Reading Time: 2 minutes
- अलिककडेच पी पी एफ मुदतपूर्तीनंतरचे पर्याय या विषयाच्या संदर्भात प्रसारित केलेल्या लेखास अनुसरून काही व्यक्तींनी एन आर आय व्यक्तींच्या या खात्यासंबंधीच्या शंका उपस्थित केल्या. त्याच्या शंकांचे निरसन या लेखाद्वारे करीत आहे.
- पी पी एफ ही करमुक्त उत्पन्न देणारी, सरकारची हमी असणारी तसेच करसवलतींचा लाभ देणारी सर्वात जुनी योजना आहे. सध्याच्या नियमांनुसार ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे. त्यामुळेच अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेली परंतू मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीस हे खाते उघडता येत नाही.
- सन 2003 पूर्वी एन आर आय व्यक्ती हे खाते उघडू शकत होत्या. अशा खात्याची मुदत संपल्यावर ती खाती बंद झाली. या बंदीनंतर पुढे 15 वर्ष झालेली असल्याने सध्या कोणत्याही एन आर आय चे असे खाते असण्याची शक्यता नाहीच.राहिला प्रश्न अशा व्यक्तींचा जे भारतीय नागरिक होते तेव्हा त्यांनी पी पी एफ खाते काढले आणि नंतर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
- 2017 च्या अर्थखात्याच्या परिपत्रकानुसार 3 ऑक्टोबर 2017 पासून एखादा खातेधारक पी पी एफ खाते चालू करून नंतर दुसऱ्या देशाचा नागरिक झाला असेल तर त्याने ज्या दिवशी दुसऱ्या देशाचे स्वीकारले त्यादिवशी त्याने आपले पी पी एफ खाते बंद केले असे समजण्यात येऊन त्यानंतर सदर व्यक्ती त्याचे खाते स्वतःहून बंद करेपर्यंत त्यावर 4% प्रतिवर्षं प्रमाणे व्याज देण्यात येईल. अशा प्रकारे सरकारी निर्णय झाल्यावर त्याची सूचना बँकापर्यत नीटपणे पोहोचली नाही आणि सरकारने यावर चक्क घुमजाव केले असून 23 फेब्रुवारी 2018 रोजी नवीन पत्रक काढून जुने परिपत्रक मागे घेतले आहे त्यामुळे नवीन नियमानुसार जुना निर्णय रद्द झाला असून सदर खाती मुदतपूर्तीपर्यंत चालू ठेवता येतील आणि त्यात NRE/NRO खात्यातून पैसेही भरता येतील.
- ज्यांनी आपली खाती बंद केली नाहीत त्यांना यामुळे काहीही फरक न पडून सर्व सेवा सुविधा पूर्वीप्रमाणे मिळत राहातील. ज्यांनी जुन्या परिपत्रकाप्रमाणे आपली खाती बंद केली त्यांचे काय? त्यांना 3 ऑक्टोबर 17 पासून खाते बंद करेपर्यंत च्या कालावधीतील व्याजाचा फरक मिळाला पाहिजे. याशिवाय त्यांनी खाते बंद केल्याने त्यांची इच्छा असल्यास नवीन खाते काढण्याची एक संधी मिळाली पाहिजे. सध्याच्या नियमानुसार एन आर आय पी पी एफ खाते काढू शकत नाहीत. अर्थमंत्रालयाने यासंबंधी खुलासा करणे जरुरीचे आहे.
– उदय पिंगळे
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2CEPRDQ)
Share this article on :