Success Story of Colgate brand
प्रत्येक यशस्वी उद्योगामागे एक कथा असते. नवीन उद्योजकांना या यशोगाथांमधून यशाची नवीन शिखर गाठण्यासाठी नेहमीच प्रेरणा मिळत असते. आपल्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या ‘कोलगेट’ टूथपेस्टची कथा सुद्धा अशीच प्रेरणादायी आहे. जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कोलगेटची सुरुवात कुठे आणि कधी झाली ? अमेरिकेत सुरू झालेलं कोलगेट जगभरात इतकं लोकप्रिय कसं झालं ? व्यवसाय करण्याचे, मार्केटिंगचे कोणते सूत्र वापरून ही कंपनी इतकी मोठी झाली ? हे जाणून घेऊयात.
‘कोलगेट’ म्हणजेच टूथपेस्ट हा समज कित्येक पिढ्यांमध्ये रुजवण्यासाठी या अमेरिकन कंपनीला जवळपास १५० वर्ष लागली आहेत. विलीयम्स कोलगेट या व्यक्तीने १८७३ मध्ये ‘कोलगेट’ची स्थापना केली. तेव्हा साबण हे या कंपनीचं प्रमुख उत्पादन होतं. विलियम कोलगेट यांचा जन्म २५ जानेवारी १७९८३ रोजी इंग्लंडमध्ये एका शेतकऱ्याच्या घरात झाला होता. कालांतराने त्यांचे वडील अमेरिकेत स्थलांतरित झाले. विलियम कोलगेट यांच्या वडिलांनी आपल्या मित्रांसोबत मेणबत्ती आणि साबण तयार करण्याच्या कामापासून सुरुवात केली होती.
हेही वाचा – Manyavar IPO : ‘मान्यवर’ आयपीओ बाबत जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी …
विलियम कोलगेट यांच्या वडिलांना या व्यवसायाचा अनुभव नसल्याने, आवश्यक तो अभ्यास न केल्याने त्यांना या व्यवसायात खूप नुकसान झालं. दोन वर्ष प्रयत्न करून मग त्यांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. विलियम कोलगेट यांचं वय तेव्हा १६ वर्ष इतकं होतं. आपण या परिस्थितीत काहीच बदल घडवू शकत नाही हा विचार त्याला सतावत होता आणि त्या विचारातच त्याने काम शोधण्यासाठी घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
विलियम कोलगेटने घर सोडल्यानंतर काही छोटी मोठी कामं केली आणि न्यूयॉर्क गाठलं. न्यूयॉर्कला आल्यावर विलियमने एका साबणाच्या फॅक्टरी मध्ये काम करण्यास सुरुवात केली. कंपनीत काम करतांना विलियमने सर्व तांत्रिक बाजू शिकून घेतल्या. २ वर्ष काम केल्यानंतर विलियम कोलगेटला आपल्या वडिलांनी व्यवसाय करतांना केलेल्या चुकांची जाणीव झाली आणि त्याने नव्याने साबण तयार करण्याच्या व्यवसायाचं ‘बिजनेस मॉडेल’ तयार केलं.
१८०६ मध्ये विलियम कोलगेटने भाड्याच्या घरात साबण तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. कमीत कमी खर्चात सुरू केलेल्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील दोन वर्षात व्यवसायात नफा दिसायला लागला आणि विलीयमने त्या छोट्या घराचं रूपांतर फॅक्टरी मध्ये केलं. सर्वकाही सुरळीत असतांना विलियम यांना अचानक हृदयाविकाराचा त्रास सुरू झाला. पुढील कित्येक वर्ष विलीयम व्यवसायाकडे लक्ष देऊ शकले नाहीत.
हेही वाचा – Shark Tank India : जाणून घ्या लोकप्रिय शो ‘शार्क टँक इंडिया’बद्दल ……
विलियम कोलगेट यांना त्यांचं शरीर साथ देत नव्हतं. पण, मनाने ते खचले नव्हते. त्यांनी ३ वर्षांनी पुन्हा नव्याने व्यवसाय करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या साबाणांची विक्री दुपटीने वाढली. लवकरच त्यांनी इतर शहरांमध्ये, देशामध्ये साबण निर्यात करण्यास सुरुवात केली. नफा वाढत असतांना विलियम कोलगेट यांनी सामाजिक भान ठेवत आपल्या कमाईतील काही भाग सामाजिक संस्थांना देणगी देण्यास सुरुवात केली. २५ मार्च १८५७ रोजी विलियम कोलगेट यांचा मृत्यू झाला, त्यावेळी विलियम कोलगेट यांनी आपली ५०% संपत्ती सामाजिक संस्थांना दान केली होती.
कोलगेट टूथपेस्टचा जन्म –
विलियम कोलगेट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तीन मुलांनी ‘कोलगेट’चा व्यवसाय वृद्धिंगत करण्याचं ठरवलं. अधिक वस्तू एकाच ब्रँड नावाने विकण्याच्या हेतूने त्यांनी ‘कोलगेट टूथपेस्ट’ची सुरुवात केली. बरणीतून विक्री करण्यास सुरू केलेल्या टूथपेस्टला ट्यूब मध्ये उपलब्ध करुन देण्यात कंपनीला २३ वर्ष लागली. १९५० हे वर्ष कोलगेटच्या उर्जित काळाचं वर्ष मानलं जातं. यावर्षी कोलगेटने आपली टॅगलाईन बदलून ही ठेवली होती -” हा केवळ दातच स्वच्छ करत नाही, तर श्वासातील दुर्गंधी सुद्धा दूर करतो.” ही टॅगलाईन क्लिक झाली आणि कोलगेटची गाडी सुसाट धावण्यास सुरू झाली. कोलगेटची वाढती लोकप्रियता बघून १९२८ मध्ये पामोलिव्ह या कंपनीने त्यांच्यासोबत काम करून शेविंग क्रिम आणि अत्तराची निर्मिती करण्यास सुरुवात केली. काही वर्षात ‘कोलगेट टूथपेस्ट’ घराघरात पोहोचलं आणि ब्रँड नाव मोठं होत गेलं. कोलगेट टूथपेस्टच्या आधी कंपनीने टूथ पावडरची निर्मिती केली आणि त्यामुळे लोकांना एक पर्याय उपलब्ध झाला आणि कोलगेटचा खप अजून वाढला.
हेही वाचा – Warren Buffett Quote : वॉरेन बफेट यांची जीवनाबद्दलची 20 उत्तम विधाने …
शेयर बाजारात कोलगेट कंपनी
१९३० मध्ये कोलगेट न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग केलं आणि कंपनीची भरभराट होण्यास सुरुवात झाली. जगभरातील टूथपेस्ट विक्रीच्या ५५% लोक हे ‘कोलगेट टूथपेस्ट’ वापरतात असं नुकतंच एका मार्केट सर्वेक्षणात समोर आलं आहे. भारतातील ५०% घरात आजही कोलगेट वापरलं जातं असं आकडे सांगतात. फिलिपिन्स देशात एक विश्वविक्रम करण्यात आला ज्यामध्ये एकाच वेळी ४१०३८ लोकांनी कोलगेट टूथपेस्टने दात स्वच्छ केले आणि विश्वविक्रम केला. विलियम कोलगेटने हृदयाच्या आजारानंतर जर व्यवसायाची परत सुरुवात केली नसती तर त्यांच्या पुढच्या पिढीला आजचा दिवस बघायला मिळाला नसता. “आपला व्यवसाय जर खडतर वाटेवरून जात असेल तर त्याचा अधिक अभ्यास करून सातत्याने काम केल्यास यश हे मिळतंच” हे आपण कोलगेटच्या कथेतून नक्कीच शिकू शकतो.