आजपर्यंत एनपीएस या सरकारी निवृत्ती पेन्शन योजनेचा लाभ अनेकांनी घेतला आणि ही योजना लोकांसाठी फायदेशीर ठरली. यात आता अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लहान मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजनेची घोषणा केली आहे. यामुळे स्वत:च्या भविष्यासोबतच पालक आता त्यांच्या लहान मुलांच्या भविष्याची उत्तम सोय होणार या विचाराने सुखावले असणार. घोषणा केल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांकडून योजनेला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या लेखामधून “एनपीएस वात्सल्य योजना” याबद्दल आधिक माहिती जाणून घेऊ.
1.एनपीएस वात्सल्य योजना कोणासाठी आहे ?
- ज्यांचे वय 18 वर्षांखाली आहे अश्या सर्व लहान मुलांसाठी एनपीएस वात्सल्य योजना आहे.
- निवासी भारतीय तसेच अनिवासी भारतीय देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे.
2.काय आहे एनपीएस वात्सल्य योजना ?
- एनपीएस वात्सल्य योजनेसाठी पालक आपल्या पाल्यांसाठी पोस्ट किंवा बँकेमधे खाते उघडू शकतात. या योजनेसाठी खाते उघडताना किमान 1000 रुपयांची रक्कम भरणं आवश्यक आहे.
- त्यानंतर मुलांचे वय 18 पूर्ण होईपर्यंत दरवर्षी किमान 1000 रुपये खात्यामधे भरत राहणं गरजेचं आहे.
- 18 वर्षांनंतर एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत असणारे खाते आपोआप एनपीएस खात्यामधे बदलले जाईल. अर्थात एनपीएस खात्यामधे रूपांतरित झाल्यामुळे, नियमानुसार खातेदाराचे वय 60 झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.
- खाते उघडल्यानंतर खातेदाराला एक नंबर देण्यात येईल, ज्याला परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(PRAN) असे म्हंटले आहे.
3. बचतीचा उत्तम पर्याय :
- अगदी दोन दिवस आधीच अर्थसाक्षरच्या वाचकांनी बचतीचे महत्त्व हा लेख वाचला असेलच. यामुळे एनपीएस वात्सल्य ही योजना लहान मुलांच्या भविष्यासाठी बचतीचा उत्तम पर्याय असू शकतो असं म्हणता येईल.
- अगदी जन्मापासूनच मुलांच्या नावे काही रक्कम बचत म्हणून बाजूला काढू शकल्यास वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एक चांगली मोठी रक्कम जमा केली,याचं पालक म्हणून नक्कीच प्रत्येकाला समाधान असेल,यात शंका नाही.
- आज लाखो लोक एनपीएसच्या माध्यमातून बचत करून आपले भविष्य सुखाचे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकडे वळले आहेत. आता यामधे आपल्या मुलांचेही भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल या विचाराने अनेक लहान मुलेही एनपीएस वात्सल्य योजनेशी जोडले जातील.
- भारताच्या उज्वल भविष्यासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि असेल.
एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक कशी केली जाणार ?
- एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असणार आहे. यामधे फ्लेक्झिबल कॉन्ट्रीब्युशन करता येणार आहे. त्यामुळे पालक अगदी एक हजार रुपयांपासून खात्यामधे पैसे टाकून गुंतवणूक सुरू करू शकतील.
- यामधे होणाऱ्या गुंतवणुकीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याज आणि चक्रवाढ व्याज या दोघांचाही फायदा खातेदारास होणार आहे.
- पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांच्याअंतर्गत एनपीएस वात्सल्य योजना कार्यरत असणार आहे.
आवश्यक कागदपत्रं :
एनपीएस वात्सल्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी बघू.
- खातेदाराचा जन्मतारखेचा पुरावा
- पालकांचे ओळखपत्र
- पालकांच्या बँक खात्याचे तपशील(अनिवासी भारतीयांसाठी)
- पासपोर्ट(अनिवासी भारतीयांसाठी)
- बँक पुरावा(अनिवासी भारतीयांसाठी)
या योजनेची निगडित ऑनलाइन पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे. तसेच या योजनेची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती देणारे माहितीपत्रकही लवकरच पुरवले जाईल, असेही सांगितले आहे.
एनपीएस वात्सल्य योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर नॅशनल पेन्शन सिस्टिम या वेबसाईटवर मिळू शकते. यामुळे अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा नोंदणी करणं शक्य आहे. यासाठी https://www.npscra.nsdl.co.in या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.