इंटरनेटसंबंधी धोरण
https://bit.ly/2KXqofo
Reading Time: 4 minutes

Budget 2021: इंटरनेटसंबंधी क्रांतिकारी धोरण? 

अर्थसंकल्प  २०२१ मध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांबरोबरच इंटरनेटसंबंधी धोरण जाहीर केले जाऊ शकते. इंटरनेटने आधीच जगाला अधिक गती दिली होती, आता कोरोना संकटाने त्याच्या वापराची अपरिहार्यता लक्षात आणून दिली आहे. पण त्यातून ते वापरणारे आणि ते न वापरणारे, असा विषमतेला खतपाणी घालणारा भेद निर्माण झाला आहे. इंटरनेट सर्वांपर्यंत पोचणे आणि सर्वांना ते परवडणे, हे आव्हान त्यातून उभे राहिले असून उद्याच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भातील सर्वसमावेशक आणि तेवढेच क्रांतिकारी धोरण जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे. 

विशेष लेख: Budget: अर्थसंकल्पाचा इतिहास

Budget 2021: अर्थसंकल्पात इंटरनेटसंबंधी धोरण? 

  • गेल्या वर्षभराच्या अभूतपूर्व परिस्थितीत एक फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एका विषाणूने जगात जी उलथापालथ घडवून आणली, त्याला इतिहासात तोड नाही.
  • या संकटाचे जगावर अनेक वाईट परिणाम झाले आहेत तसे काही चांगलेही परिणाम झाले आहेत. अर्थात, वाईट परिणाम अधिक आहेत.
  • अनेकांना बसलेले मानसिक आणि आर्थिक धक्के हे त्यांचे जीवन व्यापून टाकणारे आहेत. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे.
  • त्यातील मानसिक गरज भागविण्याचे काम समाज, कुटुंब आणि नातेवाईकांनी करावयाचे असते, तर आर्थिक गरज भागविण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती गरज भागविण्यासाठी केंद्र सरकारने काही पॅकेजच्या मार्गाने काही योजना पूर्वीच जाहीर केलेल्या असून त्यांचा अनेकांना आधार झाला आहे. मात्र, गरज इतकी प्रचंड आहे की आणखी बरेच काही करण्याची गरज आहे.
  • देशाचा वर्षाचा ताळेबंद असणाऱ्या अर्थसंकल्पाकडून त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. हा अर्थसंकल्प खूपच वेगळा असेल, असे अर्थमंत्र्यांनी स्वत: जाहीर केल्याने देश त्याची आतुरतेने वाट पाहतो आहे. 

इंटरनेटच्या स्वीकारला पर्याय नाही 

  • गेल्या वर्षभराच्या संकटात सगळ्यात मोठा झालेला बदल कोणता असेल तर तो म्हणजे आता मोकळेपणाने फिरता न येणे आणि कोणाला पूर्वीसारखे भेटता न येणे.
  • नागरिकांनी एकत्र येण्याचे जे जे उपक्रम होते, ते सर्वच थांबवावे लागले आहेत. त्यातील काही आता आता कोठे सुरु होताना दिसत आहेत. हे सर्व थांबले असताना अनेक व्यवहार सुरु राहिले, याचे सर्व श्रेय इंटरनेट या तंत्रज्ञानाला जाते.
  • अनेक उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये याच्याशी संबंधित उपक्रम केवळ इंटरनेटमुळे सुरु होते आणि आजही त्यात फार फरक पडलेला नाही.
  • इंटरनेट तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात एवढी महत्वाची भूमिका बजावेल, याची कोणालाच कल्पना नव्हती. पण आज ती जीवनावश्यक सेवा झाली आहे. त्याच्या माध्यमातून समाजात ज्या चुकीच्या गोष्टींचा शिरकाव होतो आहे, त्याचे काय करावयाचे, याचा निर्णय समाज भविष्यात घेतच राहील. पण जी कामे सुलभ आणि सुटसुटीत होत आहेत, ती समाज स्वीकारताना दिसतो आहे, हे महत्वाचे.
  • ऑनलाईन शॉपिंग आणि डिजिटल आर्थिक व्यवहार हे त्याचे उदाहरण आहे. कार्यालये आणि शाळा महाविद्यालयांचे कामकाज याकाळात इंटरनेटच्याच मार्गाने सुरु ठेवण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्याला आलेल्या मर्यादाही लक्षात आल्या.
  • अर्थात, सर्व व्यवहार दीर्घकाळ थांबवून चालणार नाही, त्यामुळे इंटरनेटच्या या मार्गानेच पुढे जावे लागेल, हेही सर्वानी याकाळात मान्य केले. 

‘डिजिटल इंडिया’साठी विक्रमी तरतूद?

  • आता या बदलाची खरी कसोटी सुरु झाली आहे. ती म्हणजे इंटरनेटची सुविधा सर्वांपर्यंत अजून पोचलेली नाही तसेच ती सर्वांना परवडेल, अशी स्थिती अजून आलेली नाही. याचा अर्थ जे इंटरनेट घेवू आणि वापरू शकतात, त्यांनी आपल्या जीवनाला याही काळात वेग दिला आणि आपला शक्य असेल तो फायदा करून घेतला तर ज्यांना ते वापरता येत नाही आणि परवडतही नाही, ते नागरिक मागे पडले.
  • समाजात अनेक निकषांच्या आधारे जे अनेक थर तयार झाले आहेत, त्यात आणखी एका भेदाची त्यामुळे भर पडली आहे. हा भेद कमी करण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची गरज आहे. पैसा हा सर्वात निरपेक्ष असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे सरकार भेदभाव कमी करण्यासाठी तो मार्ग वापरते.
  • इंटरनेटचा वापर सर्वांना करता यावा, यासाठी सरकारने आतापर्यंत भरपूर प्रयत्न केले आहेत. म्हणूनच अनेक देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेट स्वस्त आहे. पण आताच्या विशिष्ट स्थितीत सरकारला या प्रयत्नांना अधिक गती द्यावी लागणार आहे. त्यासंदर्भाने उद्याच्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी केल्या जातात, हे महत्वाचे ठरणार आहे.
  • डिजिटल इंडियासाठी दोन वर्षांपूर्वी असलेली १४ हजार कोटी रुपयांची तरतूद गेल्या वर्षी ५९ हजार कोटी रुपयांवर गेली होती. त्याचाच परिणाम म्हणजे भारत कोरोनाकाळात जगासोबत अनेक व्यवहार सुरु ठेवू शकला आहे. आपल्या देशाचा विस्तार लक्षात घेता आपण कमी काळात इंटरनेट वापरत मोठीच झेप घेतली आहे.
  • या अर्थसंकल्पात डिजिटल इंडियासाठी विक्रमी तरतूद केली जाईल, असे अनुमान करता येते, त्याचे कारण हेच आहे. 

महत्वाचा लेख: भांडवल आणि तंत्रज्ञानाची मशागतच देईल बरकत! 

इंटरनेटनेही वाढविली विषमता 

  • अर्थात, डिजिटल विषमता कमी करण्यासाठी केवळ डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून उपयोग नाही. त्याचा वापर अधिकाधिक नागरिक कसे वापरू शकतील, याचा विचार करावा लागेल. उदा. कोरोनाच्या काळात शाळा आणि महाविद्यालये स्मार्ट फोनच्या माध्यमातून चालू ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ज्यांच्याकडे असा फोन आहे, त्यांनाच त्यात भाग घेता आला. ज्यांच्याकडे एक फोन आहे आणि दोन मुले आहेत, त्यांना अडचण आली.
  • शाळेचे उदाहरण लगेच लक्षात येते म्हणून, नाहीतर जीवनाच्या सर्व क्षेत्रात इंटरनेट वापरू शकणारे पुढे निघून जात आहेत.
  • याचा अर्थ या प्रश्नाला दोन्ही बाजूने भिडावे लागेल, एकतर वेगवान इंटरनेट सर्वत्र कसे उपलब्ध करता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि दुसरीकडे ज्यांचे दरडोई उत्पन्न कमी आहे, त्यांना त्यासाठी सवलत द्यावी लागेल.
  • सर्व खेड्यांना वीज पोचली पाहिजे आणि ती नियमित मिळाली पाहिजे, सर्वांना स्वत:चे घर घेता आले पाहिजे, विजेची बचत व्हावी, यासाठी एलइडी दिवे घराघरात वापरले गेले पाहिजे, अशा ज्या योजना सरकारने राबविल्या आहेत, तशा काही योजना सरकारला आता इंटरनेटच्या वापरासाठी राबवाव्या लागतील.
  • सर्वांपर्यंत वीज पोचण्यासाठी सात दशके लागली, सर्वांचे स्वत:चे घर अजून होते आहे. याचा अर्थ त्या योजना दीर्घकाळ चालल्या. मात्र इंटरनेटचा प्रसार आणि त्याची किंमत कमी होण्यासाठी अधिक काळ घेऊन उपयोग होणार नाही.
  • सुदैवाने जेव्हा अशा सेवांचा वापर भारतात वाढतो किंवा अशा वस्तूंची विक्री वाढते, तेव्हा त्यांची किंमत लोकसंख्येच्या लाभांशाचा फायदा मिळून कमी होते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. (उदा. स्मार्टफोन, एलइडी दिवे) म्हणूनच या संदर्भाने उद्याच्या अर्थसंकल्पात आमुलाग्र अशा निर्णयाची अपेक्षा आहे. 

 महत्वाचा लेख: तंत्रज्ञान – संपत्तीच्या केंद्रीकरणाचा ‘मेगा हायवे’ ! 

इंटरनेटसंबंधी क्रांतिकारी धोरण – उद्या घोषणा ? 

  • इंटरनेटचा वापर आणि डिजिटल आर्थिक व्यवहार याविषयी अजूनही काही नागरिक साशंक दिसतात. अशा नागरिकांचे दोन वर्ग पडतात. काही नागरिक, ते परवडत नाही किंवा त्यांना ते करता येत नाहीत, म्हणून साशंक असतात आणि ते समजण्यासारखे आहे. मात्र काही नागरिक प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाला विरोध करायचा म्हणून साशंक असतात.
  • अशा वर्गातील नागरिकांनी १९९१ पासून सुरु असलेले जागतिकीकरण, २००० पासून वेग घेतलेले संगणकीकरण आणि २०१४ पासूनच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांना विरोध करून स्वत:च्या पायावर तर धोंडा पाडून घेतलाच, पण सर्वसामान्य नागरिकांचीही फसवणूक केली.
  • नव्या तंत्रज्ञानासोबत वाढत चाललेल्या विषमतेविषयी बोलले पाहिजे, याविषयी दुमत नाही. पण ती कमी कशी करता येईल, याचे व्यवहार्य मार्ग सांगण्याचे धाडस करण्याची आज गरज आहे.

अर्थसंकल्पात इंटरनेटसाठी वाढविण्यात येत असलेली तरतूद आणि त्याविषयी सरकार करत असलेले प्रयत्न पाहता सरकार हा भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. पण ते बदलत्या परिस्थितीत पुरेसे ठरत नसल्याने त्याला एका व्यापक, सर्वसमावेशक आणि तेवढ्याच क्रांतिकारी धोरणाची गरज आहे. ती गरज उद्याचा अर्थसंकल्प कशी पूर्ण करणार, याचे उत्तर उद्या मिळते का, ते पहायचे. 

– यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Internet policy in Budget 2021 Marathi Mahiti, Internet policy in Budget 2021 in Marathi, Possibility of Internet policy in Budget 2021 Marathi,  Budget 2021 Internet policy Marathi mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.