4 जून नंतर काय होईल? या यापूर्वीच्या विशेष लेखात निवडणूक निकालानंतर शेअरबाजारात काय होऊ शकेल यावरील विचार व्यक्त केले होते. 400 पार होणार नाही परंतु विद्यमान सरकार मित्र पक्षांसह 300 ते 350 मिळवेल अशी शेअर बाजाराची सर्वसाधारण धारणा होती. तसे झाले तर- फारसा फरक पडणार नाही. 300 हुन कमी जागा मिळाल्यास बाजार खाली येईल आणि 400 हुन अधिक मिळाल्यास नवा उच्चांक गाठला जाईल अशी अपेक्षा होती.
1 तारखेला संध्याकाळी एक्सिट पोलचे निष्कर्ष जसजसे येऊ लागले त्यांनी विद्यमान सरकार 400 पार करण्याचे सर्वसाधारण अंदाज व्यक्त केल्याने 3 जून ला बाजाराने तेजी दाखवून सेन्सेस आणि निफ्टी यांनी अनुक्रमे 76739 आणि 23339 चे नवे उच्चांक नोंदवले.बाजार बंद होताना आधीच्या बंद भावाहून जवळपास 4% तेजी दिसून आली आणि 4 जून ला मोठे गॅप अप ओपनिंग होणार अशी सकाळी आठ साडेआठ पर्यत सर्वत्र हवा होती.
पण हायरे दैवा………
बाजार सुरू होतानाच विद्यमान पक्ष आघाडी आणि विरोधी पक्ष आघाडी यात फारसे अंतर नसल्याचे समजले आणि मोठे गॅप डाऊन ओपनिंग झाले. सन 2019 ला सत्ताधारी पक्ष एकट्याने 272 जागा मिळवू शकेल याबाबत साशंकता होती पण सहकाऱ्यांसह सत्तेत राहील असे वातावरण होते. तेव्हा विद्यमान पक्षाने एकट्याने 300 चा आकडा पार केल्याने उत्साहाचे वातावरण होते.
आज उलट परिस्थिती निर्माण होऊन सत्ताधारी पक्ष एकट्याने 272 जागा मिळवू शकत नाही आणि आघाडीसह 300 जागाही मिळवू शकत नाही हे स्पष्ट झाल्याने जोरदार विक्री झाली.
लोअर सर्किट लागून बाजार काही काळ बंद ठेवावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण लगेचच सरकार हेच राहील हे स्पष्ट झाल्याने थोडी रिकव्हरी आली तरी बाजार बंद होताना तो एका दिवसात आधीच्या बंद भावाच्या तुलनेत 6% ने खाली बंद होऊन गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत एका दिवसात सर्वात मोठ्या प्रमाणात तुटला.
5 जूनला निराशाजनक सुरुवात झाली असली तरी याच आघाडीच्या सरकारचा शपथविधी लवकरच होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले असून त्यास बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
संमिश्र सरकार शेअरबाजाराच्या दृष्टीने चांगले असेल असा इतिहास असल्याने आश्वासक चित्र निर्माण होऊन सेन्सेस आणि निफ्टी अनुक्रमे 74382 आणि 22620 असे 3% हून अधिक बंद झाले. आज विकली बँक निफ्टी एक्सपायरी असून त्यात 4.5% हून अधिक अशी एक चांगली रिकव्हरी झाली आणि कागदोपत्री दिसणारे नुकसान 50%ते 60% हुन भरून निघाले आणि सर्वच क्षेत्रातील प्रमुख इंडेक्समध्ये 3% ते 5% हुन अधिक सुधारणा झाल्याने लवकरच सर्व स्थिरस्थावर होईल असे वाटते.
उद्या गुरुवारी निफ्टी विकली एक्सपायरी असल्याने बाजार खूप वरखाली होण्याची शक्यता असून डे ट्रेडर्सना आणि काल घाबरून खरेदी करण्याचा मोह ज्यांनी टाळलेल्या सर्वाना पोझिशन घेण्याची एक संधी आहे.यातून सर्वानाच शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, जाणकार व्यक्ती यात अधिक भर घालू शकतील, बदल करू शकतील-
- एक्सिट पोल आणि सर्वसाधारण अंदाजही चुकू शकतात तेव्हा त्याला किती महत्व द्यायचे ते ठरवावे.
- राजकीय पक्षांसह सर्वानाच धडा मिळाला असून आपलं नेमकं काय बरोबर ठरलं आणि काय चुकलं त्यावर चिंतन करून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करता येतील.
- नसत्या भ्रमात राहू नये जे लोक्यावर घेतात ते पायदळी ही तुडवू शकतात. त्यामुळे फाजील आत्मविश्वास बाळगू नये.
- सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवेल एवढा तगडा विरोधी पक्ष हवा.
- प्रादेशिक पक्षही महत्वाचे असून त्यांचे खच्चीकरण करू नये.
- भारताचा विकास होईल असा ज्यांचा विश्वास आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. “श्रद्धा और सबुरी” यावर विश्वास ठेवावा
- गॅप अप डाऊन अथवा गॅप अप ओपन अशी संधी कधी आलीच तर घाबरून न जाता योग्य वेळी खरेदी विक्री साधून नफा मिळवावा. आपल्या गुंतवणूक संचात भर घालावी.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)