उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

Reading Time: 3 minutes

म्युच्युअल फंड म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी वाटते तर काहींना दिवाळखोरीचं लक्षण वाटतं. समज- गैरसमजाच्या  या चक्रात अडकलेल्या अनेकांनी म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? याचबद्दल पुरेशी माहिती नसते. तर अनेकांना म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्तम परताव्यासोबत कर बचतही करते या गोष्टीची माहिती नसते. जानेवारी ते मार्च  हा कालावधी म्हणजे आपल्या कर नियोजनाचा कालावधी असतो. या दरम्यान सर्वात जास्त महत्व असतं ते करबचत करणाऱ्या गुंतवणुकीला.

जर एखादी गुंतवणूक करबचतीसोबत उत्तम परतवा देत असेल तर अशा योजनेत गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर असतं. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स म्हणजेच ईएलएसएस (ELSS) हा असाच एक पर्याय आहे. हा पर्याय करबचतीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

इएलएसएस (ELSS):

 • म्युच्यअल फंड गुंतवणुकींपैकी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम (ELSS) हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. हे फंड समभागांमध्ये (Equity) गुंतवणूक करतात.
 • यामध्ये गुंतवणूकदाराला दोन पर्याय उपलब्ध असतात. १. लाभांश आणि २. वृद्धी.  
 • गुंतवणूकदार त्याच्या इच्छेने कोणताही पर्याय निवडू शकतो.
 • ईएलएसएसमध्ये कर बचतीसाठीची गुंतवणूक मर्यादा रु. १,५०,०००/- इतकी आहे म्हणजेच गुंतवणूकदार यामध्ये  दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
 • ईएलएसएस हा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा  (Long Term Investment ) एक उत्तम पर्याय असून यामध्ये गुंतवलेली रक्कम समभागांमध्ये (Equity) गुंतवली जात असल्यामुळे यामधून चांगला परतावाही (Returns) मिळतो.
 • असे असले तरीही ही एक म्युच्युअल फंड योजना आहे. त्यामुळे अन्य म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच निश्चित परताव्याची कोणतीही हमी या योजनेमध्येही मिळत नाही.

ईएलएसएस गुंतवणूक (ELSS Investment)

 • यामध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रियाही इतर म्युच्युअल फंड योजनांप्रमाणेच आहे.
 • यामधील सर्वात आधी गुंतवणूकदाराची केवायसी (KVC) पूर्तता करणे आवश्यक आहे.
 • त्यांनतर आवश्यक ते अर्ज भरून चेकच्या माध्यमातूनही ही गुंतवणूक करता येते.
 • म्युच्युअल फंडच्या वेबसाइटवर जाऊन किंवा अन्य खात्रीशीर ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन म्युच्युअल फंड गुंतवणूक करता येते.
 • एसआयपी (SIP) अथवा एसटीपी (STP)पद्धत वापरून ईएलएसएस गुंतवणूक करता येते.

ईएलएसएस गुंतवणूक आणि करबचत:

 • ईएलएसएस गुंतवणूकीसाठी लॉक-इन (Lock- in) कालावधी हा तीन वर्षांचा असतो. गुंतवणूक करताना तुम्ही लाभांश (Dividend) हा पर्याय  निवडलेला असल्यास योजना कालावधीमध्ये उत्पन्न सुरू होते.
 • आयकर कायदा १९६१, कलम ८० सी अन्वये ज्यांचे करपात्र (Taxable) उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त संस्था (HUF) चालू आर्थिक वर्षासाठी कमाल दीड लाख रुपयांपर्यंत ईएलएसएस गुंतवणूक करू शकतात.
 • ईएलएसएस गुंतवणूकीतून मिळणाऱ्या लाभांशावर (Divident) कर भरावा लागत नाही. तसेच काही आर्थिक अडचणींमुळे गुंतवणुकीदरम्यान काही रक्कम काढावी लागली तर या रकमेवरही कर भरावा लागत नाही.
 • ईएलएसएस फंडात गुंतवणूक करून वर्षाला जास्तीत जास्त रु. ४६,३५०/-  रुपयांपर्यंत करबचत करता येणे शक्य आहे.

ईएलएसएस वि. अन्य करबचत योजना:

 • लॉकइन कालावधी:
  • ईएलएसएस गुंतवणुकीसाठी  लॉकइन कालावधी सर्वात कमी म्हणजेच  तीन वर्षांचा असतो.
  • हा कालावधी अन्य करबचत योजनांच्या तुलनेत खूप कमी आहे.
   • सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) – १५ वर्षे
   • कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (EPF)- निवृत्तीपर्यंत  
   • राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) – गुंतवणूकदाराच्या ६० वर्षे वयापर्यंत
   • अन्य करबचत योजना – साधारणतः ५ वर्षांपासून पुढे
 • आर्थिक अडचणींमध्ये रक्कम काढावी लागल्यास:
  • काही आर्थिक अडचणींमुळे गुंतवणुकीदरम्यान काही रक्कम काढावी लागल्यास गुंतवणूकदार रक्कम काढू शकतो.
  • पीपीएफ वगळता अन्य पर्यायांमध्ये अशी रक्कम काढता येत नाही.
   • ईपीएफ-  नोकरी सुरू असेपर्यंत रक्कम काढता येत नाही .
   • राष्ट्रीय पेन्शन योजना – गुंतवणूकदाराच्या ६० वर्षे वयापर्यंत नाही.

ईएलएसएस गुंतवणुकीमधील लॉक इन पश्चातचे पर्याय:

तीन वर्षांच्या लॉक इन कालावधीनंतर म्युच्युअल फंडांतील युनिट्स त्या योजनेतच ठेवण्याचा पर्याय गुंतवणूकदारांसमोर उरतो. इक्विटी वाटपासाठी ईएलएसएसचा पर्याय निवडण्याचा सल्ला आर्थिक सल्लागार  देतात.

महत्वाचे मुद्दे:

 • ईएलएसएस योजनांमधील गुंतवणूक युनिटसच्या वाटपाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या अधीन असते. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी कर सल्लागाराचा वा आर्थिक सल्लागाराची सल्ला जरूर घ्यावा.
 • आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीवर मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर १० % कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे. या बदलास मंजुरी मिळण्यानंतर  त्याचे कायद्यात रुपांतर होईल व त्यानंतर त्यांची अंमलबजावणी होईल. परंतु भविष्यात भांडवली नफ्यावर जरी कर लागू झाला तरी ‘ईएलएसएस’ हा करबचतीचा सर्वोत्तम पर्याय आहे याबद्दल मात्र कोणतीही शंका नाही.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2FGtVKf)

राष्ट्रीय पेन्शन योजना ,  गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १,

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग २,  ELSS की ULIP?

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *