अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कालच मरक संक्रांत झाली. सर्वाना तिळगुळ मिळाले. सरकारने ही करदात्यांना ई-वे बीलाचे तिळगूळ दिले. परंतु आता ई-वे बीलामुळे कोणाकोणावर संक्रात येणार आहे ?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, ई-वे बील ह वस्तूंच्या हालचालीचा पुरावा देणारे जीएसटी पोर्टलवर निर्मीत झालेले इलेक्ट्रोनिक दस्तऐवज आहे. १६ जानेवारी म्हणजेच उद्यापासुन ह्या तरतुदी चाचणी आधारावर लागू करण्यात येतील आणि १ फेब्रुवारी पासून ई-वे बिल नियमाची अंमलबजावणी होईल. म्हणून ई-वे बीलामूळे विक्रेता, खरेदीदार आणि वाहतूकदार यावर संक्रांत येणार आहे.
अर्जुन: कृष्णा , विक्रेत्यासाठी ई-वे बीलचे काय महत्व आहे?
कृष्ण : अर्जुना, विक्रेता म्हणजे पुरवठादार. जर वाहतूकीचे मूल्य रु ५००००/- पेक्षा जास्त असेल, तर ई-वे बीलची निर्मीती अनिवार्य आहे. ई-वे बील मध्ये प्राप्तकर्त्याचा जीसटीआयएन, पावती क्र., दिनांक, वस्तूंचे मूल्य, एचएसएन कोड इत्यादी तपशील द्यावा लागेल. या तपशीलाच्या आधारे पोर्टलवर पुरवठादाराचे जीएसटीआर १ तयार होईल म्हणून विक्रेतासाठी ई-वे बील म्हत्वाचे आहे.
अर्जुन : कृष्णा, खरेदीदारासाठी ई-वे बीलचे काय महत्व आहे?
कृष्ण : अर्जुना, खरेदीदार म्हणजे प्राप्तकर्ता. प्राप्तकर्तासाठी तर ई-वे बील खूप महत्वाचे आहे. प्राप्त झालेल्या संपूर्ण वस्तूंचा तपशील ई-वे बीलव्दारे तपासला जाऊ शकतो. आपल्या ऑर्डर प्रमाणेच पुरवठा झाला का ? त्याचे मूल्य वस्तूंचा एचएसएन, इत्यादी गोष्टी प्राप्तकर्ता ई-वे बीलावरून तपासू शकतो.
अर्जुन : कृष्णा, वाहतूकदाराचा आणि ई-वे बीलाचा काही संबंध आहे का?
कृष्ण : अर्जुना, वाहतूकदार हा विक्रेता आणि प्राप्तकर्ता यामधील सर्वात महत्वाचा दुवा आहे . विक्रेता आणि प्राप्तकर्ता या दोघांनाही ई-वे बील निर्मीत केले नाही , तर ती जबाबदारी वाहतूकदारावर येते. ज्याच्या कडून माल घेतला, ज्याला माल पोहचवतोय , गाडी नं. इत्यादी सर्व तपासण्याचे काम वाहतूकदाराचे आहे. जर वाहतूकीसाठी मधेच गाडी बदलली तर वाहतूकदाराने पोर्टलवर फॉर्म जीएसटी ईडब्ल्यूबी ०४ अपलोड करावा. वाहतूकदाराने जर ई-वे बील निर्मीत नाही केले तर त्याला करदायित्व किंवा रु १० हजार यामध्ये जे जास्त असेल तेवढी पेनल्टी भरावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, कर अधिराकाऱ्यासाठी ई-वे बीलचे काय महत्व आहे?
कृष्ण : अर्जुना, ई-वे बील आणि कर अधिकारी यांचा दोन वेळेस सामना होईल. अगोदर वाहतूकीच्या वेळी रस्त्यावर उभे राहून ते मालाची तपासणी करतील आणि नंतर निर्धारणाच्या वेळी देखील कर अधिकारी ई-वे बीलाची तपासणी करतील. जर काही तफावत आढळली तर कर अधिकारी कारवाई आणि मालाची जप्ती देखील करू शकतील. विक्रेता, प्राप्तकर्ता, वाहतूकदार किंवा कर अधिकरी यांचे बेकायदेशिर वर्तनामुळे रस्त्यावरील भ्रष्टाचार वाढू शकतो.
अर्जुन : कृष्णा,करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, १ फेब्रुवारी पासून ई-वे बीलाचा प्रारंभ होणार आहे. ई-वे बिलामुळे वाहतूकदारावर संक्रांत येणार आहे. वाहतुकी मधील सर्वात महत्वाचा दुवा हा वाहतूकदार आहे. वाहतूकदाराने काही गोंधळ केला तर विक्रेता आणि प्राप्तकर्ता दोघेही संकटात सापडतील. म्हणून जीएसटीच्या तरतुदींचे पालन करूनच वाहतूकदाराने मालाची वाहतूक करावी.