TCS
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) गेल्या 17 वर्षांत गुंतवणूकदारांना 3000% पेक्षा जास्त परतावा दिल्याचे एन. चंद्रशेखरन यांनी टीसीएसच्या 17व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. एन. चंद्रशेखरन म्हणजे सध्याचे टाटा सन्सचे चेअरमन आणि पूर्वाश्रमीचे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. टाटा उद्योग समूहातील सर्व कंपन्यांची मालकी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होल्डिंग कंपनी म्हणून टाटा सन्सकडे आहे. टाटा सन्सची टीसीएसमध्ये ७२.१९% मालकी आहे.
गुंतवणूकदारांना ३०००% परतावा:
- २००४ साली टीसीएसचे शेअर्स बाजारात नोंदले गेले. तेव्हा रु. ८५० मध्ये घेतलेल्या एका शेअरची किंमत आज जवळपास रु. २८,००० पर्यंत वृद्धिंगत झाली आहे म्हणजे गुंतवणूकदारांना मुद्दलावर ३०००% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.
- याचाच दुसरा अर्थ असा आहे की दीर्घकालीन विचार करून टीसीएसचे शेअर १७ वर्षे न विकता टिकून रहाणाऱ्या गुंतवणूकदारांनाच ३०००% टक्के फायदा झाला आहे.
- सध्याच्या इंट्रा डे ट्रेडिंग करून एका दिवसात भक्कम फायद्याच्या शोधात असणाऱ्या नव-गुंतवणूकदारांना टीसीएसच्या यशाची कथा बोधप्रद आहे.
आकड्यांमध्ये टीसीएस :
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भारतातील सर्वांत मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी व रिलायन्स इंडस्ट्रीज नंतरची दुसरी सर्वात मोठी बाजारमूल्य असलेली कंपनी आहे.
- १४ जून २०२१ अखेर टीसीएसचे बाजारमूल्य रु. १२.१२ लाख कोटी होते.
- टीसीएसचे ४.९० लाख कर्मचारी जगभरात पसरलेल्या कार्यालयांत काम करतात. कोव्हीड महामारीमुळे सर्वत्र आलेल्या मंदीच्या काळातही टीसीएसने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ४० हजारांपेक्षा नवीन कर्मचारी कामावर घेतले.
- आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये टीसीएसने रु १,६४,१७७ कोटींच्या उत्पन्नावर रु. ३३,३८८ करोत्तर नफा मिळवला आहे. यातील ९५% उत्पन्न भारताबाहेर सेवा देऊन मिळाले आहे.
- कंपनीने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये लाभांश आणि शेअर पुर्नखरेदीपोटी रु. ३३,८७३ कोटी रुपये गुंतवणूकदारांना दिले आहेत.
- कोरोनामुळे जगभरातील कंपन्या त्यांचे खर्च वाचवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान सेवा आउटसोर्स करणार आहेत त्याचबरोबर क्लाउड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स यांच्या वाढत्या उपयोगाचा फायदा टीसीएसला होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी
१९६९ साली स्थापना झालेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने आतापर्यंत फक्त ४ मुख्य कार्यकारी अधिकारी बघितले आहेत.
फकीरचंद कोहली –
- भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे फकिरचंद कोहली 1969 ते 1996 पर्यंत टीसीएसचे सर्वेसर्वा होते. केवळ 10 कर्मचारी असतांना टीसीएसमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली.
- भारतात कॉम्प्युटर बाबत सरकार दरबारी अनास्था असताना त्यांनी परदेशात कंपनीचा विस्तार केला.
- माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम ठरवण्यापासून ते कुशल मनुष्यबळ तयार करेपर्यंत अनेक क्षेत्रांत त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेतले आणि एक संपूर्ण नवीन क्षेत्र भारतीयांसाठी खुले केले.
एस रामादोराई –
- 1996 ते 2009 पर्यंत टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या रामदोराईंनी टीसीएसचा प्रचंड मोठा व्यवसाय विस्तार केला.
- 6000 कर्मचारी ते 2 लाख कर्मचाऱ्यापर्यंतच्या प्रवासात कंपनीची विक्री USD 400 मिलियन ते USD 20 बिलियन पर्यंत त्यांनी नेली.
- या काळात डॉट बबल, वाय.टू.के. अशा बऱ्याच संकटानाही त्यांना तोंड द्यावे लागले.
- 2004 मध्ये रामदोराईंच्या काळातच टीसीएस शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनी बनली.
एन चंद्रशेखरन –
- 2009 ते 2017 पर्यंत टीसीएसच्या प्रगतीची गती एन चंद्रशेखरन यांनी वाढवली. त्यांच्या काळात टीसीएसचे महाकाय कंपनीत रूपांतर झाले.
- व्यवसाय वाढीसाठी गतिमान निर्णय घेतले जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी निर्णयांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला.
- वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानातही त्यांनी नव्या संधी हेरून कंपनी मोठी केली.
राजेश गोपीनाथन –
- 2001 साली टीसीएस मध्ये सुरुवात करून 2013 पर्यंत राजेश गोपीनाथन कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी बनले. पुढे 2017 पासून ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
- त्यांच्या कारकिर्दीत टीसीएसने पहिल्यांदाच 10 लाख कोटी रुपये बाजारमूल्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला.
50 वर्षांपासून जास्त काळ भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा प्रदान करून जगभर भारताचे नाव मोठे करणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटा उद्योग समूहातील सध्या सर्वात महत्वाची कंपनी आहे.
– सीए अभिजीत कोळपकर
(अभिजीत कोळपकर अर्थसाक्षरता अभियानात काम करतात.)
(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची उपलब्ध माहितीप्रमाणे कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: TCS in Marathi, TCS shares Marathi mahiti, TCS investment in Msrathi, TCS Marathi Mahiti