व्हीपीएफ (VPF)
व्हॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (व्हीपीएफ -VPF) म्हणजेच ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ, एनपीएफ या पर्यायांमागे काहीसा झाकोळला गेलेला हा पर्याय तुम्हाला पीपीएफ पेक्षाही जास्त लाभदायक ठरू शकतो. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.
ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधी (VPF) काय आहे?
- या योजनेचा लाभ कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीची म्हणजेच ईपीएफ (EPF) सुविधा घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना घेता येतो.
- ईपीएफ योजनेमध्ये, कर्मचाऱ्याला त्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात मूळ वेतनाच्या १२% योगदान द्यावे लागते, तर १२% योगदान नियोक्त्यामार्फत देण्यात येते.
- व्हीपीएफ योजनेनुसार कर्मचारी १२% योगदानापेक्षा जास्त रक्कम ईपीएफ खात्यामध्ये जमा करु शकतो.
- मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून जेवढी रक्कम होईल तेवढी रक्कम कर्मचारी ईपीएफ खात्यामध्ये अधिकचे योगदान म्हणून जमा करू शकतो. परंतु, याचा अर्थ असा नाही की तुमच्या नियोक्त्यानेही अधिकची रक्कम भरावी. नियोक्त्याची जबाबदारी १२% पर्यंतच मर्यादित आहे.
- बहुतेक कंपन्या व्हीपीएफ संदर्भातील बदल वर्षातून एकदाच संबंधित आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला करतात. त्यामुळे तुमच्या कार्यालयातील संबंधित खात्याकडे यासंदर्भात मार्चमध्ये विचारणा करून कारवाही सुरु करा. जेणेकरून तुम्ही एप्रिलपासून योगदान सुरु करू शकता.
हे नक्की वाचा: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी लोकप्रिय का आहे?
VPF and EPF: व्हीपीएफ आणि ईपीएफ?
- दोन्ही जवळपास सारखेच! व्हीपीएफ द्वारे देण्यात आलेले योगदानहे ईपीएफ योगदान मानले जाते. फार फार तर तुम्ही असे म्हणता येईल की व्हीपीएफ म्हणजे ईपीएफ खात्यासाठी मिळणारी विस्तारित सुविधा आहे.
- व्हीपीएफ हा ईपीएफ खात्यातच जमा केला जातो. तसेच, ईपीएफमधून व्याजदर/कर्ज/हस्तांतरण/पैसे काढण्यासाठी लागू होणारे सर्व नियम व्हीपीएफवर देखील लागू होतात.
VPF: ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणूक करमुक्त आहे का?
- ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीप्रमाणेच कर लावला जातो. याचा अर्थ असा की ईपीएफ प्रमाणे व्हीपीएफ योजनेमधील गुंतवणूक EEE कॅटेगरीत येते. याचा अर्थ या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.
- व्हीपीएफ मधील गुंतवणूक करमुक्त आहे. परंतु जर ५ वर्ष पूर्ण होण्याआधीच खात्यातून मोठी रक्कम काढली तर, ती रक्कम करपात्र होईल.
- व्हीपीएफ गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८० सी नुसार करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय आहे. कर वाचवण्यासाठी १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
महत्वाचा लेख: उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस
VPF v PPF: व्हीपीएफ वि पीपीएफ
कर बचत आणि निवृत्ती नियोजनासाठी सार्वजनिक भविष्य निधी सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. परंतु, व्हीपीएफ योजनेला प्राधान्य देण्याची काही कारणे-
- पीपीएफमध्ये दीड लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. व्हीपीएफच्या बाबतीत, तुम्ही कलम 80 सी कमाल मर्यादेचा विचार करून जास्तीची गुंतवणूक करू शकता.
- पीपीएफचे योगदान निश्चित असते तर, व्हीपीएफ मधील योगदान तुमचे योगदान तुमच्या पगाराच्या प्रमाणात वाढवता येते.
- व्हीपीएफ योजनेमध्ये पीपीएफ गुंतवणुकीपेक्षा पेक्षा जास्त व्याज मिळते.
- तुम्हाला पैशांची गरज असल्यास व्हीपीएफ मधील पैसे एका दिवसात काढता येऊ शकतात. पीपीएफ खात्यासाठी १५ वर्षांचा लॉक इन कालावधीचा नियम आहे. त्याआधी रक्कम काढायची असल्यास केवळ आंशिक रक्कम काढता येते.
- व्हीपीएफचा पर्याय केवळ नोकरदार वर्गाला लागू होतो. त्यातही २० पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या कार्यालयांना ईपीएफ बंधनकारक आहे. तर पीपीएफ अंतर्गत कोणतीही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकते.
- व्हीपीएफ वर्षातून एकदाच निश्चित करता येतो. पीपीएफ खात्यामध्ये आपण कोणत्याही महिन्यात जास्तीची रक्कम भरू शकतो.
- सरकारमार्फत ईपीएफ आणि पीपीएफ खात्यासाठीचे व्याजदर बदलले जाऊ शकतात.
कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती नियोजन आणि करमुक्त परतावा देणारा व्हीपीएफ हा चांगला पर्याय आहे आणि विशेषतः पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या पर्यायाचा विचार करावा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: VPF in Marathi, VPF Marathi Mahiti, Voluntary Provident Fund in marathi, Voluntary Provident Fund Marathi Mahiti