Barshi Stock Market Scam : बार्शी स्टॉक मार्केट स्कॅम
शेअरमार्केट हे एक असं आर्थिक गुंतवणुकीचं ठिकाण आहे जिथे योग्य अभ्यास करून गुंतवणूक केली तर तो एक करिअर करण्याचा पर्याय ठरू शकतो. शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करतांना ही गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की, कोणत्याही स्वप्नांना, भूलथापांना इथे स्थान नसतं. प्रत्येक गोष्ट ही इथे मार्केट ठरवत असते. तुमचा शेअरमार्केट प्रतिनिधी किंवा मात्र किंवा कोणताही अर्थतज्ज्ञ इथे काहीच घडवू किंवा बिघडवू शकत नाही. यशस्वी लोकांचा केवळ गवगवा करण्याच्या आपल्या मानसिकतेमुळे कित्येक नवीन लोक रोज शेअरमार्केट मध्ये न अभ्यास करता पैसे गुंतवतात आणि नंतर फसवणूक झाली म्हणून नंतर पश्चाताप व्यक्त करतात.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावातील काही लोक सध्या अशाच एका अर्धवट ज्ञान असलेल्या ‘विशाल फटे’ नावाच्या शेअरमार्केट प्रतिनिधीमुळे त्रस्त झाले आहेत. “तुम्ही मला पैसे द्या, मी शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करून ३० टक्के व्याजाने पैसे परत करेल” असं आमिष दाखवून या व्यक्तीने लोकांकडून पैसे लुबाडले आणि आज ५ कोटी रुपये घेऊन तो रातोरात पसार झाला. गुंतवणूकदारांनी निदान इतका तरी विचार करायला हवा की, इतका परतावा देण्यास सक्षम असलेल्या कोणत्या कंपनीत विशाल फटे आपले पैसे लावणार आहे ? जिथे कोणतीच बँक हे व्याज देऊ शकत नाही तर मग हा फटे कोण आहे ?
गुंतवणूक करताना विचार करा
आजकाल ही माहिती काढण्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाहीये हो. आपल्या मोबाईल मधील गुगल आयकॉन मध्ये जाऊन जरी सर्वात जास्त व्याज देणारी आर्थिक गुंतवणूक कोणती ? असा प्रश्न विचारला तरी नक्की योग्य उत्तर मिळेल. विशाल फटे म्हणजे कोणी राकेश झुनझुनवाला किंवा वॉरेन बफेट नाहीये जो ३० टक्के फायदा करून देईल. इतका साधा विचार आपले मेहनतीचे पैसे रोखमध्ये दुसऱ्याला देतांना येऊ नये हे मोठं आश्चर्य आहे.
९ जानेवारीला फरार झालेला विशाल फटे हा १७ जानेवारीला पोलिसांसमोर हजर झाला आहे आणि त्याने आपल्या कुटुंबियांना सोडण्याची विनंती पोलिसांना केली आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर हे सत्य समोर आलं आहे की, त्याने शेअरमार्केट मध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाहीये. तो फक्त लोकांकडून पैसे घ्यायचा आणि ते इकडून तिकडे फिरवायचा. आपल्या सुशिक्षित महाराष्ट्रात हे काय चाललंय ? काय आहे हे प्रकरण ? अर्धवट ज्ञान असल्यावर आपली सुद्धा कशी फसवणूक होऊ शकते ? जाणून घेऊयात.
हेही वाचा – Scam 1992- द हर्षद मेहता स्टोरी…
कोण आहे विशाल फटे ?
‘अलका शेअर्स सर्व्हिसेस’ या नावाने विशाल बार्शी मध्ये एक कंपनी चालवायचा. भरपूर पैसे आहेत, पण ते गुंतवायचे कुठे ? हे ज्ञान नसणाऱ्या व्यक्तींना तो सध्या चांगल्या स्थितीत असलेल्या शेअर्सची माहिती द्यायचा आणि त्यांचे पैसे गुंतवायचा. लोकांचे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये असावेत या हेतूने विशालने ‘विशालका कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘जे.एम. फायनान्शियल सर्व्हिसेस’ या इतर दोन कंपन्या सुद्धा सुरू केल्या होत्या. ‘आयपीओ’ आणि ‘ग्रे मार्केट’ मध्ये तो गुंतवणूक करायचा.
दर रोज २ टक्के नफा होईल, एका महिन्यात ३० ते ३५ टक्के नफा होईल यासारखे आमिष दाखवून त्याने मार्केट मधून पैसे उभे केले. विशाल अंबादास फटे हे नाव पूर्ण बार्शी मध्ये प्रचलित झालं होतं. दीपक अंबारे या आपल्या मित्राला त्याने सर्वप्रथम हे आमिष दाखवलं आणि तो त्याला बळी पडला. स्वतःचे, नातेवाईकांचे पैसे आणून त्याने विशाल फटेकडे जमा केले. सुरुवातीच्या काळात काही योग्य आयपीओ मध्ये पैसे भरून विशालने लोकांना व्याज कमवून देखील दिलं. रोख रक्कम गुंतवणूक करणाऱ्या काही राजकीय नेत्यांसोबत विशाल फटे याने ओळख करून त्यांचे पैसे घेऊन शेअरमार्केट मध्ये गुंतवण्यास सुरुवात केली, त्यांना नफा कमवून दिला. पण, मार्केट थोडीच नेहमी एकसारखं असतं.
“एक वर्षात १० लाख गुंतवा आणि ६ कोटी कमवा”
नेट कॅफे चालवणे हा विशालचा प्रमुख व्यवसाय होता. शेअरमार्केट मध्ये त्याला अल्प ज्ञान होतं आणि खूप जास्त आत्मविश्वास होता. २०१९ पासून शेअरमार्केटचं काम त्याने सुरू केलं आणि काही लोकांना २८ टक्के परतावा त्याने कमावून दिला. “एक वर्षात १० लाख गुंतवा आणि ६ कोटी कमवा” असा एक प्लॅन त्याने लोकांसमोर ठेवला आणि त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई विशालला देऊन टाकली. पण, विशाल फटे हा कोणी अर्थतज्ज्ञ नव्हता. त्याने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांमध्ये त्याला तोटा झाला असावा.
‘हमखास परतावा’ ही सवय लावलेल्या लोकांना तोंड देणं हे त्यानंतर ‘विशाल फटे’ला अशक्य व्हायला लागलं. काही दिवसांपासून त्याने लोकांचे फोन उचलणं बंद केलं आणि आज अशी परिस्थिती आहे की, त्याच्या बार्शी मधील उपळाई रोडवर असलेलं कार्यालय बंद आहे. विशाल फटे, त्याची पत्नी राधिका विशाल फटे, भाऊ वैभव फटे, वडील अंबादास फटे आणि आई अलका अंबादास फटे हे सर्व बार्शी मधून गायब झाले होते.
हेही वाचा – Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?…
लोकांचं काय चुकलं ?
आपण आपल्या कष्टाचा पैसे जेव्हा एखादया शेअरमार्केट प्रतिनिधीला देतो, तेव्हा आपले पैसे कुठे गुंतवले जात आहेत ? परतावा मिळण्यात किती धोका आहे ? प्रतिनिधी हा अधिकृत किंवा अर्थसंस्थांकडून प्रशिक्षण घेतलेला आहे का ? प्रत्येक गुंतवणूकदाराने ही माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशाल फटे सारखे कित्येक लोक आज प्रत्येक गावात आहेत, शहरात आहेत. जे आपल्या बोलण्याच्या पद्धतीतून लोकांना भारावून टाकतात आणि लोक त्यांच्या जाळयात अडकत जातात. दीपक अंबोरे याने ज्याप्रकारे अर्धवट माहिती घेऊन विशाल फटे याला ७०,००० रुपये रोख दिले होते. असे कित्येक प्रकार आज गावोगावी घडत असतात. लोकांच्या सहज विश्वास ठेवण्याच्या आणि अविचारी, हावरट वृत्तीचा विशाल सारखे लोक फायदा घेतात आणि त्यांना १० लाख भरा, ६ कोटी परत मिळतील अशा ऑफर देतात आणि स्वतः श्रीमंत होतात. जागो ग्राहक जागो…
बार्शी मधील लोकांचे पैसे परत मिळतील का ? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. कारण, ९ जानेवारी २०२२ पासून फरार घोषित केलेल्या विशाल फटे याच्यावर गुन्हा दाखल होताच त्याचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. चेकबुक जप्त करण्यात आलं आहे. घर, कार्यालय हे पोलिसांनी सील केलं आहे. उद्या विशाल फटे सापडला तरीही त्याच्यावर इतके गुन्हे दाखल झाले आहेत की, आता त्यातून बाहेर पडणं हेच त्याला कठीण होऊन बसणार आहे. लोकांचे पैसे तो कधी परत देणार ?
गुंतवणूकदारांनी कसं सतर्क रहावं ?
आपल्या नावाने शेअरमार्केट मध्ये होणाऱ्या प्रत्येक गुंतवणुकीचे इमेल, मेसेज आपल्याला येत असतात. आपण दिलेली रक्कम आणि त्याची आलेली पावती ही बरोबर आहे का ? हे तपासून घेतलं पाहिजे. आज झिरोदा सारखे शेअरमार्केट मध्ये स्वतः गुंतवणूक करण्याचे कित्येक सोपे उपाय उपलब्ध आहेत. ही सर्व माध्यम शिकून घेणं आणि मार्केटचा अभ्यास करून मगच पैसे गुंतवणे ही सवय प्रत्येकाने लावली पाहिजे.
हेही वाचा – फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल? लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम …
‘५ कोटींचा फटे घोटाळा’ होण्यासाठी जितका विशाल जबाबदार आहे तितकेच लोक सुद्धा जबाबदार आहेत. विशेष करून तरुणांनो, आपण अशा कोणत्याही घोटाळ्यात न अडकण्यासाठी स्वतःला सावध व्हा, ‘अर्थसाक्षर व्हा’.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies