इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज हा मुंबई शेअरबाजारांने आपल्या उपकंपनीमार्फत स्थापन केलेला आणि भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहे. ९ जानेवारी २०१७ रोजी या बाजाराचे उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केले आणि १६ जानेवारी २०१७ पासून नियमित सौदे होण्यास सुरुवात झाली. गांधीनगर अहमदाबाद येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या गुजरात इंटरनॅशनल फायनान्स अँड टेक सिटीमध्ये याचे मुख्यालय आहे. या आंतरराष्ट्रीय शेअरबाजारासंबंधित महत्वाच्या गोष्टी-
कशी आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (Gift City)?
१. जगातील वेगवान एक्सचेंज:
- या बाजारात सर्वात जलद सौदे होऊ शकतात. एक ऑर्डर देण्याचा कालावधी ४ मायक्रोसेकंद इतका आहे. मुंबई शेअरबाजारात ६ मायक्रोसेकंद तर सिंगापूर बाजारात हीच वेळ ६० मायक्रोसेकंद आहे.
- अत्याधुनिक अशी T7 ही पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्याने हे शक्य झाले आहे. याशिवाय जगभरात उपलब्ध असणारी को लोकेशन सुविधा आणि एच एफ टी च्या माध्यमातून अल्गोरिदमिक ट्रेडिंग करण्याची परवानगी आहे.
२. जगभरातील गुंतवणूकदारांना सोयीस्कर वेळ:
- हा बाजार भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजता चालू होतो, ज्यावेळी आपल्या पूर्वेकडील देश जपानचा बाजार उघडतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता बंद होतो तर आपल्या पश्चिमेकडे असलेल्या अमेरीकेतील बाजाराची आधीच्या दिवसाचा बाजार बंद होण्याची वेळ होते.
- अशा प्रकारे एका दिवसात २४ तासांपैकी २२ तास बाजार चालू राहतो. येथे होणारे व्यवहार सेबी कायदा १९९२ व विविध रेगुलेटर्सच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आदेशांचे पालन करतील. आठवड्याचे ५ दिवस येथे व्यवहार होऊ शकतील.
३. मोठी गुंतवणूक:
- या बाजाराचा विस्तार आणि विकास, जगातील अत्याधुनिक बाजारात अग्रगण्य बाजार व्हावा यासाठी मुंबई शेअरबाजाराने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जी येत्या तीन वर्षात पूर्ण होईल.
४. सर्वाधिक कर्मचारी मुंबईतील:
- या बाजारात काम करण्यासाठी स्थानिक आणि परदेशी २५० कर्मचारी असून १०० हून अधिक कर्मचारी मुंबईतील आहेत. तेथे सर्वांसाठी स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था करण्याची करण्यात आली आहे.
मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)
५. व्यवहारासाठी विविध पर्याय:
- या बाजारात भारतीय बाजारात न नोंदवलेले परदेशी कंपन्यांचे शेअर, काही भारतीय कंपन्यांचे शेअर, डिपॉसीटरी रिसीट, कर्जरोखे, करन्सी, इंडेक्स, व्याजदर, कमोडिटी यांसर्वांचे डिरिव्हेटिव प्रोडक्ट यांची आणि पुढे परवानगीअधीन काही गोष्टींच्या खरेदी विक्री व्यवहार करता येतील.
- नियामकांच्या नियमांचे पालन करून हे व्यवहार अत्यंत कमी खर्चात होतील याची काळजी घेण्यात आली आहे. सिक्युरिटी/ कमोडिटी ट्रान्सक्शन टॅक्स, आयकर, लाभांशकर, भांडवली नफ्यावरील कर आकारण्यात येणार नाही. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.
६. जगभरात दलालांचे जाळे:
- २५०हून अधिक दलाल यांच्यामार्फत जगभरातून या बाजारात व्यवहार करता येणे शक्य आहे. ही संख्या नजीकच्या काळात वाढायची शक्यता. वेगवेगळ्या ४ प्रकारच्या मेंबर्सना व्यवहार करण्याची परवानगी. सेबीने सुचवल्याप्रमाणे अत्यावश्यक गोष्टींचे पालन करून येथील दलाल स्वतःसाठी आणि त्यांच्या अनिवासी भारतीय व परदेशी ग्राहकांच्या वतीने थेट व्यवहार करतील.
- या शेअरबाजाराचे स्टॉक एक्सचेंज, कमोडिटी एक्सचेंज, सौंदापूर्ती करणाऱ्या संस्था, डिपॉसीटरी, गुंतवणूक सल्लागार, पर्यायी गुंतवणूक फंड, म्युच्युअल फंड हे घटक असतील. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्यांच्या भारतीय उपकंपनीमार्फत येथे व्यवहार करावे लागतील. भारतीय गुंतवणूकदार त्यांना असलेल्या विदेशी चलनाच्या गुंतवणूक परवानगीएवढी रक्कम येथे गुंतवू शकतील.
७.सुरक्षितता:
- व्यवहार व्यवस्थित व्हावे कोणीही त्यात हस्तक्षेप करू नयेत याची पुरेशी काळजी घेण्यात आली आहे.
या बाजारात २५ जुलै २०१९ रोजी सर्वाधिक दैनिक (4.5 bilion USD म्हणजेच भारतीय रुपयांत ३१२५० कोटीहून अधिक) उलाढाल झाली आहे.
राष्ट्रीय शेअरबाजारानेही आपल्या उपकंपनी मार्फत एनएससी इंटरनॅशनल एक्सचेंज हा आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन केला असून त्यावरील व्यवहारांची सुरुवात ५ जून २०१७ रोजी झाली. येथे इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज प्रमाणेच सर्व सोयीसुविधा असून हा बाजार सकाळी ८ ते सायंकाळी ५ व संध्याकाळी ५:३० ते रात्री ११:३० अशा दोन सत्रात चालतो. अशाप्रकारे भारतातील दोन्ही आंतरराष्ट्रीय बाजार गिफ्ट सिटीमध्ये कार्यरत झाले आहेत.
– उदय पिंगळे
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.