमत्तेवर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना खात्रीशीर मदत करेल. आमच्या अभ्यासपूर्ण लेखांवर आलेला प्रतिसाद आमच्यासाठी नेहमीच अमूल्य असतो.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Loan Against Property Marathi Mahiti, Loan Against Property in Marathi, Loan Against Property Marathi, Loan Against Property ghyave ka