आर्थिक वर्ष २०१९-२०२० हे ३१ मार्च २०२० रोजी संपले. यापूर्वी २५ मार्च २०२० पासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अगदी शेवटच्या क्षणी करबचत करण्याच्या हेतूने गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासाचा विचार करून अपवाद म्हणून केवळ या वर्षीची ८०/क नुसार करसवलत मिळवण्यासाठीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली.
आर्थिक आणीबाणी जाहीर होणार का?
सन २०२०-२०२१ ची गुंतवणूक कधी करायची?
३१ मार्च २०२० रोजी ज्यांच्या खात्याची मुदतपूर्ती होते त्यांनी काय करायचे?
अशा प्रश्नांच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात पुरेशी स्पष्टता नसल्याने त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मार्गदर्शन पत्रके काढण्याचे काम सुरू आहे.
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजना या दोन योजनांच्या सवलतींचा खुलासा करणारे पत्रक ११ एप्रिल २०२० रोजी वित्त मंत्रालयाने जारी केले असून यात केलेला खुलासा सर्व खात्यांना तात्काळ लागू झाला आहे.
बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक
- सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजना याचे खातेधारक सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठीची गुंतवणूक ३० जून २०२० पर्यंत विहित मर्यादेत ( सध्या ही मर्यादा एक वर्षात दोन्ही योजनांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये एवढी आहे) करता येईल.
- सन २०१९-२०२० मध्ये कोणत्याही कारणाने यात असलेली सर्वोच्च मर्यादा ओलांडली जाणार नाही. जर अशी अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे आढळल्यास ही जास्तीची रक्कम धारकास परत करण्यात येऊन त्यावर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदारास विहित मर्यादेचे उल्लंघन न करण्याचे एक घोषणापत्र आपले खाते असलेल्या ठिकाणी द्यावे लागेल.
- या खात्यात ज्या दिवशी रक्कम जमा होईल ती पैसे भरल्याची तारीख असून योजनेच्या नियमाप्रमाणे असलेल्या तारखेस जमा असलेली रक्कम ही त्या महिन्याची शिल्लक समजून त्यावर व्याज दिले जाईल. पी पी एफ योजनेसाठी ही तारीख ५ असून एस एस वाय योजनेसाठी १० आहे या तारखेपर्यंत जमा केलेल्या रकमेवर पूर्ण महिन्याचे व्याज मिळेल.
- आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी किमान गुंतवणूक करू न शकणाऱ्या गुंतवणूकदारांवर ३० जून २०२० पर्यंत कोणतीही दंड आकारणी करण्यात येणार नाही.
- योजनेत अपेक्षित किमान गुंतवणूक या कालावधीत न केल्यास १ जुलै नंतर दंड आकारणी केली जाईल. सध्या पी पी एफ मध्ये एका वर्षात किमान ₹ ५००/- तर एस एस वाय योजनेत किमान ₹ १०००/- गुंतवणूक करावी लागते. यापूर्वीच्या वर्षातील दंड आकारणीस ही सवलत लागू नाही.
- पी पी एफ मधून रक्कम काढून घेण्यासाठीची/ कर्ज घेण्याची निश्चित मर्यादा ठरवण्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी असलेली व्याजासह शिल्लख विचारात घेतली जाईल.
- सध्या पी पी एफ मधून सातव्या वर्षांपासून, चार वर्षे मागील किंवा आधीच्या वर्षीच्या शिल्लक रकमेच्या ५०% रक्कम यातील जी रक्कम कमी असेल ती, परत न करण्याच्या अटीवर काढता येते तर तिसऱ्या वर्षांपासून सहाव्या वर्षापर्यंत दुसऱ्या शिल्लक किंवा मागिल वर्षीची शिल्लक यातील २५% रक्कम कर्ज म्हणून घेता येते.
- पी पी एफ व एस एस वाय या योजनांत आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठी गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक १ एप्रिल २०२० पासून नेहमीच्या पद्धतीने करू शकतील. मात्र जर त्यांना आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठीही गुंतवणूक करायची असल्यास ती एकत्र न करता वेगवेगळी अशी दोनदा करावी लागेल.
- मुदतपूर्ती झालेल्या ज्या पी पी एफ धारकांचा खाते कालावधी ५ वर्षाने वाढवण्याची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपते त्यांना जर त्यासंबंधीचा अर्ज ३० जून २०२० पर्यंत देता येईल.
- लॉकडाऊनमुळे जे लोक खातेधारक मुदतवाढीचा अर्ज नेऊन देऊ शकत नाहीत, त्यांना दरवर्षी पैसे न भरता ५ वर्ष मुदतवाढ घेण्यासाठी फॉर्म ३ तर दरवर्षी पैसे जमा करून ५ वर्ष मुदतवाढ मिळवण्यासाठी फॉर्म ४ या अर्जाची स्कॅन कॉपी आपल्या नोंदवलेल्या इ मेल वरून पाठवता येईल मात्र लॉकडाऊन उठल्यानंतर आपले खाते असलेल्या ठिकाणी त्याची मूळप्रत द्यावी लागेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ईपीएफ” संदर्भात मोठा निर्णय
याचप्रमाणे अन्य अल्पबचत योजनांच्या संदर्भात उपस्थित होणारे प्रश्न सोडवण्यास मदत करणारे परिपत्रक निघणे अपेक्षित आहे.
– उदय पिंगळे
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/