Reading Time: 2 minutes
Insurance Gift Card: विमा भेट कार्ड
वाढदिवस, सण-समारंभ अशा विविध कारणांनी आपण आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देत असतो. भेटवस्तू कुठली दयायची हा अनेकदा यक्षप्रश्न बनून आपल्यासमोर उभा असतो, पण आता मात्र या यक्षप्रश्नाला एक समर्पक उत्तर सापडलं आहे ते म्हणजे विमा भेट कार्ड (Insurance Gift Card)!
- आरोग्य विमा किती महत्वाचा आहे हे आपल्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
- कोविड 19 नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना याची नव्याने जाणीव झाली असेल.
- अचानक आलेले आरोग्य संकट आपली अनेक वर्षाची जमापुंजी संपवून कर्जबाजारी बनवू शकते. यासाठी आपला आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा विमा असणे जरुरीचे आहे.
- हे विमा सुरक्षाकवच आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 2 ते 4 पट असावे, आपल्याला माहिती असेलच!
- आपल्याप्रमाणेच आपले स्नेही, आप्तेष्ट, नातेवाईक व प्रियजन यांनीही आरोग्य विमा घ्यावा अशी आपली इच्छा असेलच.
- नजीक आलेले दसरा, दिवाळी यासारखे सण आणि त्यानंतर सुरू होणारी लग्नसराई या निमित्ताने आपण त्यांना आरोग्य विमा घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.
- या निमित्ताने ज्या भेटवस्तूची देवाण घेवाण होते यात आपण त्यांना ‘विमा भेट कार्ड (Insurance Gift Card)’ भेट म्हणून देऊ शकतो.
- अशा प्रकारची आगळी वेगळी योजना 23 सप्टेंबर 2020 पासून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आणली असून, त्याद्वारे आरोग्य विमा काढण्यास प्रोत्साहन आणि त्याचा भार थोडा हलका करणे अशा दोन्ही गोष्टी साधता येतील. ही नाविन्यपूर्ण आणि अभिनव भेट आपण त्यांना देऊ शकतो.
Insurance Gift Card: सॅन्डबॉक्स योजना
- इन्शुरन्स नियामक आयआरडीए यांनी इन्शुरन्स गिफ्ट कार्ड ही योजना ‘सॅन्डबॉक्स योजना’, म्हणजे अशी नाविन्यपूर्ण वेगळी योजना, लोकांच्या फायद्याची असून त्याच्या प्रतिसादाची चाचपणी करण्याच्या उद्देशाने यासाठी तत्वतः मंजुरी दिली आहे.
- यानुसार मार्गदर्शक तत्वानुसार येते 6 महिने प्रायोगिक तत्वावर आणून त्याच्या उपयुक्ततेची चाचणी करण्यात येईल.
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स ही पहिली कंपनी आहे जिने आपल्या ग्राहकांसाठी सर्वप्रथम ही योजना आणली आहे.
- अशाच प्रकारच्या योजना, अन्य सर्वसाधारण विमा कंपन्यांच्याकडून बाजारात नजीकच्या काळात येऊ शकतात.
Insurance Gift Card: विमा भेट कार्ड
- विमा भेट कार्ड हे कोणत्याही अन्य प्रीपेड कार्डासारखे असून ते ₹ 500/- आणि ₹ 1000/- या दोन प्रकारात उपलब्ध आहेत.
- हे भेट कार्ड reliancegeneral.co.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन खरेदी करता येईल.
- जेव्हा ते खरेदी कराल तेव्हा लगेचच हे गिफ्ट वाउचर आपणास इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपल्या मेलवर मिळेल ते आपण कोणालाही भेट म्हणून दिल्यास तो ते वापरू शकेल आणि त्याबरोबर ते कसे वापरता येईल याच्या सूचना मिळतील.
- भेट म्हणून असे कार्ड मिळालेली व्यक्ती फक्त रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा आरोग्य विमा घेताना त्याचा वापर करू शकते अथवा कार्ड खरेदी करणारा त्याचा वापर स्वतःसाठी कंपनीचा कोणताही सर्वसाधारण विमा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.
- हे कार्ड खरेदी करणाऱ्यास खरेदी किंमतीवर 10% सूट मिळते. ते घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत न वापरल्यास त्यात गुंतवलेली रक्कम परत करण्यात येते.
- भेट म्हणून कार्ड मिळणारी व्यक्ती फक्त रिलायन्स जनरल इन्शुरन्स याच कंपनीचा आरोग्य विमा घेऊ शकते. त्यामुळे खरेदीदाराच्या योग्य पॉलिसी घेण्याच्या हक्कावर मर्यादा येतात. तसेच त्याचा वापर अस्तित्वात असलेल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी करता येत नाही.
- भविष्यात कोणत्याही कंपनीची कोणतीही पॉलिसी घेता येईल किंवा कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही पॉलिसीचे नूतनीकरण करता येईल अशा प्रकारची इन्शुरन्स गिफ्ट कार्ड बाजारात येण्याची अपेक्षा करायला हरकत नाही.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Insurance Gift Card Marathi Mahiti, Insurance Gift Card in Marathi, Reliance Insurance Gift Card Marathi
Share this article on :