Reading Time: 5 minutes

शेअरबाजार आणि धोका (Risk) या दोन शब्दांचे नाते सत्यनारायण आणि महापुजा या शब्दांइतकेच जवळचे आहे. आज मात्र या बाबतीत नक्की खरे काय ?? ह्याचा उहापोह करायचा, आणि जमलेच तर सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसलेल्या ‘धोका’ या भुताला बाटलीबंद् करुन गुंतवणुकीच्या समुद्रात सोडुन द्यावयाचे, ह्या ईराद्याने हा लेख लिहितो आहे. असे म्हणतात की एक चित्र हे हजार शब्दांपेक्षा अधिक बोलके असते… दुर्दैवाने माझी चित्रकला ‘भयंकर’ या श्रेणीत मोडत असल्याने मी या सत्यवचनात चित्रा ऐवजी ‘उदाहारण’ असा माझ्यापुरता बदल करतो आणि ह्या ‘शेअर बाजारातील धोका’ ह्या मुद्द्यावरुन माझ्या व्यावसायिक जीवनातील एक सत्य अनुभव प्रथम आपल्याला सांगतो सन 1999… माझा मित्र सतीशने मला कंपनीच्या  कॅंटीन्मध्ये हाक मारली आणि म्हणाला  “अरे प्रसाद, बाबा रिटायर्ड होतायत पुढ्च्या आठ्वड्यात, तुझ्याकडे यायचय त्याना.  मिळालेले पैसे कसे गुंतवायचे सांग जरा…”का नाही ?? नक्की ये, मी वाट पहातो”- मी.

ह्या सतीशचे वडील टेल्कोमध्ये अधिकारी होते. सहाजिकच माझ्या दृष्टिने एक मोठा क्लायंट मिळु पहात होता, त्यामुळे सतिश त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे येण्याची वाट पहाण्यांत वेळ न दवडता लवकरच सतीशबरोबरच मीच त्याच्या घरी गेलो. जाताजातानाच “बाबांना शेअर्समध्ये एकही पैसा गुंतवायचा नाही. तु उगीच त्याचा आग्रह धरु नकोस हो, नाहीतर ते तुझ्याकडुन काहीच  करणार नाहीत.. दुसरे काही फिक्स डिपॉझिटस, बॉन्ड्स वगैरे असल्यास सांग” सतिशने खरेतर माझ्या व्यवसायाविषयीच्या काळजीपोटी, पण प्रत्यक्षांत माझ्या उत्साहावर विरजण घालणारे सुतोवाच केले….. मग घरी पोहोचल्यावर चहापाणी होताच काकांनी माझा ताबा घेतला. ते राजकारण, महागाई, आजची तरुण पीढी…, अशा नेहमीच्या सगळ्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करीत असताना मी महतप्रयासाने गाडी गुंतवणुकीच्या स्टेशनाकडे वळवली, पण व्यर्थ… काकांचे त्याबाबतचे नियोजनही झाल्यातच जमा होते. टेल्को कपनी त्यांना त्यांच्या ठेवीवर स्पेशल 1% अधीक व्याज देणार होती, याशिवाय स्वयंसेवकी विचारसरणीशी बांधिलकी सांगणाया पुण्यांतील एक प्रसिद्ध बॅंकेनेही अशा निवृत्तांसाठी एक विषेष योजना काढल्यामुळे सदरहुची बॅंक व टेल्को कंपनी यांत फिक्स्ड डिपॉझिटस, व जोडीला पोस्टाची कोणतीशी मासिक पेन्शन योजना …काकांनी नियोजनचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला होता. “.पण काका, मी काय म्हणतो…” काकांचे बौद्धीक ऐकुन कंटाळ्ल्याने मी धीर करुन त्यांना थांबवले. ” मला असे वाटते की तुम्ही 30/35 वर्षे नोकरी केलीत टाटांकडे, आता जरा मालक बना की कंपनीचे !!,” यावर काका गोधळलेले दिसले म्हणुन मी पुढे म्हटले. ” काका, बाकी करा एफ.डीज तुम्ही ठरवल्याप्रमाणे, पण 25/30,000 रुपयांचे टेल्कोचे शेअर्स घ्या” … ” अरे काय सांगतोयस काय तु ? टेल्कोचे शेअर्स घ्या?? अंधार आहे अंधार. ..आमचे दिवस बरे गेले..पुढे काही खरे नाही” काका पुन्हा ‘सुरु’ झाले. दरम्यान मी ही थोड्या आग्रहानेच माझा मुद्दा त्यांना पटवुन देवु लागलो. तसाही तो तसा मंदीचाच काळ होता आणि श्री.रतन टाटांच्या इंडिकाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्मुळे टेल्को संकटात आली होती. या पार्श्वभुमीवर लवकरच काकांच सुर त्रासिक वरुन रागीट या पट्टीत बदलेल अशी भीती मला वाटु लागली. सतिशनेही एकंदर रागरंग बघुन मला “चला,.निघुया….” अशी खुण केली, आणि “छेSS नको रे हे शेअर्सचे लचांड, घामाचा पैसा असतो आपला, लाखाचे बारा हजार होणे अजिबात नाही झेपणार आपल्याला या वयात” या भरतवाक्याने आमच्या मीटींगची सांगता झाली.
गेली काही वर्षे तोट्यात असणारी, एकदाही लाभांश देउ न शकणारी बॅक केवळ ‘आपल्या माणसांची’ आहे म्हणुन अन्य कोणतीही शहानिशा न करता आपली आयुष्यभराची पुंजी त्यांच्याकडे सोपविणारे आपण एकीकडे टाटांच्या प्रामाणिकपणावरही विश्वास दाखवतच असतो, मात्र याच टाटांच्या उद्योगांतील एका वीटेचाही मालक बनायला आपण का तयार नसतो?? हे मला आजतागायत कळलेले नाही. …….बाकीचे राहु द्या, श्री. काकांना त्यांच्या डिपॉझिटस वर किती व्याज मिळाले त्याचा हिशेब माझ्याकडे नाही पण एक सत्य मात्र नक्की, ते म्हणजे त्यावेळी दोन आकड्याच्या भावात (रु.100 पेक्षा कमी) मिळत असलेल्या टेल्कोच्या शेअरचा आजचा भाव रु. 2250 आहे,  त्या वेळच्या एका 10 रु. मुळ किंमतीच्या शेअरचे आता प्रत्येकी 02 रु.चे 05 शेअर्स झाले आहेत ही बाब कृपया लक्षांत असु द्या. याशिवाय राईट्स म्हणुन मिळालेले शेअर्स आणि दरवर्षी मिळालेला घसघशीत डिव्हीडंड वेगळाच आणि हे ही पुरेसे नाही म्हणुन की काय हा सगळा फायदा चक्क टॅक्स फ्री !!!

हा, पैसे फिक्स्ड डिपोझिट्स मध्ये ठेवण्याचा, विषय माझ्या खास जिव्हाळ्याचा आहे, कदाचित आपणास माझे  प्रतिपादन रुचणार नाही परंतु मला आपणास एक अनाहुत सल्ला द्यायला आवडेल. तो हा, की जर आपण अतिविशिष्ट स्वरुपात मोडणारे गुंतवणुकदार (उदा. खु्पच वयस्कर किंवा सीमेवर तैनात जवान ई.) नसाल, तर केवळ आणि केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आपण एफ.डीज  कराव्यात.. अगदी अल्पकालीन गुंतवणुक म्हणुनही लिक्विड फंड्स सारखा पर्याय मला अधीक सोयीचा वाटतो. म्हणजे हे पहा.. तुम्ही आपल्याकडील सुपिक जमीन स्वत: काहीही न करता दुसयास कसावयास देणाया शेतकयाची संभावना कशी कराल ?? आता राग मानु नका, पण खरे म्हणजे बेंकेत एफ.डी ठेवणारे आपणही याच शेतकयाच्या जातकुळीतले आळशी, कल्पनाशुन्य नाही काय ? दोघेही त्यांच्याकडील एकमेव  उपलब्ध ऐवज, ज्यातुन अक्षरश: विश्व निर्माण करता येते,  त्याचा वापर  फक्त दुसयाला  देण्यासाठी करतात….. एक आपली जमीन दुसयाला वापरावयाला देतो आणि दुसरा आपले पैसे.!!!

या मुद्द्यावर अधिक सांगोपांग, सखोल विष्लेष्ण येथे जागे अभावी शक्य नाही मात्र कोणाची ईच्छा असल्यास मला ते व्यक्तीगत स्वरुपात करायला नकीच आवडेल

आपण दिलेले असे आपलेच पैसे वापरुन समाजातील उद्यमशील वर्ग म्हणजेच टाटा, बिर्ला अणि अंबानी ई  सारखी. मंड्ळी कारखाने उभारतात, उत्पादनक्षमता वाढवितात आणि बाजार त्यांच्या वस्तुंनी भरुन टाकतात. आपल्या कोरड्या, पोकळ टीकेचे आणि बक्कळ मायेचे धनी होतात !!  त्यातुन होणाया नफ्यांतुनच त्यांना  आपल्याला, म्हणजे ठेवीदारांना किती व्याज दर द्यावयाला परवडेल हे ही तेच ठरवितात, आणि आपण अशा त्यांनी ’दिलेल्या’ व्याजातुन आपल्याला मिळालेले उत्पन्न त्यांच्याच घेतलेल्या उत्पादनांच्या किंमतीतुन त्यांना इमानईतबारे साभार घरपोच करतो हे कधी आपल्या लक्षांत आले आहे का ??

तुम्ही, मी आपण आपले 1000  रु. बेकेत व्याजाने  ठेवतो तेंव्हा आपल्याला किती रु. व्याज मिळते हे मी सांगायला नकोच, त्या पेक्षा मी आपल्या बाजारांत  सहजी उपलब्ध असणा-या काही ‘दादा’ कंपन्यांच्या फायद्याची ताजी आणि अधिकृत आकडेवारी देतो. आपली स्टेट बॆक तिच्या प्रत्येक 10 रु. च्या शेअरमागे रु.41.79 एवढा नफा (उपार्जन) मिळविते, रिलायन्स च्या बाबत हाच आकडा रु.61 एवढा आहे. टीसीएस प्रतिशेअर (01 रु.चा,रु.10 चा नव्हे) नफा 53 रुपये आणि हिंदुस्थान लीव्हरचा (पुन्हा शेअर रु. 01 चा) रु.12.46 एवढा प्रचंड आहे. येथे मी केवळ काही निवडक उदाहरणे केवळ नमुना म्हणुन घेतली आहेत. ह्या ह्या एकाच घटकाच्या आकडेवारीवरुन अशा कंपन्यांची आपापसात तुलना करणे अजिबातच चुकीचे ठरेल, मात्र आपल्याला मिळ्णा-या व्याजाच्या दराची तुलना यांच्या मिळकतीची जरुर करता येइल…… नव्हे आपण ती करावीच करावी. याहुनही लक्षांत घेण्याची गोष्ट ही, की ह्या सर्व कंपन्या हा असा ’दाबुन’ नफा फक्त काल परवा नव्हे तर वर्षानुवर्षे, पेक्षा दशकानुदशके अव्याहतपणे मिळवत आहेत

सर्वसामान्य माणसे या कंपन्यांच्या नवनविन आणि गुणवत्तापुर्ण उत्पादनांची भुरळ पडुन ती विश्वासाने नेहमीच विकत घेतात. मात्र या कंपन्याची अशी उत्पादने सातत्याने बाजारांत आणण्याची, ती खपविण्याची आणि त्यापासुन अपरंपार फायदा मिळविण्याची त्या वर्षानुवर्षे बाळगुन असलेली अजोड क्षमता अ विकत घेताना  आपण अपवादानेच दिसतो.अशी क्षमता विकत घेणे म्हणजेच दुसरे तिसरे काही नसुन ह्या कंपन्याचे शेअर्स विकत घेणे होय.

विचारसरणीच्या ह्याच फरकामुळॆ काही लोक त्यांच्या आर्थिक  उद्दीष्टांकडॆ ’लिफ्ट’ मधुन जाताना दिसतात आणि आपण मात्र महागाईच्या नावाने धापा टाकत जिन्याने चढ्त असतो.

अर्थात, ज्या प्रमाणे ईसापनीतीतील गोष्टीत मेंढ्यांच्या कळपात कधीकधी कातडी पांघरलेला लांडगा असतो आणि जगतगुरु तुकोबारा यांच्या वारीतही एखादा चोर सामील असतो तसेच येथेही आहे. बाजारांत उपलब्ध असलेला प्रत्येक शेअर आपल्यासाठी संपन्न्तेकडे नेणारा सोपानच असेल या भ्रमांत बिलकुलच राहु नये. खरेतर येथेही अन्य बाजारांप्रमाणेच दिखावु मालाचीच खोगीरभरती जास्त आहे, ज्यांच्यामुळेच अनेकदा शेअर बाजार हा बदनाम झाला, ब-याच प्रमाणांत अस्पृश्य राहिला आहे. यावर योग्य निवड  करण्याच्या उपाय म्हणजे मी याच लेखात वर उल्लेख केला आहे तशा ‘दादा’  म्हणजेच बाजारांतील प्रमुख, नियमित लाभांश देणा-या, सतत मोठ्या प्रमाणावर नफा कमाविणा-या वा प्रमुख निर्देशांकात  समाविष्ट असणा-या कंपन्यांचीच निवड करावी.

मला या व्यवसायातील  प्राथमिक धडे देणारे श्री. कारखानीस सर नेहमी सांगायचे की ‘हे पहा, अशा कपन्यांचेच शेअर आपल्या फोलियोत ठेवावे, की ज्या तुला घरातुन शेजारच्या बसस्टॉप पर्यंत जातानाही दिसतील’ . स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, पण तरीही खुलासा करतो की  त्यांना असे म्हणावयाचे असे की अशा कंपन्या, ज्यांची उत्पादने पावला पावलावर तुम्हाला त्यांचे अस्तित्व जाणवुन देतात, अशाच कंपन्यांवर तुम्ही दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी अवलंबुन राहु शकता. आ श्री. सरांचे हे म्हणणे मला शत-प्रतिशत मान्य आहे, किंबहुना ह्या लेखाचा रोखही फक्त अशाच कंपन्यांकडे आहे.

याशिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण येथे मध्यम वा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार करतो आहोत, अल्पकालीन, ट्रेडिंग, वा सट्टेबाजी या दृष्टिकोणातुन नव्हे. सर्वसामान्यांसाठी थोडेशी क्लिष्ट पण या दोन्हीमधील (गुंतवणुक वि. सट्टेबाजी) निर्णायक फरक सांगणारी टिपण्णी सर बेंजामिन ग्रॅहम यांनी केली आहे. ते म्हणतात. Investing is an activity of forecasting the yield  on assets  over the  life of  the asset, whereas Speculation is the activity of forecasting the psychology of the market.

एकंदरीत, ’विचार बदला — नशिब बदलेल’ हे सत्पुरुष वचन आपण ऐकलेच आहे, ते अंमलांत कधी आणावयाचे ते ही आपल्याच हाती आहे नाही का ?

प्रसाद भागवत –

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…