अर्थसंकल्पाचा (बजेटचा) इतिहास

Reading Time: 2 minutes

बजेट किंवा अर्थसंकल्प ही मूळ संकल्पना ब्रिटिशांची आहे. ‘बजेट’ हा शब्द अर्थशास्त्राशी निगडित असल्यामुळे असेल बहुदा पण हा शब्द काहीसा क्लिष्ट वाटतो. पण या क्लिष्ट शब्दाचा इतिहास मात्र काहीसा रंजक आहे. 

  • बजेट हा शब्द मुळात अस्तित्वातच नव्हता. हा शब्द बॉगेट (bowgette) या शब्दाचा अपभ्रंश आहे. सन १७३३ मध्ये ब्रिटनमध्ये अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोल यांनी ‘लेदर बॅग’ घेऊन अर्थसंकल्प सादर करायला सुरूवात केली. लेदर बॅगेला फ्रेंच भाषेत ‘बोजोट’ किंवा ‘बुगेट’ असं म्हटलं जातं, त्यावरून पुढे ‘बजेट’ शब्दाचा उगम झाला. पुढे  देशाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्याच्या प्रक्रियेला ‘बजेट’ हेच नाव दिलं गेलं. 
  • अर्थसंकल्पाची कागदपत्रे आणण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सुटकेस वापरली जाते. ही बॅग नेहमी लाल रंगाच्या शेडमधली असते. 
  • अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी संसदेत सादर केला होता. हा अर्थसंकल्प जी. डी. बिर्ला, आर. जे. टाटा व जॉन मथाई या तिघांनी मिळून, १९४४ च्या ‘बाँबे प्लॅन’च्या धर्तीवर तयार केला होता. परंतु हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये फक्त देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक धोरण मांडण्यात आले नव्हते.
  • त्यानंतर सन १९५५-५६ मध्ये रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आणि तत्कालीन अर्थमंत्री चिंतामण देशमुख (सी.डी.) यांनी प्रथमच हिंदीमधून अर्थसंकल्प सादर केला.
  • त्यांनतरचे अर्थमंत्री टी.टी. कृष्णाम्मचारी यांनी अर्थसंकल्पात कर संकल्पनेला म्हणजेच  कराद्वारे सरकार दरबारी पैसा जमा करण्यावर भर दिला. देशमुखांनी अर्थसंकल्पात दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून कराद्वारे पैसा उभा करणे हे खूप गरजेचे होते. त्यामुळे कृष्णाम्मचारी यांनी ‘कर’ या मुद्द्यावर भर दिला. 
  • त्यांनतर भारतीय अर्थविश्वात एक आगळीच घटना घडली. त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू व कृष्णाम्मचारी यांच्यामध्ये मतभेद झाल्यामुळे कृष्णाम्मचारी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सन १९५८-५९ चा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी म्हणजेच पंडित नेहरू यांनी सादर केला आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या प्रथेला पहिल्यांदा छेद दिला गेला.
  • त्यानंतर काही वर्षांनी कृष्णाम्मचारी पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले. त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी कररचनेला महत्व दिलं होतं. तर दुसऱ्यावेळी, “स्वेच्छेने संपत्ती जाहीर करण्याची योजना आणली.” त्यामुळे जनतेने मोठ्या प्रमाणावर आपली छुपी संपत्ती जाहीर केली.
  • सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. त्यांनी एकूण दहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. यामध्ये दोन अंतरिम तर आठ वार्षिक अर्थसंकल्पाचा समावेश आहे. 

बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार अर्थसंकल्पातही वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जाऊ लागला. सुरवातीच्या काळात फक्त कृषी क्षेत्राचा विचार करून अर्थसंकल्प तयार करण्यात आले होते. त्यांनतर हळूहळू बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार कर, उद्योग, बचत, महागाई दर यासारख्या गोष्टींवरही अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आला.

गेल्या दहा पंधरा वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय बदल होत गेले आहेत. सुरवातीला फक्त कृषी क्षेत्राचा विचार करून बनविण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये  आज जागतिक घडामोडींचा विचार करून विविध योजना राबविण्यात येत आहेत. एक आदर्श जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने देश आगेकूच करत आहे. 

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?,

२०१९ चा अंतरिम अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था,

 अर्थसंकल्प – ‘युबीआय’ च्या गरजेवर प्रथमच शिक्कामोर्तब भाग १,

बजेट २०१९ : तुम्हाला माहिती असायलाच हवे असे काही

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]