Reading Time: 4 minutes

प्रत्येक गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही विविध प्रकारात विभागून असावी. गुंतवणूक कायम सुरक्षित, महागाईहून अधिक परतावा देणारी असावी आणि त्यात रोकडसुलभता असावी. गेल्या 10 वर्षात विविध गुंतवणूकीच्या पर्यायामधून महागाईच्या तुलनेत कोणी किती परतावा दिला हे तपासून पाहिले असता, शुद्ध स्वरूपातील सोन्यास हे तिन्ही निकष लागू पडतात. 

  • सोन्यातून मिळालेला परतावा 10% असून तो महागाईवर मात करणारा आहे. मोठ्या आर्थिक संकटात लोकांचा प्रचलित चलनावरील विश्वास कमी होऊन ते अधिक प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करीत असल्याने सुवर्ण गुंतवणुकीचे महत्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. 
  • आपल्या एकूण गुंतवणुकीतील 10% भाग सोन्यामधे असावा याबाबत सर्व गुंतवणूक तज्ञांमध्ये एकमत आहे. हा धातू दुर्मिळ आणि जगमान्य असल्याने त्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.
  • जगभरातील बँकांनी पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्यास प्रथम पसंती दिली आहे.
  • गुंतवणूक या दृष्टिकोनातून, आपण सोने या धातूकडे आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. एकहाती किंवा थोडे- थोडे सोने जमा करून, त्यात भर घालून मनाजोगते दागिने करणं एवढाच आपला सोन्याशी संबंध येतो. 
  • संस्कार, परंपरेची जपणूक, प्रेमाचे प्रतीक आणि पिढीजात वारसा म्हणून याची आवश्यकता असली तरी खऱ्या अर्थाने ही गुंतवणूक होत नाही. नवीन शैलीचा दागिना बनवायला जितक्या सहजतेने जुने दागिने मोडले जातात, त्या तुलनेत अत्यंत कठीण प्रसंगातही ते विकून पैसे उभारणे होता होईतो टाळले जाते.  
  • त्यामुळे यातून मानसिक समाधानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष परतावा मिळत नाही. या उलट अशा स्वरूपाच्या व्यवहारात वजनात घट आणि मजुरी यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून आपले नुकसानच होते. याशिवाय त्यावर करही द्यावा लागतो.
  • सोने हे पर्यायी चलन म्हणून समजले जाते, चलन या शब्दाचा संबंध गतिमानतेशी आहे. जेव्हा त्याचे दागिने बनतात, तेव्हा त्याची गती म्हणजे हालचाल थांबते. तेव्हा आपल्या गरजेहून अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने घेणे यात आर्थिक नुकसान आहेच. 
  • याशिवाय सोने सुरक्षितपणे साठवण्यासाठी काही खर्च करावा लागतो.   
  • सोने फक्त खरेदी किंवा खरेदी/ विक्रीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी प्रचलित यंत्रणेतून पारदर्शक पद्धतीने सोन्याच्या बाजारभावाचा शोध घेता येण्यावर अनेक मर्यादा आहेत. 

सोने खरेदी किंवा खरेदी/ विक्रीसाठी उपलब्ध पर्याय पुढीलप्रमाणे :

  • नाणे / वळे स्वरूपात सोन्याची खरेदी 
  • सुवर्ण संचय योजना
  • गोल्ड फंडातील गुंतवणूक
  • गोल्ड ईटीएफ
  • ई गोल्ड 
  • डिजिटल गोल्ड
  • सार्वभौम सुवर्ण रोखे

 सन 2020-2021 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी कोठार विकास आणि नियामन प्राधिकरणाची निर्मिती (WDRA) आणि स्वतंत्र सुवर्ण बाजाराची स्थापना (Gold Exchange)  यांची घोषणा केली आणि त्याचे नियमन सेबीकडे असेल असे म्हटले आहे. 

यासंबंधातील नवी नियमावली लवकरच सेबी जाहीर करेल अशी घोषणा केली होती. त्यापैकी काही मुद्दे पुढीलप्रमाणे-

  • यानुसार सोन्याचा भाव हा खऱ्याखुऱ्या मागणी पुरवठा यावर शोधला जावा, यासाठी सोन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगणकीय सुवर्ण पावत्या (इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट) तयार केल्या जातील.
  • याला सुवर्ण रोखे म्हणून मान्यता देण्याची सेबीची योजना असून, यात शक्य असल्यास स्वतंत्र सुवर्णबाजार निर्माण करण्यास सेबीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. 
  • यामुळे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट, सोन्याचे प्रत्यक्ष स्वीकार आणि वितरण करणारा नियमित सुवर्ण बाजार (The Gold Exchange) भविष्यात निर्माण होऊ शकेल. जेथे या इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्टची खरेदी विक्री केली जाईल. 
  • त्याची निर्मिती खऱ्याखुऱ्या सोन्याच्या बदल्यात केली गेल्याने यासाठी एक स्वतंत्र व्हॉल्टिंग यंत्रणा तयार करण्यात येत आहे, असे म्हंटले आहे.
  • सध्या अस्तित्वात असलेले शेअरबाजार या इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्टची खरेदी विक्री करण्यासाठी सध्याच्या बाजारातच स्वतंत्र खरेदी विक्री दालनाची निर्मिती करू शकतात. याप्रमाणे सर्वप्रथम मुंबई शेअरबाजारामधे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्टची खरेदी विक्री यंत्रणा गेल्या वर्षी कार्यान्वित झाली आहे. राष्ट्रीय शेअरबाजारात अशी सुविधा लवकरच चालू होईल असा अंदाज आहे.
  • यापूर्वी 31 डिसेंबर 2021 ला सेबीने जाहीर केलेल्या अधिसूचनेप्रमाणे, व्हॉल्ट व्यवस्थापकांची नोंदणी करण्यात येऊन इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट तयार करण्यासाठी तसेच त्यांच्याकडे ठेवलेल्या सोन्यासाठी व्हॉल्टिंग सेवा प्रदान करण्यासाठीचे मध्यस्थ म्हणून सेबीकडून नियमन केले जात आहे. 

थोडक्यात महत्वाचे : राइट इश्यू आणि सेबीचा प्रस्ताव

त्यानुसार या व्यवहारासंबंधित संज्ञा:

  • व्हॉल्ट व्यवस्थापक – म्हणजे अशी व्यक्ती अथवा संस्था जी धातू स्वरूपातील सोन्याचा स्वीकार करून त्याचे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट रोख्यात रूपांतर करतात आणि जमा झालेले सोने सुरक्षित ठिकाणी साठवतात. 
  • याबरोबरच व्यवस्थापक म्हणून डिपॉसीटरीमधील व्यवहारांची नोंद ठेवणं आणि एक्सचेंजमधील झालेले व्यवहार नियमित काळात पूर्ण केले जातात का याची नोंद ठेवणं याचा समावेश आहे.
  • संगणकीय सुवर्ण पावती– म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट (ईजीआर); सोन्याच्या देवाणघेवणीसाठी सुरक्षा म्हणून सोन्याचे प्रतिनिधित्व करणारे साधन असून ते इतर बाजार मालमत्ता साधनांसारखे व्यवहार (ट्रेडिंग), देवाणघेवाण (क्लिअरिंग) आणि समायोजन (सेटलमेंट) अथवा व्यवहारपूर्तता या वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.
  • व्होल्टींग सेवा– सोन्याच्या संदर्भात व्होल्ट व्यवस्थापकाद्वारे सोन्याची साठवणूक, सुरक्षितता यासाठी दिल्या गेलेल्या सेवा, सोन्याच्या मानकांनुसार ठेवीतील सोन्याची तपासणी, ईजीआर निर्मिती, हस्तांतर  संबंधित सर्व सेवांचा समावेश होतो.
  • ठेवीदार– गुंतवणूक म्हणून ईजीआरची खरेदी विक्री करणारी व्यक्ती करणारी किंवा करू इच्छिणारी व्यक्ती किंवा संस्था.
  • लाभार्थी मालक: डिपॉझिटरीकडे ईजीआरची गुंतवणूकीची नोंद असलेली व्यक्ती. 

व्हॉल्ट व्यवस्थापकाचे पात्रता निकष:

  • व्होल्टींग सेवा देण्याचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेली व्यक्ती किंवा संस्था ज्यांची किमान मालमत्ता ₹ 50/- कोटी असावी. या व्यवसायासाठी सेबीद्वारा नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र वैध असते.
  • व्हॉल्ट व्यवस्थापक अन्य कोणताही व्यवसाय करत असेल तर, सोने साठवण्यासाठी तसेच ईजीआर व्यवसायासाठी स्वतंत्र जागा आणि साठवणुकीचे ठिकाण असणे गरजेचे आहे. आणि या जागेत अन्य कुठल्याही वस्तूंचा साठा करता येत नाही.
  • व्हॉल्टिंग सेवेसंबंधीत सर्व व्यवहार करण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, सोन्याची शुद्धता तपासणारी यंत्रणा, ईजीआर निर्मिती आणि ईजीआर रद्द करण्याची यंत्रणा असणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे यासंबंधातील तक्रार निवारण करणारी यंत्रणा आणि व्यवहार तपशील पुढील पाच वर्ष जपून ठेवण्याची यंत्रणा असणे आवश्यक आहे.
  • व्हॉल्टमध्ये सोने ठेवण्यासाठी आणि ईजीआर बनवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस रीतसर विनंती करावी लागेल. ते सोने जमा करून त्याचे वजन शुद्धता तपासून ईजीआरची निर्मिती करेल आणि त्याच्याकडे असलेल्या डिपॉसीटरी धारकाच्या-लाभार्थी मालकाच्या खात्यात तेवढे सोने जमा करेल. 
  • याचप्रमाणे सोने धातूरूपात पाहिजे असलेल्या गुंतवणूकदारास डिपॉसीटरीकडे विनंती करावी लागेल. डिपॉसीटरीची खात्री झाल्यावर आणि डिपॉसीटरीकडून मान्यता मिळाल्यावर संबंधित गुंतवणूकदारास सोने सुपूर्द करून त्याचे ईजीआर रद्द करण्यात येतात.
  • सुवर्ण बाजाराच्या हितरक्षणासाठी सेबी, संबधित व्हॉल्टची, ठेवींची, कागदपत्रांची तपासणी करू शकते. ही तपासणी करण्यापूर्वी 10 दिवस आधी व्हॉल्टधारकांना त्याची सूचना देण्यात येईल.

माहितीपर : गोल्ड लोन 

ईजीआर निर्मिती:

  • प्रत्येक व्हॉल्ट व्यवस्थापकडे डिपॉझिटरी सेवेसह ईजीआर तयार करणारी अथवा रद्द करणारी यंत्रणा असेल.
  • ईजीआर तयार करताना लाभार्थी मालकाने व्यवस्थापकास ईजीआर ट्रेडिंग युनिट किती ग्रॅमचे हवे ते नमूद करणं गरजेचं असेल.
  • याप्रमाणे ईजीआर निर्माण झाल्यावर व्हॉल्ट मॅनेजर त्याच्या तपशीलाची नोंद करेल.
  • डिपॉसीटरी लाभार्थी मालकाच्या डी मॅट खात्यात ईजीआर जमा करेल.

ईजीआर व्यवहारांची पद्धत:

  • यात भाग घेणाऱ्या गुंतवणूकदाराने व्हॉल्ट व्यवस्थापकाकडे डिपॉझिट युनिटमध्ये सोने जमा करावे. सध्या हे व्यवहार 1, 10, 100 ग्रॅमच्या पटीत 99.5% आणि 99.9% होतात. 
  • याच्या दहाव्या भागात फक्त खरेदीविक्री तर वरील भागात डिलिव्हरी व्यवहार होतात. दागिने जमा करून ते वितळवून त्याच्या शुद्धतेनुसार बदली ट्रेडेबल युनिटचे क्रेडिट मिळवता येईल.
  • स्टॉक एक्सचेंज नियमानुसारच व्यवहार होतील. त्याचे सेटलमेंट T+1 या कालावधीमधे होईल.
  • व्यवहार करण्यापूर्वी त्यांची डिलिव्हरी हवी की नको ते सांगावे लागेल.
  • ज्याला सोने धातूरुपात हवे असेल त्याने तशी विनंती डिपॉझिटरीला करावी. तेथून व्हॉल्ट मॅनेजरकडे त्याचे चार्जेस आणि कर भरणा केल्यावर त्याची ओळख पटवून सोने सुपूर्त केले जाईल.
  • इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सोन्याचे व्यवहार करताना सोने धातुरुपात नको असल्यास सोन्याच्या बाजारभावाच्या समतुल्य रक्कम दिली जाईल.

करविषयक फायदे:

  • या प्रकारात आपल्याकडे असलेले दागिने, वळी, नाणी, तुकडे ईजीआरमधे बदलून घेतल्यास त्यावर कोणताही भांडवली कर द्यावा लागणार नाही. मात्र ईजीआर विकल्यास होणाऱ्या भांडवली नफ्यावर नियमानुसार कर द्यावा लागेल

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी .ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

#व्हॉल्ट मॅनेजर #सुवर्ण संचय योजना #व्होल्टींग सेवा

#इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट #सुवर्ण बाजार #संगणकीय सुवर्ण पावतीसाठी कोठार (व्हॉल्ट) सुविधा

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes Phule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes ESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutes बँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…