Millennials …बरोबर ना ? नव्वदीच्या दशकात जन्मलेली पिढी त्यांनाच म्हणतात ना Millennials ?
मग मी पण त्याच पिढीचा. माझ्यासारखे त्या दशकात पूर्वार्धात जन्मलेल्या बहुतांश लोकांचे आता दोनाचे चार हात झालेले आहेत, ठरलेले आहेत किंवा एखाद दोन anniversary पण होऊन गेलेल्या आहेत. पूर्वार्ध कशाला त्याच पिढीच्या उत्तरार्धातील सुद्धा मुली आता लग्नाच्या उंबरठ्यावर असतील. आमच्या आधीच्या पिढी मधे म्हणजे ८० च्या दशकात आणि आधी लग्नानंतर नोकरी करणाऱ्यांची संख्या कमी होती, त्यामुळे जो काही आर्थिक कारभार चालायचा तो पुरुषांच्या हातात. पण आमच्या पिढीने तो बदल पाहिला आधी स्व कर्तुत्व म्हणून आणि आता गरज म्हणून काम करणारी हवी अशी अपेक्षा च झाली. आता जवळपास प्रत्येक घरात दोन ऐवजी चार हात काम करतात. त्यामुळे कस ? गरज आणि चंगळ दोन्ही सुलभ होते. एखाद दोन वर्षात बचत आणि गुंतवणूक करणारे आणि न करणारे सगळे लोक यथाशक्ती, यथामती बचत वैगे बद्दल विचार करतात. हा संसार त्यांना सगळं शिकवतोच.
मी आणि माझ्या बॅच च्या लोकांमधे गप्पा मारताना एक गोष्ट निरीक्षणात आली ती म्हणजे प्रत्येक जोडीची खर्च, बचत, गुंतवणूक याची पद्धत वेगवेगळी असते. ती उत्पन्न, आवड, निवड यावर ठरते. बऱ्याच जोड्या अशा पाहण्यात आल्या की नवरा बरेच खर्च करतो जसं की घरखर्च, प्रवास, औषध गोळ्या, विमा हफ्ते, EMI आणि किमान एक पगार तरी बाजूला पडावा म्हणून बायकोचा पगार हा FD, SIP मधे टाकला जातो आणि त्याच पण हिशोब नवऱ्याकडेच असतो. बहुतांश लोकांना ही पद्धत छान वाटते कारण ती सोयीची आहे. पण त्याचे फायद्यापेक्षा जास्त तोटे आहेत अस मला वाटत. समजा वरचं च उदाहरण पाहिलं की टॅक्स साठी लागणारी सोडून बाकी बचत बायको कडे आणि एमी हफ्ते नवऱ्याकडे. त्याचे दीर्घकालीन तोटे आपण पाहू-
१. खर्चाचा अंदाज ~ आपल्याला महिन्याला किती खर्च येतो, किराणा, गॅस, भाजी कधी संपते, ती कधी, किती आणावी आणि साठवावी लागते. हे सगळ एका पार्टनर ला व्यवस्थित माहित होईल आणि दुसऱ्याला इतका अंदाज नसेल किंवा गांभीर्य नसेल
२. बचत गुंतवणुकीचा अंदाज ~ आपले किती पैसे कशात आहेत, सध्या व्याजदर काय आहे ? मार्केट कुठे जातंय ? याचा जमाखर्च काय आहे ? आपली कोणती गुंतवणूक फायद्यात आहे हे देखील एकाच पार्टनर ला माहित होईल.
३. इगो प्रॉब्लेम ~ नवरा बायको म्हणल की खुस्फुस होणार च. थोडी फार खुसफुस झाली आणि चुकून एखादा शब्द जिव्हारी लागणारा बोलला गेला खर्च आणि पैसा यावरून तर कायमचा वाद होण्याची शक्यता जास्त.
४. देव न करो ~ उद्या दोघांपैकी एकाला दुर्धर आजार झाला, अपघात झाला, अकाली निधन झालं तर उरलेल्या पार्टनर ला दोन्ही गोष्टी सांभाळायला वेळ लागेल. घटस्फोट झाला तर ज्याच्याकडे काहीच बचत नाही त्याच जगणं कठीण आहे.
मग यावर उपाय काय ?
मुद्दाम टोकाची तफावत असेलेल उदाहरण घेतो.
नवऱ्याचा पगार १ लाख आणि बायकोचा १० हजार. स्वाभाविक आहे सगळे खर्च, हफ्ते, विमा, गुंतवणूक हा नवरा करेल आणि म्हणेल की ते १० हजार तुला तुझ्या खर्चाला किंवा बचत म्हणून राहू दे. पण त्यातला एखादा टक्का जबाबदारी त्याने बायको कडे दिली ते हे सगळ जमाखर्च चक्र कस चालत यात तिला सामावून घेतलं आणि जबाबदारी दिली तर तिला ज्ञान आणि आवड दोन्ही निर्माण होईल. उद्या नवऱ्या कुठे कामात असेल तर ती या गोष्टी एखाद वेळी करू शकते. हे प्रमाण नवरा बायको आणि त्यांचा उत्पन्न याच्या प्रमाणात बदलता येऊ शकत.
दोघांनी मिळून अजून अशा काही गोष्टी करता येतील का ज्याने प्रत्येक गोष्टीत दोघांचं सहभाग वाढेल…
१. जमा खर्चाची यादी एकत्र करणे
महिनाभरात करायचे खर्चाची यादी एकत्र बसून करणे किंवा किमान दुसऱ्या पार्टनर ला नजरेखालून घालण्यास देणे ( मग किराणा ची यादी बायको ने केलेली असेल आणि इतर खर्चाची नवऱ्याने केलेली असेल तर ती एकमेकांना देणे). याने काय होत पहिलं म्हणजे स्पष्ट यादी केली की विसरायचं प्रमाण कमी होत आणि दुसऱ्या पार्टनर ला त्यात काय बदल करावे वाटले तर त्याला विचारात घेणे आणि विचारात पाडन होत.
२. नव्या डिजिटल गोष्टी ची सवय
आमच्या कडे खूप वेळा आम्ही सामान बिग basket किंवा तत्सम ॲप वर मागवतो, ते कसे काम करते, तिथली क्वालिटी, वेळ, charges हे बायकोला माहीत असतात पण एखाद वेळी ते मी मुद्दाम करतो मला त्याची सवय व्हावी म्हणून. आणि SIP, Online RD FD हे मी करतो पण काही काही SIP बायको ला ठरवायला देतो म्हणजे तिला पण ते ॲप कस काम करत, कोणत्या दिवशी कधी पैसे गुंतवले म्हणजे आपल्याला फायदा होतो, कोणते funds कसे चालू आहेत हे लक्षात येतं.
३. पासवर्ड व्यवस्थापन
ऑनलाईन शॉपिंग, net banking, UPI, investment हे सगळ करताना प्रत्येक माणसाचे किमान १५-२० पासवर्ड आजकाल असतात, विचार करा की नवरा कामात आहे, बिझी आहे, त्याचा फोन बंद पडला आहे, तो admit आहे किंवा त्याच काही बर वाईट झालं आहे. तर त्याचे असलेले पैसे जे emergency मधे काढता तरी यायला हवेत. त्यासाठी keep किंवा असे काही ॲप आहेत जिथे तुम्ही नोट्स save करू शकता. आणि ती नोट लगेच update होते. मी माझा password बदलला कधी ही तरी तिथे लगेच टाकून ठेवतो. ती नोट तिला लगेच दिसते.
हजार गोष्टी लक्षात ठेवायला गेलो तर मुख्य कामाकडे लक्ष कधी देणार ?
हे छोटे मुद्दे जे मी माझ्या छोट्या १ वर्षाच्या संसारातून शिकलेले आहेत.
चला आता थांबतो माझी चहा टाकायची वेळ झालीय, वरचं ज्ञानामृत बायको ला दिलं तर तिने पण १०% किचन ची जबाबदारी माझ्यावर टाकली. ती म्हणतेय जो न्याय पैशाला तो पोटाला….
©प्रसन्न कुलकर्णी