ITR: मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र?
मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र (ITR), हे शीर्षक वाचून धक्का बसला का? पण या धक्क्यातून सावरला असाल, तर आजच्या लेखातील यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींची माहिती व्यवस्थित समजून घ्या.
जीवनातील अंतिम सत्य कोणते? या यक्षप्रश्नाचे युधिष्ठिराने दिलेले उत्तर ‘मृत्यू’ असे आहे. जन्माला आलेला जीव मरणारच त्याची मृत्यूवाचून सुटका नाही. अशाच प्रकारचे विधान कर (Tax) यासंदर्भात व्यक्तीविषयी केले जाते ते म्हणजे ‘मृत्यू आणि कर यापासून कोणाचीही सुटका नाही’. याचबरोबर ‘करदाता मृत झाला तरी त्याची करावाचून सुटका नाही’ असं विधान मी केलं तर ते आपल्याला कदाचित विस्मयकारक वाटले तरी सत्य आहे.
हे नक्की वाचा: मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?
ITR: मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र भरावे लागते का?
एखादी व्यक्ती मृत झाली व तिचे उत्पन्न करपात्र असेल तर संबंधित वर्षाचे आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. मृत्यूच्या दिवसापर्यंत मिळालेल्या उत्पन्नासाठी त्याचा कायदेशीर वारस/प्रतिनिधीने त्याच्या वतीने विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीच्या वतीने आयकर विवरणपत्र भरण्यासाठी त्याच्या कायदेशीर वारसास आयकर विभागाच्या संकेतस्थळावर नोदणी करावी लागेल यासाठी काय काय करावे लागेल याविषयीची माहिती जाणून घेऊयात.
कायदेशीर वारस कुणाला म्हणायचे?
- मृत व्यक्तीच्या मालमत्तेचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणजे त्याची कायदेशीर वारस. कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी खालील गोष्टी ग्राह्य धरल्या जातात.
- सन्माननीय न्यायालयाने दिलेले वारसा प्रमाणपत्र.
- स्थानिक महसूल अधिकाऱ्याने दिलेले वारसा प्रमाणपत्र.
- स्थानिक महसूल अधिकाऱ्याने राहिलेल्या वारसांना दिलेले प्रमाणपत्र.
- मृत्युपत्राद्वारे निश्चित केलेले वारस.
- कुटुंब निवृत्ती वेतनपत्रावर नोंद असलेले वारस.
- आयकर विवरणपत्र भरण्यासाठी सहज मिळू शकणारे वारसा प्रमाणपत्र हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळू शकते.
- अनेकदा ते इंग्रजी अथवा हिंदी शिवाय प्रादेशिक भाषेत असू शकते असे असल्यास वारसाने त्याचा अनुवाद करून तो सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घ्यावा.
विशेष लेख: Intestate: मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप
आयकर विभागाकडे वारस म्हणून नोंदणी कशी करायची?
- एखाद्या व्यक्तीच्या वतीने विवरणपत्र भरण्यासाठी आयकर विभागाकडे नोदणी करणे आवश्यक आहे. यासाठी मृत व्यक्ती व वारस या दोघांच्या कायम नोदणी क्रमांकाची (PAN) आवश्यकता असते.
- जर मृत व्यक्तीचा पॅन आयकर नोंदवला नसेल तर तो नोंदवता येतो. विवरणपत्र दाखल करण्यासाठी वारस नोंद खालील कृती क्रमशः कराव्यात.
- विभागाच्या इ फायलिंग पोर्टलवर जावे.
- आपल्या पॅन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे.
- यानंतर my account या विभागात जाऊन वारस/ प्रतिनिधी म्हणून नोंद करावी करण्यासाठी, विनंती प्रकार म्हणून नवीन विनंती new request वर क्लीक करावे.
- यानंतर आपली वारस/ प्रतिनिधी नोंद करावी व त्याचा प्रकार नोंदवताना मृत व्यक्तीच्या वतीने असे म्हणावे.
- यानंतर येणाऱ्या पानावर मृत व्यक्तीची माहिती भरावी. यासोबत मृत्यू दाखला, मृत व्यक्तीचा पॅन, स्वतःचा साक्षांकित पॅन, वारसा प्रमाणपत्र हे 1MB पेक्षा कमी आकारांच्या झिप फाईल मध्ये साठवून ही फाईल अपलोड करावी.
- यानंतर सबमिटवर क्लिक केले असता त्याची पोहोच मिळेल.
महत्वाचा लेख: नॉमिनी विरुद्ध कायदेशीर वारसदार, मालकी हक्क कोणाचा?
नोंदणीस मान्यता:
- वरील प्रक्रिया पूर्ण केली असता सर्व माहिती इ- फायलींग नियंत्रकास मिळेल. यावर कारवाई होऊन त्यावरील मंजुरीचा निर्णय कळवण्यात येईल. ही विनंती मान्य झाल्यावर मृत करदात्याच्यावतीने विवरणपत्र भरता येईल.
- ज्याप्रमाणे करदाता आपले नियमित विवरणपत्र भरतो त्याचप्रमाणे मृत करदात्यांच्या वतीने त्याला आयकर विवरणपत्र दाखल करता येईल.
- मृत करदात्याच्या उत्पन्नाची मोजणी करताना त्याचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न विचारात घ्यावे लागते याची विभागणी दोन भागात होईल.
- करदात्याचा मृत्यू होण्याच्या तारखेपर्यंतचे उत्पन्न व त्यानंतर आर्थिक वर्ष संपेपर्यंतचे उत्पन्न. यातील करदात्यांच्या मृत्यूनंतर मिळालेले उत्पन्न हे त्यांच्या वारसांच्या उत्पन्नात त्यांच्या वारसा हक्कानुसार मिळवला जाईल.
- यातील कायदेशीर वजावटी दोघांनाही घेता येतील. मृत व्यक्तीच्या वतीने कर भरण्याची, यापूर्वीच्या वर्षांचा कर भरण्याची जबाबदारी त्यांच्या वारसांची असते. मात्र ही जबाबदारी मर्यादित स्वरूपाची आहे, ही जबाबदारी वारसाला वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या किमतीतून अधिक नसते.
- अशा मालमत्तेवर वारसांना कोणताही कर भरावा लागत नाही. यानंतरच्या आर्थिक वर्षासाठी मृत व्यक्तीच्या मालमत्तेपासून वारसांना मिळालेले उत्पन्न हे पूर्णपणे वारसांचे उत्पन्न समजले जाते त्यानुसार उत्पन्नाची मोजणी करून कर द्यावा लागतो.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: ITR filing for dead person Marathi Mahiti, ITR filing For the dead in Marathi, ITR Marathi, How to file ITR of dead person Marathi, does the deceased have to file an income tax return Marathi Mahiti
1 comment
अतिशय उपयुक्त माहिती, फार छान सर