Share Market Basics
सामान्य माणसाच्या मनात शेअर बाजाराच्या मूलभूत संकल्पना (Share Market Basics) काही वेगळ्याच आहेत. त्यामुळे सामान्य माणसाने शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याचं प्रमाण अजूनही खूपच अत्यल्प आहे. हे प्रमाण जेमतेम 2% असावे असा एक अंदाज आहे. त्यावरून या बाजाराची व्याप्ती किती मोठी आहे ते समजते.
हे नक्की वाचा: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ
शेअर बाजार गुंतवणूक आणि सामान्य माणूस –
- पिढ्यानपिढ्या आपल्यावर- अंथरूण पाहून पाय पसरावे, एकाने सरी बांधली म्हणून दुसऱ्याने दोरी बांधू नये, ठेविले अनंते तैसेचि राहावे यासारखे संस्कार झाले आहेत. या पूर्वीची पिढीने अतिशय कष्टाने दिवस काढले. त्याच्या किमान गरजा अत्यंत माफक होत्या.
- आसपास राहणाऱ्या सर्व लोकांची परिस्थिती जवळपास सारखी होती. दोन वेळेचे जेवण आणि डोक्यावर भाड्याचेही का असेना, पण छप्पर असावे ही सुखाची व्याख्या होती.
- चैनीच्या कल्पना अगदी बाळबोध होत्या. तेव्हाही श्रीमंत लोक होते, पण ते असणारच अशी समाजाची धारणा होती आणि त्यांनी काही वेगळी गोष्ट केली तरी त्यात काय विशेष? म्हणून ती समाजमान्य होत होती.
- खूप श्रीमंत व्यक्तीने शेअरमध्ये पैसे टाकले, भाव पडल्यामुळे तो बुडाला आणि त्याच्या घरदाराचा लिलाव झाला, अशा प्रकारचे प्रसंग हा तेव्हाच्या काही चित्रपटात असलेल्या शेअर बाजाराशी संबंधित प्रसंगाचा भाग होता. त्यामुळे शेअर बाजार आपल्यासाठी नाही असा सर्वसाधारण समज होता. त्यामुळे शेअर घेणे म्हणजे हमखास भिकेला लागणे.
- सुमारे 37/38 वर्षांपूर्वी, मला नुकतीच नोकरी लागून दीड दोन वर्षे झाली असताना, एका थोडेफार नावलौकिक मिळवलेल्या कंपनीने शेअर बाजारात येणार होते. तेव्हा ते घेण्याचा मी विचार करत होतो, त्यासाठी लागणारे पैसे भरण्यासाठी मुंबई क्लिअरींग चेक सुविधा देणारी एकमेव बँक माझ्या घरापासून 20 किमी अंतरावर होती, केवळ याच सुविधेसाठी मी माझे बचत खाते तिथे काढले.
- ही गोष्ट माझ्या आईला सांगितल्यावर आता मी माझे सगळे पैसे इथे लावणार आणि आपल्यावर काहीतरी भयंकर प्रसंग कोसळणार अशी माझ्या आईची समजून झाली होती. त्या काळजीपोटी तिने मला समजावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी तिची जी काही समजून काढली त्यामुळेच माझा या बाजारात प्रवेश झाला.
- खरंतर शेअर बाजारावर बरा वाईट परिणाम होण्यास अप्रत्यक्षपणे प्रत्येकाचा हातभार आहे.
- या सर्व लोकांची बचत आणि गुंतवणूक ही बँक, म्युच्युअल फंड, विमा, पेन्शन फंड या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेअर बाजारात येत असते.
- इथे नोंदणी झालेल्या अनेक कंपन्यांच्या वस्तू आणि सेवा यांचा वापर सर्वांकडून केला जातो त्यातून त्याचे ब्रँडिंग होत असते.
- आपल्या ग्राहकांची सदर कंपनीची वर्तणूक कशी असेल त्यावर तिचे लौकिक मूल्य ठरत असते. ग्राहक केंद्री उद्योगांच्या शेअर्सचे बाजारभाव कायमच अधिक असतात. त्यातून त्यांची प्रतिमा अधोरेखित होत असते. अनेक गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर्स आपल्याकडे असावेत अशी अपेक्षा बाळगतात.
विशेष लेख: शेअर बाजार जोखीम: काही गैरसमज
शेअर बाजार आणि लॉकडाऊन –
- हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेल्यावर्षी मार्च अखेरीस करावी लागलेली ताळेबंदी, त्यानंतर त्यात शिथिलता आल्यावर पुन्हा आलेले संकट त्यामुळे लागू झालेले निर्बंध, त्यामुळे अनेकांवर संकट ओढवले.
- गमावलेल्या नोकऱ्या, कमी झालेले पगार, वाढलेला वैद्यकीय खर्च, कमी झालेले व्याजदर, वाढती महागाई यामुळे एकंदरीत अर्थव्यवस्था मंदावली.
- याचाच परिणाम शेअर बाजारावर होऊन जगभरातील शेअर बाजार धाडकन खाली आले.
- सर्वच देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अनेक उपाय योजले त्यात अधिक नोटा छापून चलन वाढवणे हा एक उपाय होता.
- हा उपाय योग्य की अयोग्य हा वादग्रस्त भाग असला तरी यामुळे महागाई झपाट्याने वाढण्याची शक्यता असते आणि त्याचा अनुभव पदोपदी आपल्याला येतो आहे.
- याच काळात शेअर बाजार हाच महागाईवर मात करण्याचा पर्याय असल्याचे चित्र उभे केले गेल्याने, तसेच बरेचसे लोक घरून काम करत असल्याने, अनेक हवशे, नवशे, गवशे बाजारात आले आहेत.
- याच काळात सर्वाधिक डी मॅट खाती उघडली गेली. त्याचप्रमाणे इतर देशातील प्रचंड पैसा, निव्वळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने अल्पावधीत शेअर बाजारात आल्याने बाजार सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे आणि तो आणखी नवीन उच्चांक गाठत आहे.
- कोणत्याही विपरीत माहितीचा या बाजारावर परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहेत.
- या बाजाराबद्धल अनेकांचे टोकाचे समज, गैरसमज आहेत त्यात अनेकजण काहीही समजून न घेता जे तारे तोडतात त्याने ते दूर होण्याऐवजी आणखी वाढतात.
शेअर बाजर काही समज गैरसमज-
- शेअर बाजार हा जुगार आहे.
- यासाठी भरपूर पैसे लागतात.
- यातून काही न करता भरपूर पैसे मिळतात.
- हे श्रीमंतांचे काम आहे.
- यातील एकाचा फायदा ते दुसऱ्याचे नुकसान त्यामुळे त्याचे शिव्याशाप आपल्याला लागतात.
- ट्रेंडिंग वाईट, गुंतवणूक चांगली.
- गुंतवणूक जास्त दिवस ठेवली तर जास्त फायदा होतो.
- फक्त ए ग्रेड कंपन्यांचे शेअर घ्यावेत.
- फक्त सर्व पेनी स्टोक घ्यायचे एक दोन चालले की सगळे पैसे वसूल.
- ऑप्शन ट्रेड म्हणजे कमी पैशात अमर्याद फायदा.
- सगळे पैसे गेले तरी चालतील एवढीच गुंतवणूक करावी.
महत्वाचा लेख: शेअर बाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक
शेअर बाजार आणि वास्तव-
- वर नमूद केलेली यादी कितीही वाढवता येईल. यातील काही विधाने पूर्णपणे खोटी तर काही अर्धवट माहितीवर आधारित आहेत.
- थोडेसे समजून घेऊन अभ्यास करून यात सहभागी झाल्यास आपले मूद्दल न गमावता चांगला परतावा मिळू शकतो.
- समाजात अशी असंख्य उदाहरणे आहेत. अनेक लोक पूर्णपणे व्यावसायिक दृष्टी बाळगून यात भाग घेत आहेत.
- अनेकदा विशेष काही न करता अल्पावधीत अनपेक्षित फायदा मिळाला की व्यक्तीच्या मनात केलेल्या व्यवहाराचे गुणाकार सुरू होतात आणि मग अधिक धाडसी निर्णय घेतले जातात.
- टीव्ही वरील शोज आणि विविध समाज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या जाहिराती, फुकटच्या टिप्स आणि जॅकपॉट शेअर्स, भ्रामक कल्पना आपल्या मनात भरत असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अपेक्षाभंग होतो.
- योग्य परतावा म्हणजे किती? आणि त्यासाठी काम करणारी व्यक्ती चंचल मनोवृत्तीची असेल तर ती कितीही ज्ञानी असेल तरी तिचे शेवटी नुकसानच होणार.
- इथे मिळणारे यश हे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा किती आणि कसा उपयोग करता त्यावर अवलंबून असते. अगदी छोटी छोटी तंत्रे, सामान्य ज्ञान आणि सारासार विचार करून सुद्धा आपले स्वताचे गुंतवणूक तंत्र बनवता येऊ शकते.
- अजिबात धोका न स्वीकारणाऱ्या व्यक्तीसाठीही येथे काही सुरक्षित व कमी घोका असलेले गुंतवणूक मार्ग उपलब्ध आहेत. अधिक धाडसी व्यक्ती बऱ्याच असल्याने बाजार सतत वरखाली होण्यास मदत होत आहे.
- येथे क्रियाशील राहणाऱ्या व्यक्तीने सतत शिकायला हवे, चूका कटाक्षाने टाळल्या पाहीजेतच पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणे टाळले पाहिजे.
- अनेकजण हमखास उत्पन्न मिळवून देण्याचा जाहिराती करत असले तरी या बाजारातून सातत्याने केवळ नफाच मिळवणे कुणालाही शक्य नाही. काही अपवाद असतील तर ते नगण्य असल्याने त्याचे तंत्र आणि मंत्र कोणते? यांचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे.
- मार्गदर्शन करण्यासाठी योग्य सल्लागार मिळणे आवश्यक आहे. अगदी यथातथा उत्पन्न मिळवणारी व्यक्तीही येथे छोटे छोटे व्यवहार करत असून, ती आपल्या उत्पन्नातील काही भाग याकडे वळवत आहे. अनेक मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि उच्च उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीनी थेट शेअर खरेदी विक्री किंवा म्युच्युअल फंड योजनांचा स्वीकार केला आहे.
- आपले स्वतःचे तंत्र विकसित करून महागाईवर मात करणारा परतावा ते निश्चित मिळवू शकतात. इथे खाते कुठे काढावे त्यासाठी किती खर्च येईल त्यानंतर भविष्यात कोणते खर्च करावे लागतील यांची चाचपणी करून गुणवत्तेवर निर्णय घ्यावा म्हणजे मागाहून पश्चात्ताप करायची पाळी येणार नाही.
- ज्यांचे उत्पन्न अधिक आहे ते व्यावसायिक सल्लागाराशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ शकतात. या सर्वाचा वापर एखाद्या पांगुळगाड्यासारखा नाहीतर कुबडीसारखा करावा म्हणजे आपल्याला चालता येण्यास मदत होते.
चालता यायला लागले की या कुबड्या टाकाव्यात. इथे फुकटंच काही मिळेल ही अपेक्षा बाळगू नये. इथे धोका नाही का ? तर तो आहेच! पण अनेकदा धोका न स्वीकारणे हेच अधिक धोकादायक असल्याचे आढळून येते. याबाबत काही शंका असतील तर जरूर कळवा. अशा संवादातून ज्ञानात भर पडेल, नक्की काय करायचं ते ठरवता येईल आणि हो तुम्हाला उपयोगी असलेल्या या माहितीचे कोणतेही पैसे नाहीत, बरं का!
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Share Market Basics Marathi Mahiti, Share Market Basics in Marathi, Share Market Basics Marathi, Share Market Basics mahiti