- क्रेडीट कार्ड ही आता केवळ मिरवण्याची गोष्ट नसून गरजेची वस्तू झालेली आहे. शॉपिंग मॉल, कॉफी शॉप, कपड्यांची दुकाने, सिनेमा तिकीट, पेट्रोल पंप अशा अनेक ठिकाणी क्रेडीट कार्डला प्राथमिकता दिली जात आहे. (Credit Card Marathi)
- क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्स असतात. या सर्व ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी अनेकजण क्रेडीट कार्ड घेत आहेत.
- आपण जेव्हा सुरुवातीला क्रेडीट कार्ड घेत असतो त्यावेळी बहुतेकांना एंट्री लेव्हलचे कार्ड दिले जाते. या एंट्री लेव्हल क्रेडीट कार्डवर मर्यादित सुविधा असतात.
1) क्रेडिट कार्ड अपग्रेड कधी करावे ? (Credit Card Upgrade Marathi information)
आपल्या नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असे एंट्री लेव्हल कार्ड आपली आर्थिक स्थिरता येण्यासाठी चांगलीच असतात कारण आपण अनेकदा कर्ज घेऊन शिकलेलो असतो किंवा घरातील इतर महत्वाच्या कारणासाठी कर्ज घेतलेले असते तेव्हा आपली प्राथमिकता हे कर्ज फेडण्यास असते.
त्यावेळी अधिक मर्यादेचे क्रेडीट कार्ड घेऊन अजून कर्ज वाढवणे भविष्यासाठी योग्य नसते. नंतर जेव्हा आपले कर्ज फिटते , अधिक पगार मिळायला लागतो, तेव्हा आपण क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्याचा विचार करायला हवा.
हे ही वाचा – क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
क्रेडीट कार्ड अपग्रेड केल्यावर आपल्याला अनेक ऑफर्स, बक्षिसे, प्रवासी लाभ, कॅशबॅक अशा अनेक सुविधा मिळतात. ज्यामुळे आपण कमी पैशात अपग्रेड केलेल्या क्रेडीट कार्डवर सुविधांचा लाभ घेऊ शकतो.
आता हे क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण कोणत्याही जाळ्यात न अडकता क्रेडीट कार्डचा चांगला उपयोग करू शकतो.
2) तुमचा खर्च कोणत्या प्रकारच्या गोष्टीवर सर्वाधिक होतो – (Credit Card Expenses Marathi)
- क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी सर्वात प्रथम करायची गोष्ट म्हणजे गेल्या दोन– तीन महिन्यांचा हिशोब करायला बसा. ज्यावेळी तुम्ही हिशोब कराल तुमच्या लक्षात येईल की, आपला खर्च सर्वाधिक कोणत्या गोष्टीवर होतो आहे.
- ज्या प्रकारच्या वस्तूवर तुमचा सर्वाधिक खर्च होतो आहे त्यानुसार आपले क्रेडीट कार्ड अपग्रेड करा. उदा. जर तुमचा खर्च पेट्रोलवर अधिक होत असेल तर इंधन क्रेडीट कार्ड घ्या. तुमचा खर्च किराणा वस्तूवर अधिक होत असेल तर शॉपिंग क्रेडीट कार्ड घ्या. तुम्ही आपल्या खर्चाकडे न बघता क्रेडीट कार्डच्या अपग्रेडचा विचार केला तर तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप होण्याचीच अधिक शक्यता आहे.
- यामुळे आपला खर्च करण्याचा हिशोब करण्यास थोडा वेळ लागला तर तो द्या. तो महत्वाचा आहे आणि त्यावरूनच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.
3) क्रेडीट कार्डवर असलेल्या रिवार्डबद्दल माहिती घ्या –
- आपल्याला कोणत्या प्रकारातील क्रेडीट कार्ड घ्यायचे आहे, हे पक्के झाल्यावर पुढची पायरी म्हणजे त्या क्रेडीट कार्डवर कोण– कोणत्या सुविधा, सवलती, बक्षिसे आहेत, याची व्यवस्थित माहिती घेणे. काही क्रेडीट कार्डवर भरपूर सवलती असतात, बक्षिसे असतात पण त्यावर निश्चित अशी एक मर्यादा असते.
- आपल्याला त्या मर्यादेच्याआत काही कारणामुळे त्या सवलती असलेल्या वस्तू घेता येणार नसतील तर ते क्रेडीट कार्ड घेऊन काही फायदा होणार नाही. तेव्हा थोड्या कमी सवलती असलेलं आणि निश्चित अशी मर्यादा नसलेलं क्रेडीट कार्ड घेणं कधीही चांगला निर्णय ठरेल.
- क्रेडीट कार्ड अपग्रेड करताना फक्त सवलती आणि बक्षिसे पहायची नाहीत तर त्यावरील अटी व शर्ती देखील पाहणे महत्वाचे आहे.
Credit Card : ‘ओव्हर लिमिट’ म्हणजे काय रे भाऊ ?
4) वार्षिक शुल्क तपासा – (Credit Card Annual Expenses Marathi)
- आपल्याकडे असलेल्या एंट्री लेव्हल कार्डपेक्षा अपग्रेड केलेल्या कार्डवर जशा अनेक सवलती असतात तसे वार्षिक शुल्कही अधिक असते. अशा वेळेला आपल्याला ज्या सवलती मिळत आहेत आणि त्यात हे वार्षिक शुल्क धरले तर आपल्यला हा सवलती महागात तर पडत नाहीत ना.. हे तपासणे गरजेचे आहे.
- नाहीतर सवलतीचा वर्षाव पाहून आपण खुश होऊन जायचो आणि वर्षाच्या शेवटी वार्षिक शुल्काचा बोजा आपल्या अंगावर पडल्यावर रडायची वेळ यायची. तसेच सध्या बहुतेक क्रेडीट कार्ड असे येत आहेत की, दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यास वार्षिक शुल्कात काही सवलत मिळते. अशीही काही सुविधा आहे का? तेही जरूर तपासा.
क्रेडीट कार्डची कमाल मर्यादा – (Credit Card Limit Marathi information)
- आपण क्रेडीट कार्ड अपग्रेड करत असू तर सहसा आपली क्रेडीट कार्ड मर्यादा देखील वाढवली जाते. ही क्रेडीट कार्ड मर्यादा किती वाढवली आहे , ते जरूर पहा.
- क्रेडीट कार्ड मर्यादा वाढल्यास आपल्याला अडचणीच्या वेळी फायदा होतो तसेच क्रेडीट स्कोअर देखील सुधारण्यास मदत होते. क्रेडीट कार्डची मर्यादा ही आपला पगार किंवा उत्पन्न किती आहे?, क्रेडीट कार्ड कोणत्या प्रकारातील आहे, आपला परतफेडीचा रेकॉर्ड कसा आहे या गोष्टीवर अवलंबून असते.
सर्व प्रकारचे कर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नशील रहा. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी या चार महत्वाच्या गोष्टी जरूर करा.