आपल्या देशामध्ये असणाऱ्या रामायण महाभारत यासारख्या महाकव्यांमधूनही अर्थसाक्षर होता येते, गुंतवणुकीचे ज्ञान मिळते (Key investment lessons). भारताचा अमुल्य ठेवा असलेले महाभारत हे महाकाव्य केवळ गोष्ट म्हणून किंवा मनोरंजन म्हणून घेणारा केवळ कुणी वेडा असेल. त्यात दैनंदिन जीवनात जगताना काय करावे आणि काय करू नये हे एवढ्या मार्मिक उदाहरणांतून सांगितले आहे की, आपली जीवन नौका अगदी वादळात सापडली असताना महाभारत दीपस्तंभासारखे काम करत आपल्याला किनारा दाखवते. वागणुकीच्या, विचारांच्या योग्य-अयोग्य बाबींव्यतिरिक्त अगदी आर्थिक गुंतवणुकीसाठीही महाभारत आपल्याला अमुल्य अशी पंचसुत्रे सांगताना आढळते, पाहूयात कोणती आहेत ती पंचसूत्रे.
Key investment lessons: महाभारत आणि आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !
१. शंभर कौरवांपेक्षा पाच पांडवांचे पारडे नेहमीच जड !
- महाभारतात कौरव तब्बल शंभर होते, त्यांच्यासमोर पांडव केवळ पाच. परंतु सरतेशेवटी सरशी कोणाची झाली? पांडवांचीच. कारण कौरव सेना महाकाय असल्यानेच त्यांच्यात तारतम्य ठेवणे.
- एखाद्या निर्णयाचा प्रभावी अंमल करणे एवढ्या मोठ्या संख्येमुळे शक्य झाले नाही. या उलट पांडव केवळ पाच असल्याने त्यांना आपसात सुसूत्रता ठेवणे अतिशय सोपे होते.
- पाचही भावांत वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता होत्या. या क्षमतांचा पुरेपूर वापर होऊन त्यांना विजय प्राप्त झाला.
- हेच सूत्र आपल्या गुंतवणुकीसाठीही महत्वाचे आहे. समजा आपण शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात, तर एकाचवेळी भरमसाठ कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवल्यास त्यांच्या चढ-उताराकडे, त्यांच्याविषयीच्या बाजारातील बातम्यांकडे आपले व्यवस्थित लक्ष राहणार नाही. याचा फटका आपल्याला बसू शकतो.
- याउलट जर आपण अभ्यासपूर्ण पद्धतीने अगदी मोजक्या परंतु चांगल्या दर्जाच्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवले, तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे सहज शक्य होईल आणि ते अव्वल स्टॉक्स असल्याने आपल्याला दीर्घकालीन चांगला परतावाही मिळेल.
२. पक्ष्याच्या डोळ्याशिवाय काहीच दिसायला नकोय !
- गुरु द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांच्या धनुर्विद्येची परीक्षा घ्यायची ठरवलेली तेव्हा एका झाडावर लाकडी पक्षी ठेवला होता. त्याच्या डोळ्यावर निशाणा साधण्याचा आदेश त्यांना दिलेला.
- निशाणा साधणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ‘तुला काय काय दिसतेय?’ या गुरु द्रोणांच्या प्रश्नास बाकीच्यांनी ‘झाड, पाने, आकाश, इत्यादी इत्यादी’ उत्तरे दिली आणि अर्जुनाने केवळ ‘पक्ष्याचा डोळा’ दिसतोय असे उत्तर दिले.
- हे सर्वश्रुत आहे की अर्जुन आजही सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हुणुन नावाजला जातो. याचा आणि गुंतवणुकीचा काय संबंध? अर्थातच आहे.
- आपण जेव्हा दीर्घकालीन गुंतवणूक करता तेव्हा आपण काहीएक ठराविक कालमर्यादा ठरवलेली असते.
- या कालमर्यादेवरच आपले अर्जुनासारखे लक्ष असायला हवे. जर आपल्याला रोजच्या शेअर बाजाराच्या उतार चढावाच्या बातम्या दिसू लागल्या, नको त्याच्या फुकटच्या ‘टिप्स’ ऐकू येऊ लागल्या, तर आपण विचलित होऊन आपली दीर्घकालीन गुंतवणूक विकून बसू आणि हाती काहीच लागणार नाही.
- जर आपला आपल्या एकाग्रतेवर पूर्ण ताबा नसेल, तर ‘म्युच्युअल फंड’ सारखा उत्तम मार्ग नाही. चांगल्या फंडमध्ये गुंतवणूक करा आणि निर्धास्त रहा.
३. दिव्य अस्त्रांशिवाय पांडवही मैदानात उतरले नाहीत
- कुरुक्षेत्राच्या लढाईत पांडवांच्या समोर कौरवसेनेकडून लढणारे योद्ध्ये अतिशय शूरवीर आणि धुरंधर होते. त्यांचे स्वतःचे आजोबा भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य असे कित्येक रथी महारथी विरोधात उभे होते.
- अशावेळी पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण होता हे खरे आहेच, परंतु युद्धात समर्थपणे व सबळपणे उभे ठाकण्यासाठी पांडवानी घोर मेहनतीने दिव्य अस्त्र प्राप्त करून घेतले होते.
- कृष्णाचा सल्ला आणि दिव्य अस्त्रांची ताकद यातूनच कुरुक्षेत्राच्या लढाईत पांडवांचा विजय झाला.
- आपणही जेव्हा गुंतवूणूक करण्यासाठी बाजारात पाउल टाकतो आणि कुठल्याही ज्ञानाशिवाय गुंतवणूक करू लागतो तेव्हा आपला भलामोठा तोटा होणे हे अटळ असते.
- रावाचा रंक होण्यास फार वेळ लागत नाही. या लढाईत आपले दिव्य अस्त्र आहे आपले ज्ञान.
- बाजाराचे ‘ज्ञान’ असल्याशिवाय गुंतवणूक करणे म्हणजे आत्मघात होय. एकतर आपल्याला गुंतवणुकीचे पुरेपूर ज्ञान हवे किंवा ते ज्ञान नेमके कुणाकडे आहे याची माहिती हवी.
- चांगल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजेच ज्ञानी माणसाला ओळखून त्याच्या हाती आपल्या गुंतवणुकीची धुरा सोपवण्यासारखे आहे.
४. ‘रिस्क है तो इश्क है’ म्हणत घरदार, संसार आणि पत्नी जुगारात उभी करणे वेडेपणाच
- शकुनी मामाच्या कुटनीतीला न ओळखता ध्यूत खेळायला गेलेल्या युधिष्ठिराने आपले राज्य, आपली संपत्ती, आपले भाऊ आणि अगदी आपली पत्नीसुद्धा गमावली आणि सर्वाना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला.
- गुंतवणुकीचेही अगदी असेच आहे. ‘रिस्क है तो इश्क है’ असं म्हणत संकटांची चाहूल न घेता धडाधड निर्णय घेत राहिल्यास गुंता वाढत जातो आणि रात्रीतून करोडपती होण्याच्या नादात रोडपती होऊन बसतो.
- एकवेळ हळूहळू आणि थोडीथोडी कमाई झालेली चांगली, परंतु एका झटक्यात भरून न निघणारा तोटा कधीच चांगला नाही.
विशेष लेख: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन
५. अज्ञानापेक्षा अर्धवट ज्ञान नेहमीच घातक, आपला ‘अभिमन्यू’ बनवू शकते!
- अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र असलेल्या अभिमन्यूने गर्भाशयात असताना चक्रव्यव्ह भेदण्याची कला आत्मसात केली होती. परंतु, अर्जुन हे सांगत असताना सुभद्रेला झोप लागली आणि अभिमन्यू केवळ भेदण्याची कला शिकला, चक्रव्यव्हातून बाहेर येण्याचे नाही.
- कुरुक्षेत्राच्या लढाईत वडीलधारे सांगत असतानाही अभिमन्यू हट्टाने चक्रव्यव्हात गेला आणि स्वतःचे प्राण गमावून बसला.
- हेच तंतोतंत गुंतवणुकीच्या ज्ञानाचेही. अज्ञान एकवेळ घाबरवून गुंतवणुकीपासून लांब ठेवेल, पण अर्धवट ज्ञान नाहक आत्मविश्वास उत्पन्न करून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडेल.
- पुरेपूर ज्ञान असल्याशिवाय, संकटाची चाहूल घेतल्याशिवाय कधीही गुंतवणुकीचे धाडस करू नये. त्यासाठी सर्वांगीण ज्ञान आत्मसात करण्याचे प्रयत्न करावेत आणि मगच गुंतवणुकीचे धाडस करावे.
हे नक्की वाचा: Ramayana: रामायणातून शिका आपल्या अर्थकारणाचे धडे ! ..
रामायण काय आणि महाभारत काय आपणास थेटपणे काय करावे आणि काय करू नये याचे सल्ले देत नाही. त्यातील घडामोडींमधून बोध घ्यायचे असतात. वर नमूद केलेली पंचसुत्रे जरी आत्मसात केले तरी आपण आर्थिक गुंतवणुकीत अतिशय उत्तम प्रगती करू शकाल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Key investment lessons Marathi, Key investment lessons Marathi Mahiti, Key investment lessons in Marathi