Reading Time: 4 minutes

ऑनलाइन व्यवहार करण्याशी माझा संबंध खऱ्या अर्थाने सन २०१६ साली आला. मुंबई ग्राहक संघाच्या त्या वेळच्या शिक्षण विभागप्रमुख वसुंधराताई देवधर यांनी यूपीआयची माहिती असलेली एक लिंक पाठवून त्यावर एक लेख लिहून मागितला होता. या आधी ऑनलाइन काही हव असल्यास ते मुलांना सांगितलं की तेच व्यवहार करायचे आणि वस्तू हातात यायची. 

युपीआय व्यवहाराची सुरुवात –

 • यूपीआय ही क्रांतिकारी पेमेंट पद्धत तेव्हा नुकतीच सुरू झाली होती.  मी प्रत्यक्षात ऑनलाईन व्यवहार  कधी केले नसले तरी ते कसे करता येतील हे वाचले होते. यूपीआयवरील माहिती वाचल्यावर ही पध्दत आर्थिक बाबतीत क्रांतिकारी बदल घडवेल हे मी ओळखले.  
 • आता यावर लिहायचे तर त्यासाठी आवश्यक गोष्टी आपणच करून पहाव्यात तर त्याचे फायदे तोटे लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला असेल असे वाटल्याने त्यासाठी आवश्यक असणारा आभासी पत्ता (UPI address) तयार करून माझ्या भाच्याला ₹१००/- पाठवून ते त्याला त्याच क्षणी मिळतात याची मी खात्री फोनवरून करून घेतली.
 •      त्या दिवसापासून आजतागायत जिथे जिथे ऑनलाइन व्यवहार होऊ शकतो तो मी ऑनलाइन पद्धतीनेच करत आहे. यातील तत्परता, सुलभता, व्यवहाराची होणारी नोंद आणि हे सर्व जवळपास विनामूल्य! या गोष्टींची कुणालाही निश्चित भुरळ पडेल असेच सारेकाही. 
 • या सर्वाचा प्रसार आणि प्रचार पुरस्कार तेव्हापासून मी करीतच आहे. ज्यांना असे व्यवहार करायची भीती वाटते, त्यांची भीती घालवण्याचे काम मी सातत्याने करीत आहे. आपण हे सारं सहज करू शकतो हे कळल्यावर आत्मविश्वासात वाढ होते. 

       

शेअर बाजारातील ब्रोकर आणि खाते उघड –

 •  ब्रोकरकडे असणारे आपले खाते हे नेमके कोणत्या प्रकारच्या ब्रोकरकडे असावे याबाबत मार्गदर्शन करताना जे टेक्नोसॅव्ही आहेत त्यांनी डिस्काऊंट ब्रोकरकडे तर ज्यांना आपल्या परंपरागत पद्धतीने व्यवहार करायचे आहेत त्यांनी फुल फ्लेज ब्रोकर्सकडे आपले व्यवहार करावे असे माझे मत आहे. 
 • मध्यंतरी म्हणजे करोना कालखंडात मानवी हालचालींवर मर्यादा आल्याने बहुतेक फुल फ्लेज ब्रोकर्सनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अँप विकसित केली.  त्यामुळे फोन करून व्यवहार करण्याऐवजी फोनमधून व्यवहार करता येणे शक्य झाले. 
 • अँप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो आपल्या गरजेनुरूप एक निश्चित केलेला कम्प्युटर प्रोग्राम आहे. याशिवाय सेबीने मार्जिन नियम बदलल्याने पूर्वीप्रमाणे एकाद्या खात्यास शब्दावर मार्जिन मिळणे बंद झाल्याने या दोन्ही ब्रोकर्सच्या कार्यपद्धतीत आता फारसा फरक राहिलेला नाही.

नक्की वाचा : मासिक पगार रुपये ८,००० ते अब्जावधींची संपत्ती – वाचा झिरोधाची यशोगाथा 

          

शेअर बाजारातील खाते उघड – 

 • माझ्या भावी आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने मी गेल्यावर्षी जे बाजार व्यवहार केले त्याचा तपशील आयकर विवरणपत्र भरताना भरपूर ब्रोकरेज गेल्याचे लक्षात आले. 
 •  हेच व्यवहार डिस्काउंट ब्रोकरमार्फत केले असते तर ९५% ब्रोकरेज वाचले असते. आपलयाला जर ऑनलाइन व्यवहार करता येतात मग आपण डिस्काउंट ब्रोकरकडे असे खाते का उघडू नये असा विचार आला? 
 •  असे खाते उघडताना त्याविषयी अधिक माहिती मिळवताना झिरोधाकडे खाते उघडुयात. त्यांचे आयडीएफसी बँकेबरोबर ३ इन १ खाते निर्माण करता येत असल्याचा करार झालेला असल्याने व्यवहाराच्या दृष्टीने सोईचे होईल म्हणून दोन्हीकडे खाते उघडण्याचा  निर्णय मी घेतला.  
 • याशिवाय असा निर्णय घेण्यामागे माझ्या जाणकार मित्राने झिरोधाचा इंटरफेस चांगला असून कस्टमर सर्व्हिस चांगली असल्याची केलेली शिफारस आणि हे खाते मुलगा वापरत असल्याने काही अडचण आल्यास त्याला विचारता येईल हा भरवसा होता. 

       

झिरोधाकडे उघडले शेअर बाजारातील खाते – 

 • मित्राच्या शिफारशींमुळे ठाण्यातील झिरोधा प्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधून मार्गदर्शन केले आणि ऑनलाइन खाते उघडताना कुठे अडचण आल्यास त्वरित मार्गदर्शन करू असे सांगितले. 
 • माझी 3 इन १ खात्याची गरज सांगितल्यावर त्यांनी प्रथम आयडीएफसी बँकेत खाते उघडून तो नंबर झिरोधाकडे द्यावा असे सुचवल्याने प्रथम आयडीएफसी बँकेत आणि नंतर झिरोधामध्ये मी खाते ओपन केले. हे खाते उघडण्यासाठी मोजून २० मिनिटातून अधिक कालावधी लागला नाही. 
 • केवायसीही ऑनलाइन झाले हा एक सुखद आणि आपला आत्मविश्वास वाढवणारा अनुभव होता. या सर्व घटना २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत. यानंतर मी हे खाते ३ in १ करण्यासाठी द्यावा लागणारे पीओए डॉक्युमेंट पोर्टलवर जाऊन प्रोसेस केले.  त्याचा प्रिंटआऊट घेऊन तो स्पीड पोस्टाने बंगलोर येथे २८ सप्टेंबर रोजी पाठवला. 
 • तो त्यांना ३० सप्टेंबरला मिळाला. या प्रत्येक टप्यावर मला वेळोवेळी मेलवरून स्थितीची माहिती वेळोवेळी मिळत राहिल्याने समाधान वाटत होते.

         

झिरोधाकडून मिळालेला अनुभव – 

 •  मला मिळालेले समाधान अल्पकाळात नाहीसे झाले. ३० सप्टेंबरला मला संध्याकाळी मी पाठवलेला पीओए फॉर्म जुना असल्याने नाकारला असल्याचा मेल आला. 
 •  मी लगेच माझ्या संपर्कात असलेल्या सपोर्ट टीम मेम्बरशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला वेगळी पीओए फॉर्मची लिंक पाठवली.  त्यातील फॉर्म आणि मी पोर्टलवरून घेतलेल्या फॉर्ममध्ये एका शब्दाचाही फरक नसल्याने तो फॉर्म पुन्हा पाठवण्यास मी नकार दिला.
 •  यानंतर सपोर्ट मेम्बरने त्यांच्या वरिष्ठांशी बोलून फॉर्म न पाठवता पीओए ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले.  त्याप्रमाणे केले असता ते नाकारण्यात आले.  याबाबत मी पोर्टलवर टिकेट जनरेट केले म्हणजे आपली तक्रार तेथे नोंदवली. 
 • त्याचे उत्तर मी पीओए फॉर्म पाठवलेला नसल्याने अर्ज नाकारण्यात आल्याचे कळवले. तेव्हापासून १४ ऑक्टोबरपर्यंत जिथे संपर्क साधला तेथून वेगवेगळे अनुभव आले. सपोर्ट करणारा वेगळे सांगणार,मेलचे उत्तर भलतेच, कस्टमर केअर तोंडाला पाणी पुसणारे आमची टीम तुमच्याशी २४ तासात संपर्क साधेल म्हणून सांगून वेळ मारून नेणार. 
 • यात नेमके काय करायला हवे कुणाचाच कुणाला मेळ नाही.  समस्या आहे तिथेच. ती सोडवायची सोडून तुम्ही नेट बँकिंगने, यूपीआयने पैसे पाठवून व्यवहार करू शकता किंवा आयडीएफसी बॅंकेला विचारून पहा सांगणार तर बँकवाले आमच्याकडून ओके आहे तुम्ही झिरोधाला विचारा सांगणार यातून मनस्ताप होण्याखेरीज काहीही झाले नाही.

नक्की वाचा : मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे आणि काय करू नये 

        

झीरोधाबाबत  घेतलेली भूमिका –

 •   १४  ऑक्टोबर शुक्रवारी रात्री सपोर्ट टीमच्या मॅनेजरने १८ ऑक्टोबरपर्यंत प्राधान्याने तक्रार सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.  एकंदरीत अनुभव पाहता त्यास  यश येईल असे वाटत नाही, तोपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास मी १९ ऑक्टोबर रोजी खाते बंद करणार म्हणून माझ्याकडून त्यांना मर्यादा घातली होती. 
 • सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापारी प्रथा याबद्धल खाते काढताना भरलेले ₹२००/- आणि मनस्ताप याबद्दल भरपाई मिळवू शकण्याचा पर्याय माझ्याकडे आहे. १९ ऑक्टोबर रोजी हा प्रश्न न सुटल्याने मी कंटाळून झेरोदा खाते बंद केले आहे. त्यांनीही तितक्याच तातडीने ते कोणताही विचारपूस न करता तत्परतेने बंद  केले आहे. 
 • खाते रीतसर सुरू होण्यापूर्वी जर ही अवस्था असेल तर यानंतर उद्भवणाऱ्या तक्रारी मी कशा सोडवणार याबाबत मला वाटणारी काळजी रास्त आहे. आता अनधिकृतपणे झेरोदा आणि आयडीएफसी बॅंक यांच्यात काहीतरी नवीन करार होणार आहे असं समजतंय. ते सपोर्ट टीम,पोर्टल, कस्टमर केअर याना माहीत नसेल तर आपल्या पोर्टलवर आहे असे दाखवणे चूक आहे.
 • मला आलेल्या मेलमध्ये असा करार नसल्याचे त्यांनी नाकारले नाही. उलट अपडेटेड फॉर्म पाठवा, फॉर्म आलेला नाही अशी कारणे दिली असून २४  तासात संपर्क केला जाईल सांगितले तरी तो कोणत्याही मार्गाने कधीच झाला नाही. मीच त्याचा वारंवार फॉलोअप घेत होतो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना माझी तक्रार सुरुवातीपासून सांगत होतो. 
 • ऑनलाइन व्यवहार जितक्या सहज होतात तितक्या सहज या संबंधात उद्भवणारे प्रश्न अजूनही सहज सुटत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ज्या सुलभतेने खाते उघडले जाते किंवा बंद होते त्यावरून या सर्वानाच ग्राहक हवेत पण त्यांच्या तक्रारी नको आहेत किंवा त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे आहे याची आस्था नाही, भले ते आपल्याला सोडून गेले तरी चालतील, हेच यातून अधोरेखित होत आहे.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…