लवकरच लोकसभेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा पूर्ण होऊन मतदान केलेल्या सर्व भारतीयांचं मत मतपेटीत बंद होईल. या आणि आधीच्या टप्यातील मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार असून प्रमुख दावेदार ‘आम्हीच’ बहुमत मिळवून सत्तेवर येणार असल्याचा दावा करत आहेत. सत्ताधारी पक्षाने तर स्वबळावर “अबकी बार 400 पार” चा दावा केला होता नंतर तो मित्रपक्षांसह असल्याचा खुलासा केला तर विरोधकांनी जेमतेम 200 जागा सत्ताधारी पक्षास मिळतील असे म्हटले असून सत्ताबदल होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
सत्ताधारी पक्ष सत्तेवर आला काय किंवा विरोधी पक्ष आला काय आता राजकारणी लोक येन केन प्रकारे सत्ता आपल्याकडे कशी एकवटेल याचाच विचार करत असून एकमेकांची उणीदुणी काढून आपण कसे बरोबर ते ठसवण्याचा प्रयत्न करीत असून त्यांना लोकांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच नाही. किंबहुना मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे असे कुणालाही वाटत नाही.
शेअरबाजाराने नवनवे उच्चांक पार केले असून 4 जून नंतर काय? यावर सध्या तर्कवितर्क चालू असून सध्या बाजार अधिक अस्थिर आहे. राममंदिर निर्माण आणि 370 कलम रद्द करणे ही सत्तारूढ पक्षाकडील जमेची बाजू असून या गोष्टी केवळ हे सरकार असल्यामुळेच झाल्या अशी सर्वसाधारण भावना आहे.
भाजप आणि मित्रपक्ष 350 जागा मिळवून सत्तेवर येतील अशी सर्वसाधारण अपेक्षा असून त्याचे प्रतिबिंब बाजारभावावर पडले आहे. तेव्हा एवढ्या जागा जर मिळाल्या तर बाजारात फारसा फरक पडणार नाही.
ही संख्या 300 झाली किंवा 400 पार झाली तरीही विद्यमान येणार फक्त हे बाजाराच्या अपेक्षे विपरीत असल्याने जागा कमी झाल्यास काही कालावधीसाठी मोठी घसरण होऊ शकते तर 400 पार झाल्यास मोठी तेजी येऊ शकते. त्यामुळेच ज्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे. ते बाजारात होणाऱ्या चढउतारांकडे गुंतवणूक संधी म्हणून पाहू शकतात.
31 मे आणि 4 जून हे दोन दिवस सर्वात अस्थिर असतील तर 4 जून रोजी दुपारी 2 पर्यंत पक्षनिहाय स्थिती स्पष्ट झाल्याने निकालाच्या अनुषंगाने बाजारास दिशा मिळेल.
मागील निवडणुकांचा अनुभव लक्ष्यात घेता नव्या सरकार स्थापनेनंतर बाजाराने कोणतीही दिशा दाखवली तरी कालांतराने तो वरच्या दिशेला जाईल.
स्थिर सरकार आल्यास अपेक्षित आर्थिक सुधारणाना गती मिळते. लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी ते आवश्यक आहे. गरीब आणि श्रीमंत यातील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याने जनतेत असंतोष निर्माण होत आहे. त्याचा स्फोट होणार नाही याची कोणत्याही सरकारने काळजी घेणे आवश्यक आहे.
देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून त्यावरील सध्याचे उपाय ही वरवरची मलमपट्टी वाटते. त्यावर आळा न घातल्यास अराजक माजण्याची शक्यता वाटते. आजवर अनेक स्थित्यंतरे झाली, चीन वगळता आपल्या आजूबाजूच्या सर्व देशांची आर्थिक स्थिती नाजूक असून आपण प्रगतीपथावर आहोत ही आपली जमेची बाजू आहे.
पाहुयात काय होतंय ते!
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक