Reading Time: 3 minutes

मागील भागात आपण पाहिले, महिला आर्थिक नियोजनाला फारसं गांभीर्याने घेत नाहीत. या भागात आपण महिलांच्या अर्थसाक्षरतेचं महत्व, त्याची महत्वाची कारणे व आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा याबद्दलची माहिती घेणार आहोत.

महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्याची व आर्थिकदृष्ट्या साक्षर असण्याची महत्वाची पाच कारणे:

१. आपत्तीजनक परिस्थिती:

  • आयुष्य नेहमीच अनपेक्षित वळणे घेत असतं. कधी कसला प्रसंग येइल हे सांगता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे व आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता असणं खूपच आवश्यक असतं.

  • महिलांनी आर्थिक नियोजनाची माहिती करुन घेणे, पतीच्या अथवा पित्याच्या आर्थिक नियोजनाबद्दल माहिती असणे त्यामध्ये सहभाग घेणे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.

       यामध्ये प्रामुख्याने –

           – विमा पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक,

           – कर्जाचे हप्ते,

– बॉंड्स,

– डिमॅट खाते, इत्यादी गोष्टींची माहिती असणे खूप आवश्यक आहे.

  • परंतु बहुतांश वेळा मुलांची/ कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्यावर पित्याच्या / पतीच्या आर्थिक नियोजनाबद्दल माहिती घ्यावी लागते आणि अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये हे सगळं समजून घेणं खूप कठीण जातं.

२. रहाणीमानाचा दर्जा: 

  • वाढत्या महागाईचा आणि रहाणीमानाचा (standard of living) विचार करता महिलांनी निव्वळ आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं पुरेसं नाही तर आर्थिकदृष्ट्या साक्षर असणंही तेवढंच महत्वाचं आहे.

  • तुमच्या कमाईचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात येणाऱ्या अनपेक्षित आर्थिक  संकटातून मार्ग काढणं सोपं जाईल. तुमचं आर्थिक नियोजनाचं ज्ञान पाहून समाजात तुमच्याबद्दलचा आदरही वाढेल.

३. स्वाभिमानी आयुष्य:

  • आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी व्यक्ती स्वाभिमानाने जगू शकते.

  • अशा व्यक्तीला स्वतःचे निर्णय घ्यायचा नैतिक अधिकार मिळतो.

  • योग्य पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच शिवाय तुमची अनेक कठीण वाटणारी स्वप्ने साकार करणेही सहज शक्य होतं.

  • आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही कठीण प्रसंगाला तुम्ही आत्मविश्वासाने तोंड देवू शकता.

४. फसवणूक व घरगुती अत्याचार:

  • उच्चशिक्षित महिलाही फसवणूक व घरगुती अत्याचाराला बळी पडत आहेत.

  • आर्थिक उत्पन्नाचा अथवा ज्ञानाचा अभाव हे यामागील प्रमुख कारणांपैकी महत्वाची कारणे आहेत.

  • आर्थिकदृष्ट्या सक्षम व साक्षर असणारी स्री यासारख्या प्रकारांना विरोध करु शकते व त्याविरुद्ध आवाज उठवू शकते. कारण स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ती कोणावर अवलंबून नसते.

५. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) वाढ:

  • देशातील महिला जर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या तर सहाजिकच त्यांच्या कुटुंबांच्या रहाणीमानाचा दर्जा सुधारेल.

  • वस्तूंच्या खरेदीत वाढ होइल व शासनाला जास्त महसूल (Revenue) मिळेल. त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्यास मदत होइल.

आर्थिक नियोजन शिकण्यासाठी-

  • महिनांना आर्थिक नियोजन यायला हवं आणि यासाठी सर्वात आधी त्यांनी स्वतः प्रयत्न करणं आवश्यक आहे. ‘मल्टिटास्किंग’, जबाबदारीची जाणीव हे गुण महिलांमध्ये उपजतच असतात. त्यामुळे त्या उत्तमप्रकारे आर्थिक नियोजन करु शकतात.

  • फक्त त्यातील बारकावे शिकण्याची गरज आहे. जे अजिबात कठीण नाही. मनापासून इच्छा आणि निर्णयक्षमता हवी, मग आर्थिक नियोजन करणं कठीण व किचकट वाटणार नाही.

  • विविध मासिके, इंटरनेटवरील वेबसाईट, पुस्तके, इत्यादीमधून गुंतवणूकीबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकते. तसंच यासाठी आर्थिक सल्लागाराची मदतही घेता येते. सर्व माहिती घेऊन आपलं उत्पन्न, खर्च याचा विचार करुन त्यानुसार गुंतवणूकीची रक्कम ठरवावी व उपलब्ध पर्यायांपैकी योग्य आणि आवश्यक असणाऱ्या पर्यायांची निवड करावी.

  • कुटुंबातील व्यक्तींनीही (खास करून भाऊ, पिता व पती) आर्थिक नियोजन करताना मुलीचं, आईचं अथवा पत्नीचं मत विचारात घेणं, तिच्याशी चर्चा करणं, तिचे आर्थिक निर्णय तिला स्वतःला घेऊ देणं, त्यासाठी तिला प्रोत्साहन देणं अशा गोष्टी करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये तिला सहभागी करुन घेतल्यास तिचाही आत्मविश्वास वाढेल.

आर्थिक नियोजन करताना घ्यायची काळजी:

१. उत्पन्न: आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र म्हणजे स्वतःच असं मिळणारं नियमित उत्पन्न. यासाठी नोकरी, व्यवसाय,    फ्रीलान्सिंग, वर्क फ्रॉम होम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

२. बॅंक खाते:  जर महिला नोकरी अथवा व्यवसाय करत असेल तर सामान्यतः तिचे स्वतःचे सॅलरी अकाउंट(पगाराचे खाते) किंवा चालू खाते (current account) असते. पण इतर पर्यांयासाठीही रोख रक्कम (cash) स्विकारण्यापेक्षा बॅंक खात्याचाच वापर करावा .

३. नियमित बचतीची सवय: स्वतःला नियमीत बचतीची सवय लावून घेणं खूप आवश्यक आहे. बचतीची रक्कम कमी असली तरी चालेल पण नियमीत असणं खूप आवश्यक आहे.

४. हिशोब लेखन: आपल्या जमा- खर्चाचा हिशोब असणे खूप महत्वाचं आहे. यामुळे आपल्याला आपलं सद्ध्याचं उत्पन्न व खर्च वजा करुन किती रक्कम शिल्लक उरतेय ते पहाता येईल व त्यानुसार आपल्याला गुंतवणूकीच्या पर्यायांचा विचार करता येईल.

५. अनावश्यक खर्च:  अनेक प्रकारचे छोटे- मोठे अनावश्यक खर्च महिला सर्रासपणे करत असतात. अनेकदा लक्षातही येत नाही की आपण जे खर्च करतोय ते अनावश्यक आहेत. असे खर्च टाळल्यास पैसा वाचेल व बचतीमध्ये वाढ होइल.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Ejr8r5)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…