it companies
it companies
Reading Time: 3 minutes

INVESTMENT IN IT COMPANIES 

सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे महत्व वाढत चालले आहे, हे अनेक निकषांनी सिद्ध होते आहे. आयटीचा दैनंदिन जीवनातील स्वीकार, गुंतवणूक विषयक निर्णय आणि रोजगार संधी – असा विचार करताना या क्षेत्राकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही, असेच सर्व निकष सांगत आहेत. पण या संदर्भाने देशात नेमके काय बदल होत आहेत?

माहिती तंत्रज्ञान केवळ आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे, एवढेच खरे नसून तो सतत वाढत जाणार आहे, हे आजूबाजूच्या त्या क्षेत्रातील घडामोडींमधून स्पष्ट होत चालले आहे. त्याचे व्यापक परिणाम नजीकच्या भविष्यावर होणार आहेत. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला या तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंची ओळख समाजाला होऊ शकली नाही, मात्र आता ते इतके विकसित होते आहे की त्याची अपरिहार्यता येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक वाढत जाणार आहे, अशीच सर्व लक्षणे आहेत.

हेही वाचा – e voting: इलेक्टॉनिक मतदान का आणि कशासाठी?…

 

या सर्व पार्श्वभूमीवर या क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा वाढत चालला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. शेअर बाजारात त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. शेअर बाजारात सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या पहिल्या १५ कंपन्यांमध्ये चार कंपन्या आयटी क्षेत्रातील आहेत. त्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस, इन्फोसिस, एचसीएलटेक आणि विप्रो या कंपन्यांचा समावेश आहे. शिवाय रिलायन्स आणि भारती एअरटेल या दोन कंपन्या याच गटात मोजाव्या लागतील, कारण त्यांनी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांशी टायअप तरी केले आहे किंवा काही छोट्या कंपन्या आपल्या समूहात सामील तरी करून घेतल्या आहेत. रिलायन्सचे फेसबुक आणि गुगलसंदर्भातील व्यवहार तेच सांगत आहेत. शेअर बाजारात बँकिंग क्षेत्राचे जेवढे मूल्य (बँक निफ्टी ३७,५९९) आहे, त्यापेक्षा अधिक मूल्य आयटी कंपन्यांचे (आयटी निफ्टी ३४,४८३, जे ३९,५०० ला स्पर्श करून आले आहे.) लवकरच होईल, अशी शक्यता आहे, यावरूनही आयटीची वाढ लक्षात येते.

रोजगार,निर्यातवाढीत आघाडी
आयटी वाढीचा हा कल आणखी दोन कारणांनी ठळक होतो. तो म्हणजे रोजगार आणि देशाची निर्यात. या दोन्ही गोष्टीची देशाला सर्वाधिक गरज आहे. चालू आर्थिक वर्षांत आयटी कंपन्या तीन लाख ६० हजार तरुणांना रोजगार देणार आहे, असा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. सध्याच या क्षेत्रात ५० लाख तरुण काम करत आहेत. रोजगारात महिलांचे प्रमाण वाढण्याची गरज होती, तीही या क्षेत्राने काही प्रमाणात भरून काढली आहे. सध्याच्या ५० लाखात १८ लाख महिला असून महिलांचे प्रमाण सर्वाधिक असलेले हे क्षेत्र झाले आहे. या कंपन्यांकडे सध्या एवढे काम आहे की सध्याचे मनुष्यबळ त्यांना कमी पडते आहे. त्यामुळेच अगदी नव्याने पद्वीधर झालेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे. भारताची रोजगार वाढीची गरज यापेक्षा कितीतरी अधिक आहे, पण म्हणून या रोजगार संधीचे महत्व कमी होत नाही. हार्डवेअर धरून भारताची या क्षेत्राकडून होत असलेली निर्यात आता १७८ अब्ज डॉलर वर पोचली (एकूण महसूल २२७ अब्ज डॉलर) असून ही वाढ १७.२ टक्के इतकी आहे. तर सर्व्हिस क्षेत्राच्या एकूण निर्यातीत आयटी क्षेत्राचा वाटा ५१ टक्के आहे. आयात अधिक असल्याने भारताला नेहमीच व्यापारात तूट सहन करावी लागते. पण आयटीच्या निर्यातवाढीचा ही तूट कमी करण्यास मदत होते आहे. भारताची निम्मी निर्यात आता या क्षेत्राकडून येवू लागली आहे, इतके या निर्यातीचे महत्व आहे.

 

सरकारचा आयटी खर्च वाढला
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे महत्व ताज्या अर्थसंकल्पातही दिसले आहे. या अर्थसंकल्पात आयटीवरील खर्च १० अब्ज डॉलर इतका करण्याचे ठरविले आहे. आगामी काळात भारत फाईव जी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. आर्थिक व्यवहारांचे डिजिटलायशन वाढतच जाणार आहे. (याक्षेत्रात इतर देशही भारताकडे सहकार्य मागत असून नेपाळने अलीकडेच भारताने विकसित केलेला युपीआय प्लॅटफॉर्म वापरण्याचा आणि डिजिटल चलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.) जमिनीची मोजणी आणि शेती क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर – हे सर्व बदल आय टी कंपन्यांच्या माध्यमातूनच होणार आहेत. मालवाहतूक, प्रवासी वाहतूक आणि आरोग्य क्षेत्रात आयटीचा असा किती वापर होणार, असे एकेकाळी वाटत होते. पण या क्षेत्रातही आयटीचा वापर वाढत चालला आहे. सरकार अशा सर्व क्षेत्रातील आयटीच्या वापराला प्रोत्साहन देणार असल्याचे अर्थसंकल्पावरून स्पष्ट झाले आहे.

 

देशातील ग्राहक वाढत जाणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीचा आणखी एक महत्वाचा पैलू आहे, तो म्हणजे आज हे क्षेत्र प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांच्या मागणीवर अवलंबून असले तरी पुढील काळात देशातीलच मागणी वाढत जाणार आहे. ते महत्वाचे यासाठी आहे की भारताची प्रचंड लोकसंख्या आणि भारतात वेगाने होत असलेले डिजिटलायझेशन. इतर क्षेत्रात जसा लोकसंख्येचा बोनस महत्वाचा ठरतो, तसाच तो याही क्षेत्रासाठी महत्वाचा ठरणार आहे. उदा. सरकारने आता ई पासपोर्ट देण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकल्प आणि पासपोर्ट सेवा केंद्र चालविण्याचा व्यवहार तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा आहे आणि तो टीसीएस ही आयटी कंपनी करणार आहे. हा आकडा आपल्याला फार मोठा वाटतो, पण पासपोर्ट काढणाऱ्या भारतीय नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता तो योग्य आहे. अलीकडील काळात दरवर्षी वेगवेगळ्या कारणांनी किमान एक कोटीवर नागरिक पासपोर्ट काढत असून अजूनही १० कोटीच पासपोर्टधारक देशात आहेत. थोडक्यात आयटीचा असा वापर सर्व क्षेत्रात वाढत जाणार असल्याने आयटी कंपन्या आता भारतातील कामांकडे लक्ष केंद्रित करू लागल्या आहेत.

हेही वाचा – Future Valuation Of Technology Stock : आयटी कंपन्यांचे मूल्यमापन करताना विचारात घ्या ‘या’ गोष्टी…

 

जागतिक मानांकनातही पुढे
जगात आयटीचा वापर वाढत चालला आणि ती सेवा पुरविणाऱ्या भारतीय कंपन्यांचा त्याचा सर्वाधिक वाटा मिळतो आहे, त्याची काही कारणेही आहेत. युरोप अमेरिकेत मनुष्यबळ महाग असल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामे सुरवातीला भारतात आली, हे आपण जाणतोच. पण भारताने त्याचा भरपूर लाभ घेतला कारण त्या प्रकारची कौशल्य असलेले मनुष्यबळ भारतात उपलब्ध होते, हेही मान्यच केले पाहिजे. एवढेच नव्हे तर अलीकडे जाहीर झालेल्या जागतिक मानांकनात अमेरिकेनंतर भारतीय आयटी कंपन्यांना जगात मान्यता आहे. याचा अर्थ मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा भारताने घेतला आहे. अर्थात, माहिती तंत्रज्ञानाचा कालखंड येथे संपणार नाही, तो आणखी काही वर्षे असाच वाढत जाणार असल्याने त्याचा वापर असो, गुंतवणुकीचे निर्णय असो, आयटी क्षेत्राकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.

यमाजी मालकर
[email protected]

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…