ज्यांना आपले आयकर विवरणपत्र भरताना हिशोब प्रमाणित करावे लागत नाहीत त्यांना सन 2022-23 या वर्षाचे आपले आयकर विवरणपत्र दंड न भरता सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. ज्यांना आयकर कायद्यानुसार हिशोबांना मान्यता घ्यावी लागते त्यांच्यासाठी हीच तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. गेल्यावर्षी ही मुदत वाढवली नाही त्यामुळे यंदा ती कदाचित वाढवली जाऊ शकते या भ्रमात कोणी राहू नये. मुदतीत विवरण पत्र न भरल्याने दंड द्यावा लागून काही आयकर सवलतींवर पाणी सोडावे लागते. तेव्हा आपले विवरणपत्र दिलेल्या मुदतीत भरल्याने दंड वाचतोच. शिवाय करविषयक काही सवलती मिळतात. 1 एप्रिल पासून आपण दिलेल्या मुदतीत आयकर विवरणपत्र दाखल करता येत असले तरी अनेक तांत्रिक कारणाने ते भरता येत नाही. त्यातील काही कारणे अशी
★शेवटच्या तिमाहीत मुळातून कापलेला कर हा ज्याने कापला आहे त्याला 15 मे पर्यंत भरता येतो. अनेक कंपन्या तो अगदी शेवटच्या क्षणी भरतात. आपल्या 26AS अथवा AIS वर दिसायला अजून काही दिवस लागतात. हा लेख प्रसिद्धीस पाठवण्यापूर्वी मी माझे AIS तपासले असता अजूनही शेवटच्या तीन महिन्यात माझा मुळातून कपात केलेला कर त्यात दिसत नाही. आता करभरणा ऑनलाइन होत असताना हा तपशील दिसण्यात खरं तर एक दिवसाहून अधिक कालावधी लागायला नको. आयकर खात्याने या संदर्भात तातडीने काहितरी करून हा विलंब टाळण्याची गरज आहे.
★अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांना कायद्याने देणे आवश्यक असा फॉर्म 16, मे अखेर ते अगदी 15 जूनपर्यंत देतात त्यामुळे आपले नक्की उत्पन्न किती, करकपात किती आणि विविध कलमानुसार घेतलेली आयकर सवलत किती ते नक्की समजत नाही.
★अनेक व्यावसायिक संस्थांचे जमाखर्च तपासून त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते
असे असले तरीही-
ज्यांचे करपात्र उत्पन्न विहित मर्यादेहून कमी आहे, ज्यांचा कर मुळातून कापला जात नाही आणि ज्यांना भांडवली नफा या सदराखाली काही उत्पन्न असेल/ नसेल असे करदाते आपले उत्पन्न मोजून ताबडतोब आयकर विवरणपत्र भरू शकतात.
आयकर विवरणपत्र दाखल करायचे विविध फॉर्म आहेत दरवर्षी विभागाकडून त्यात किरकोळ बदल होत असतात. आपल्याला नेमका कोणता फॉर्म लागेल आणि तो भरण्यासाठी कोणत्या गोष्टी हाताशी ठेवल्या तर सोयीचे होईल याची माहिती घेऊयात.
★आयटीआर 1 (सहज)
कुणी भरायचा?
*करदाते ज्याचे पगार, पेन्शन, व्याज हेच उत्पनाचे साधन आहे.
*एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांहून कमी आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*बँक खातेउतारा
*मुळातून कर कापल्याचे प्रमाणपत्र
★आयटीआर 2
कुणी भरायचा?
*तुमचे उत्पन्न 50 लाखाहून कमी आहे.
*भांडवली नफा, घरभाडे हे तुमच्या उत्पन्नाचा भाग आहेत.
*परदेशात मालमत्ता आहे किंवा त्यात गुंतवणूक केली आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*फॉर्म 16
*फॉर्म 16 A
*भांडवली नफ्याचा तपशील
★आयटीआर 3
कुणी भरायचा?
*स्वतःचा व्यवसाय असणारे
*भागीदारीत व्यवसाय करणारे
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 4 (सुगम)
एवढ्या दुर्बोधित फॉर्मच सुगम नाव ठेवणं हा मोठाच विनोद आहे
कुणी भरायचा?
*₹ 50 लाखाहून कमी उत्पन्न असलेले छोटे व्यावसायिक
आवश्यक कागदपत्रे-
*बँक खातेउतारा
*मुळातून करकपातीचे प्रमाणपत्र
★आयटीआर 5
कुणी भरायचा?
*मर्यादित भागीदारी व्यवसाय
*प्रोप्रायटर्स
*असोसिएशन ऑफ पर्सन
*अन्य फर्म ज्याचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त आहे.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायाचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 6
कुणी भरायचा?
*कोणतीही कंपनी ज्यांचे उत्पन्न परिशिष्ट 11 नुसार करमुक्त नाही.
आवश्यक कागदपत्रे-
*व्यवसायचा वार्षिक जमाखर्च
*वार्षिक नफातोटा पत्रक
*मुळातून कापून गेलेल्या कराचे प्रमाणपत्र
★आयटीआर 7
कुणी भरायचा?
आयकर कायदा 139 AA/AB/AC/AD मध्ये उल्लेख असलेल्या सर्व व्यक्ती/ संस्था यात प्रामुख्याने राजकिय पक्ष, विश्वस्त संस्था, वैज्ञानिक संशोधन संस्था यांचा समावेश होतो.
आवश्यक कागदपत्रे-
*आवश्यक असल्यास हिशोब तपासनीसांचा अहवाल
*मुळातून कर कपातीचे प्रमाणपत्र
या शिवाय आयकर विवरणपत्र भरण्यासाठी उपयुक्त गोष्टी जसेकी –
पॅन, आधार, पासवर्ड, बँक खाते तपशील, बचत गुंतवणूक केली असल्यास त्याचे तपशील, व्याज प्रमाणपत्र, गृहकर्ज मूद्दल व्याज यांची विभागणी, मेडीक्लेम भरल्याची पावती, मिळालेल्या दिलेल्या भेटवस्तू, क्रेडिट कार्ड व्यवहार, स्थानिक स्वराज्य संस्थेचा भरलेला कर, करमुक्त उत्पन्नाचा तपशील, भागीदारी करार, लीज करार, मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे तपशील, देणगी दिली असल्यास त्याचा तपशील बोनस, राईट, मर्जर, डीमर्जर, खरेदीविक्रीची बिले या सारखी आपल्या उत्पन्नाच्या संबंधित आवश्यक ती माहिती हाताशी ठेवावी म्हणजे आयत्याक्षणी धावपळ करावी लागत नाही.
हेही वाचा- आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ
याप्रमाणे आवश्यक तपशील हाताशी असल्यास आयकर विवरणपत्र भरणे सोपे जाते. आपल्याला विवरणपत्र भरता येत नसल्यास तज्ञ व्यक्ती/ संस्था यांची मदत घ्यावी. अनेकदा आपण तज्ञ समजत असलेली व्यक्ती यात तज्ञ असतेच असे नाही तेव्हा आपणमाहिती असल्यास स्वतः अचूक मोजणी करून द्यावी आणि संबंधित व्यक्तीस समजावून सांगावी त्याने विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी तपासून पहावी. यात संबंधित व्यक्तीकडून चूक झाल्यास त्याची सर्व जबाबदारी करदात्यांच्यावर येते. त्यास दंडहोतो याशिवाय मनस्ताप होतो तो वेगळाच. काही व्यावसायिक फर्म यासारख्या सेवा फी आकारून आपल्या ग्राहकांसाठी करीत आहेत. एवढी काळजी घेऊनही काही जाहीर करायचे राहिले असल्यास विवरणपत्र 31 डिसेंबरपर्यत (जरी ते मंजूर झालेले असले / नसले तरी) दुरुस्त करता येते.
©उदय पिंगळे
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक समजावी)