मूल्य आधारित गुंतवणूक – समृद्धीचा महामार्ग

Reading Time: 3 minutes
 • म्युच्युअल फंडाची चांगली योजना कशी निवडायची हे आपण बऱ्याच वेळा त्या योजनेचा पूर्वीचा इतिहास पाहून ठरवतो. परंतु ती योजना पुढेही चांगलाच परतावा देईल याबद्दल खात्रीपूर्वक सागंता येत नाही. अशा परिस्थितीत काही वेळा आपण त्याची दृढता किंवा सातत्य पाहतो. तसेच बाजाराच्या चढ उताराच्या काळात फंड व्यवस्थापकाने कसा परतावा दिला आहे तेसुद्धा पाहतो.

 • त्याच बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, फंड व्यवस्थापकाची गुंतवणूक करण्याची पद्धत. आज आपण जाणून घेऊया फंड व्यवस्थपनेच्या पद्धती विषयी. भारतात प्रामुख्याने वृद्धी आधारित पद्धत (ग्रोथ स्टाईल ) किंवा मूल्य आधारित पद्धत (व्हॅल्यू स्टाईल) ने फंड व्यवस्थापन होते.

 • वृद्धी आधारित पद्धतीमध्ये फंड व्यवस्थापक अशा कंपन्यांवर लक्ष ठेवतात ज्यांचे एका समभागामागील उत्पन्न हे त्या क्षेत्रा मधील कंपन्यांच्या सरासरी उत्पन्ना पेक्षा जास्त आहे. 

 • भांडवली बाजारामध्ये मध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे EPS गुणांक म्हणजेच (अर्निंग पर शेयर). कंपनीच्या एका समभागा मागील उत्पन्नाचा गुणांक. वृद्धी आधारित पद्धतीत योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये अशा कंपन्या असतात ज्यांचा EPS हा सरासरी EPS पेक्षा जास्त असतो. वृद्धी आधारित पद्धतीतील कंपन्यांची वाढ ही ‘बेंचमार्क कंपन्यांपेक्षा’ जास्त जोमाने होते मात्र भांडवली बाजारातील उताराच्या काळात हे समभाग तितकेच जोमाने खाली येतात.

 • फंड व्यवस्थापनेची दुसरी पद्धत म्हणजे मूल्य आधारित गुंतवणूक (व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट). मूल्य आधारित पद्धतीच्या योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये फंड व्यवस्थापक अशा कंपन्या निवडतो, ज्यांच्या समभागांचा भाव हा आज जरी खाली दिसत असला तरी येणाऱ्या काळात जोमाने वाढू शकतात.

 • अशा कंपन्यांची निवड करण्यासाठी फंड व्यवस्थापक प्रामुख्याने खालील ३ घटक पाहतात-

  1. फंड व्यवस्थापक अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो ज्यांचा प्राईस टू अर्निंग  गुणांक (P/E Ratio) हा त्या क्षेत्रामधील सरासरी गुणांकापेक्षा कमी आहे. P/E गुणांक म्हणजे कंपनीच्या प्रत्येक समभागामागील उत्पन्न व कंपनीच्या एकूण समभागांचे गुणोत्तर होय. हे गुणोत्तर जेवढे कमी तेवढे त्या कंपनीच्या वाढीची क्षमता जास्त.
  2. त्याच प्रमाणे ‘शेयर प्राईस टू बुक व्हॅल्यू गुणोत्तरही’(P/B Ratio) पाहिले जाते. P/B मोजणे म्हणजे कंपनीच्या प्रत्येक समभागामागील उत्पन्न व कंपनीची एकूण निव्वळ मालमत्ता यांचे गुणोत्तर होय. हा गुणांक जेवढा कमी तेवढे मूल्य आधारित गुंतवणुकीला वाढीची शक्यता जास्त.
  3. आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे डिव्हीडंड यील्ड (Dividend yield) म्हणजेच जी कंपनी वरचेवर लाभांश देते, त्या कंपनीच्या समभागांची किंमत नेहमीच खाली राहते अशा कंपनी मध्ये वाढीची शक्यता जास्त असते.
 • फंड व्यवस्थापक फक्त हे गुणांक बघून गुंतवणूक करत नाहीत, तर आणखी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास  करून योजनेचा पोर्टफोलिओ बनवतात.
 • फंड व्यवस्थापकांना मदत करण्यासाठी जे समभाग संशोधन विश्लेषक (रिसर्च अनॅलिस्ट) असतात ते अभ्यासपूर्वक अशा कंपन्या शोधून काढतात. काही वेळा विश्लेषक प्रत्यक्ष कंपनीचा प्लांट किंवा फॅक्टरी मध्ये जाऊन तसेच कंपनीच्या व्यवस्थापकांना वरचेवर भेटून कंपनीचा अभ्यास करतात.

 • भांडवली बाजार जेव्हा वरच्या पातळीवर असतो व तो खाली येण्याची शक्यता असते किंवा बाजार अस्थिर असतो अशावेळी दीर्घ मुदतीसाठी मूल्य आधारित (व्हॅल्यू स्टाईल) फंडामध्ये गुंतवणूक करणे हिताचे असते. कारण मूल्य आधारित पोर्टफोलिओवर बाजाराच्या अस्थिरतेचा तितका प्रभाव पडत नाही.

 • ज्या गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता कमी असते, मात्र जास्त परतावा मिळण्याच्या दृष्टीने इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी असते अशा गुंतवणूकदारांसाठी मूल्य आधारित फंड  हा योग्य पर्याय असतो. मात्र मूल्य आधारित फंडाकडून जास्त परतावा मिळण्यासाठी जास्त कालावधी साठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

 • अल्प कालावधीमध्ये वृद्धी आधारित फंड आणि मूल्य आधारित फंड ह्यांच्या कामगिरीची  तुलना करणे योग्य नाही मात्र दीर्घावधीमध्ये म्हणजे साधारण ५ वर्ष किंवा अधिक काळात आपण ह्या दोन्ही प्रकारच्या फंडाची तुलना करू शकतो.

 • सध्याची भांडवली बाजाराची स्थिती पहिली तर लक्षात येते की बाजार हा अजूनही वरच्या पातळीवर आहे आणि साधारण एक वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकांकडे पाहिल्यास, निवडणूक पार पडेपर्यंत बाजार असाच अस्थिर राहील. अशा परिस्थितीत भांडवली बाजारातून जास्त परतावा मिळण्यासाठी मूल्य आधारित (व्हॅल्यू) फंडामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे.

 • अमेरिकेतील सुप्रसिद्ध गुंतवणूकदार ‘वॉरेन बफे’ हे सुद्धा व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट पद्धती अवलंबतात. त्यांनी  व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट पद्धतीने स्वतःसाठी तसेच त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगली धनवृद्धी केली आहे.

 • त्यांच्या मते दीर्घावधीसाठी म्हणजेच १५/२० वर्षे किंवा त्याहून जास्त काळा करिता व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट केल्यास आपणास चांगली धनवृद्धी होते. आपल्याकडे  मात्र आपण ३-४ वर्ष गुंतवणुकीला दीर्घावधी समझतो व आपण संयम दाखवत नाही. आपणही दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगली धनवृद्धी करता येईल .वृद्धी पद्धतीतील (ग्रोथ) फंड आणि मूल्य आधारित पद्धतीतील (व्हॅल्यू) फंड हे ससा व कासवाच्या शर्यती प्रमाणे असतात. मात्र ह्या स्पर्धेत दीर्घावधीमध्ये मूल्य आधारित पद्धतीतील (व्हॅल्यू) फंड जिंकतात.

येणाऱ्या ८/१० वर्ष मध्ये आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था हि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा तज्ज्ञांचा अभ्यास आहे. अशावेळी सामान्य गुंतवणूकदारांनी भारताच्या विकासावर विश्वास ठेवून १०/१५ वर्षाच्या काळाकरिता दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आर्थिक समृद्धता येईल.

– निलेश तावडे

(चित्रसौजन्यhttps://bit.ly/2OXztVr )

Leave a Reply

Your email address will not be published.