Reading Time: 2 minutes

गेल्या ५ वर्षांमध्ये भारतात डी-मॅट अकाऊंटची (D MAT Account) विक्रमी नोंद करण्यात आली आहे. भारतातील मोठा वर्ग आता शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करताना दिसत आहे. शेअर्समध्ये आपले पैसे गुंतवणूक करणे फायदेशीर असते मात्र अपुऱ्या माहितीच्या जोरावर केलेल्या गुंतवणुकीमुळे बऱ्याच गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचा इतिहास आहे.

काहींना एका रात्रीतून मोठी रक्कम मिळावी अशी स्वप्न पडत असतात पण हे वाटत तितकं सोपं नाही. शेअर बाजारात बऱ्याच वेळा रात्रीतून श्रीमंत होण्यासाठी काही अवैध गोष्टी केल्याचे प्रकारही कित्येकदा समोर आले आहेत. आपल्याला देखील या अशा प्रकारांपासून दूर राहणं तितकंच गरजेचं आहे. इन्साईडर ट्रेडिंग (Insider Trading) हा शब्द अनेकदा गुंतवणूक करताना तुम्ही ऐकला असेल. आपण त्याबाबत माहिती घेऊया –

इन्साईडर ट्रेडिंग (Insider Trading) म्हणजे काय?

आपण शेअर बाजारात गुंतवणूक करतो म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेत असतो किंवा विक्री करत असतो. हे सर्व आपण ऐकीव माहितीच्या जोरावर किंवा मूलभूत माहितीच्या आधारावर करत असतो. कंपनी कारभाराबाबत देखील काही नियम असतात. जसं की कंपनीची काही माहिती ही सार्वजनिक नसते. अशीच माहिती काही वेळा कंपनीत काम करणारे लोक जाहीर करतात.

अशा वेळी जर माहिती कंपनीच्या फायद्याबद्दल असेल तर शेअर्सची किंमत वाढते. संबंधित माहिती कंपनीच्या तोट्याबद्दल असेल तर कंपनीच्या शेअर्सची पडझडही होते. इन्साईडर ट्रेडिंगला सोप्या भाषेत म्हणू शकतो की, कंपनीच्या सार्वजनिक नसणाऱ्या माहितीच्या आधारावर शेअर्सची झालेली खरेदी विक्री.

सेबीने याविरोधात कडक नियम केलेले आहेत. मात्र, तरीही कित्येकवेळा असे इन्साईडर ट्रेडिंगचे प्रकार समोर येत असतात.

इन्साईडर ट्रेडिंग बेकायदेशीर का आहे?

आपल्या देशात इन्साईडर ट्रेडिंग हे बेकायदेशीर मानले जाते. कारण, या ट्रेडिंगमुळे गुंतवणूकदारांना अनिश्चित तोट्याला सामोरे जावे लागू शकते.

इन्साईडर ट्रेडिंग हे नेहमी अशा व्यक्तीकडून केले जाते जिला कंपनीच्या आतल्या काही गोष्टींबद्दल माहिती असते. जसं की कंपनीचा तीन महिन्यांचा नफा हा त्याला आधीच कळलेला असतो किंवा कंपनी जर एखादा मोठा निर्णय घेणार असेल तर तेही त्याला माहित असते.
अशी माहिती ज्या व्यक्तीला माहित असते ते या माहितीच्या जोरावर फायदा कमावू शकतात. मात्र, अशा लोकांमुळे सामान्य गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. इन्साईडर ट्रेडिंगबाबत सेबीने कठोर शिक्षा जाहीर केलेली आहे.

इन्साईडर ट्रेडिंगचा गुंतवणूकदारांवर होणार परिमाण
गुंतवणूकदारांसाठी अन्यायकारक बाब –

जर आपण सामान्य गुंतवणूकदार असू तर आपल्याला कंपनीमध्ये चालणाऱ्या काही गोष्टींबद्दल माहिती नसते. आपण गुंतवणूक केल्यानंतर एका मर्यादित रक्कमेचा नफ्याच्या स्वरूपात विचार करत असतो. याउलट ज्या व्यक्तीला कंपनीतील आतली माहिती आहे, अशा माहितीच्या जोरावर तो व्यक्ती, त्याचे कुटुंब, काही नातेवाईक, मित्रपरिवार, संबंधित इतर हे भरपूर रक्कम कमवू शकतात. या गोष्टींमुळे नुकसान फक्त साधारण गुंतवणूकदाराचं होतं हे मात्र निश्चित.

गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला तडा जातो –

ज्या ज्या वेळी बाजारात इन्साईडर ट्रेडिंगचे प्रकार समोर येतात तेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार बराच काळ बाजारापासून पाठ फिरवतात. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कुठंतरी कमी होताना दिसतो. याचं उदाहरण घ्यायचं झाल्यास काही खेळांमध्ये होणाऱ्या अन्यायकारक गोष्टी. जर समजा खेळात काही गैरप्रकार झाला तर खेळाडूंवर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसंच मार्केटचं आहे. इन्साईडर ट्रेडिंगमुळे मार्केटवर गंभीर परिणाम होतात आणि लोक शेअर्समध्ये व्यवहार करण्यास टाळाटाळ सुरू करतात. त्यामुळे इन्साईडर ट्रेडिंग ही अन्यायकारक बाब मानली जाते.

भारतातील इन्साईडर ट्रेडिंगचे एक उदाहरण
अ‍ॅक्लेम इंडस्ट्रीजचे संचालक अभिषेक मेहता यांना सेबीने ४२ लाख रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा केली होती. झालं असं होतं की, २०१२ साली फेब्रुवारी महिन्यात अभिषेक मेहता यांनी त्याच्याकडं असणाऱ्या इन्साईडर न्यूज (आतील खबर, माहिती)च्या आधारे कंपनीतील आपले शेअर्स विकून टाकले. सदर माहिती कंपनीतील अंतस्थ कमी लोकांनाच माहिती असताना अभिषेक मेहता यांनी आपले शेअर्स विकले. हे सेबीच्या लक्षात आल्यानंतर अभिषेक मेहता यांच्यावर लागलीच कारवाई करण्यात आली.

टीप : इन्साईडर ट्रेडिंगमध्ये कितीही फायदा वाटत असला तरी सेबीपासून वाचणं फार कठीण आहे. आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी इन्साईडर ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमावले, अशा बहुतेक लोकांना सेबीने आपला दणका दाखवलेला आहे. त्यांना मोठा दंड आणि अगदी तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली आहे.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…