Term Insurance : टर्म इन्शुरन्स
पुरेसे विमा संरक्षण असणे ही आज काळाची गरज मानली जात आहे. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी विम्यामध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच कमी प्रीमियम भरून जास्त व सुरक्षित विमा संरक्षण मिळत असल्यामुळे टर्म इन्शुरन्स हा उत्तम व लोकप्रिय पर्याय मानला जात आहे.
कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना सर्व माहिती तपासून खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करणे योग्य नाही याची काळजी प्रत्येक जण घेत असतो. टर्म इन्शुरन्स ही एक दीर्घकालीन योजना आहे व टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींचे मूल्यमापन करणे महत्वाचे असते.परंतु सद्ध्या बाजारात अनेक अनेक विमा कंपन्यांचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत यामुळे टर्म इन्शुरन्स ची निवड करणे ग्राहकांना कठीण जाऊ शकते. सर्व गोष्टी पाहता टर्म इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करताना ग्राहकांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.
म्हणून टर्म इन्शुरन्स खरेदी करताना ग्राहकांना पडणाऱ्या काही सामान्य प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी…
१)टर्म इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे का आहे?
टर्म इन्शुरन्स तुमचे व तुमच्या परिवाराचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यास मदत करते. भविष्यात कोणत्या घटनेला आपल्याला सामोरे जावे लागेल हे आत्ताच सांगणे कठीण असते.टर्म इन्शुरन्स पॉलिसीधारकाचा अनपेक्षित दुर्देवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रदान करते.यामुळे पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर परिवाराला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत नाही.
२)टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती?
जेवढ्या लवकर टर्म इन्शुरन्स खरेदी कराल तेवढा जास्त फायदा आहे कारण टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम वय,आरोग्य व विम्याचा कालावधी इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतो.तरुण विमा धारकांना शक्यतो आरोग्य समस्या कमी असतात म्हणूनच जेवढ्या तरुण वयात टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यात येतो तेवढा कमी प्रीमियम असतो. यामुळेच भविष्याचा विचार करता लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
३)आत्ता खरेदी केलेला टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम भविष्यात बदलण्याची शक्यता असते का?
विमा कंपनीच्या पॉलिसी दस्ताऐवजात असा उल्लेख असेल तरच प्रीमियम मध्ये बदल होण्याची शक्यता असते. अथवा टर्म इन्शुरन्स खरेदीनंतर पॉलिसीधारकाला काही गंभीर आजार झाल्यास किंवा पॉलिसीधारकाला धूम्रपान किंवा मद्यपानाचे व्यसन लागल्यास विमा कंपनी द्वारे लोडींग चालू होते त्यामुळे प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता असते.
४)अपघाती मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्स क्लेम करता येतो का?
बहुतेक पॉलिसीमध्ये पॉलिसी कालावधीत झालेले अपघाती मृत्यू कव्हर केले जातात. आजारपणामुळे, अपघातामुळे किंवा नैसर्गिक रित्या झालेले मृत्यू मध्ये टर्म इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत पॉलिसीच्या लाभार्थ्याला विम्याची रक्कम मिळते.
५)कोणत्या प्रकारचे मृत्यू टर्म इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केले जात नाहीत?
दहशतवादी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू तसेच त्सुनामी किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मृत्यू टर्म इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जात नाहीत या प्रकारांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा प्रकारच्या मृत्यूमध्ये विम्याची रक्कम मिळत नाही हे बऱ्याच ग्राहकांना माहीत नसते त्यामुळे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा – Health Insurance: कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे…
६)विमाधारकाचा भारताबाहेर मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्स लागू होतो का?
होय, विमाधारकाचा भारताबाहेर देखील मृत्यू झाल्यास विमा संरक्षण लागू होते. परंतु यासाठी पॉलिसीधारकाने भारताबाहेर असलेल्या वास्तव्याची माहिती विमा कंपनीला देणे गरजेचे असते.
७)भविष्यात पॉलिसीधारकाने धुम्रपान करण्यास सुरुवात केल्यास कोणते बदल होतात?
टर्म पॉलिसी खरेदीनंतर विमाधारकाला धूम्रपान किंवा मदयपान यांसारखे आरोग्यास हानिकारक असणारे व्यसन लागल्यास याची माहिती विमा कंपनीला देणे गरजेचे असते. कारण विमा कंपनी तुम्ही भरत असणाऱ्या प्रीमियमवर लोडिंग लागू करते. जर ही माहिती वीमा कंपनीपासून लपवली असल्यास दावा नाकारला जाण्याची शक्यता असते.
८)अनिवासी भारतीय व्यक्तीला टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याची परवानगी असते का?
अनिवासी भारतीय व्यक्ती टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यास पात्र आहे परंतु त्यासाठी विमा कंपनीकडून काही अटी व शर्ती असतात. यासाठी भारतातील रहिवासी पुरावा, ओळखपत्र, वयाचा पुरावा,अॅड्रेस प्रूफ इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. तसेच मागील ३ वर्षांचा आयकर पुरावा किंवा फॉर्म-१६ अशी कागदपत्रे देखील गरजेची असतात.
९)एका व्यक्तीस दोनपेक्षा जास्त पॉलिसीचे दावे करता येतात का?
अशा प्रकारामध्ये दुसरी पॉलिसी चालू असल्याचे विमा कंपनीच्या प्रपोजल फॉर्ममध्ये स्पष्ट करणे गरजेचे असते. पॉलिसीचा दावा करण्याच्या वेळी जास्त कालावधीची पॉलिसी असलेल्या विमा कंपनीला मृत्युपत्र सादर करावे लागते यामुळे फॉर्म भरताना योग्य माहिती भरल्याची खात्री करणे गरजेचे आहे यामुळे नंतर काही समस्या निर्माण होत नाहीत.
१०)टर्म इन्शुरन्स साठी योग्य कालावधी काय असावा?
प्रत्येक व्यक्तीसाठी टर्म इन्शुरन्सचा योग्य कालावधी वेगळा असू शकतो कारण टर्म इन्शुरन्स साठी कालावधी निवडताना पॉलिसी धारकाचे वय तसेच त्याचे सध्याचे उत्पन्न व आर्थिक गरज म्हणजे किती प्रीमियम भरता येऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. पॉलिसीधारकाला त्याच्या रिटायरमेंट पर्यंत टर्म इन्शुरन्स कव्हर असणे आवश्यक ठरू शकते.
हेही वाचा – Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स…
११)टर्म इन्शुरन्स मध्ये इन्कम टॅक्स बेनिफिट मिळते का?
आयकर कायदा कलम ८०सी अंतर्गत टर्म इन्शुरन्स मध्ये भरलेल्या प्रीमियम रक्कमेवर कर लाभ घेता येतो.
वरील प्रश्न उत्तरे योग्य टर्म इन्शुरन्स निवडण्यात नक्कीच मदत करतील.