पेठांचे शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हर्षल हॉल, कर्वे रोड, कोथरूड येथे ९ जानेवारी ते १३ जानेवारी २०२० या कालावधीत ‘मुंबई ग्राहक पंचायत’ या स्वयंसेवी ग्राहक संस्थेमार्फत ‘ग्राहक पंचायत पेठे’चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या नावात मुंबई असले तरी संस्थेची व्याप्ती आज रत्नागिरी पासून पालघर, पुणे, नाशिक इथपर्यंत पसरली असून, संस्थेने आपल्या कार्याचा ठसा अगदी “युनायटेड नेशन्स (United Nations)” पर्यंत उठवला आहे.
- ‘मुंबई ग्राहक पंचायत’ ही ग्राहकांनी ग्राहकांसाठी स्थापन केलेली आशिया खंडातील सर्वात मोठी अशी स्वयंसेवी ग्राहक संस्था असून ‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
- सार्वजनिक न्यास म्हणून तिची नोंदणी झाली असून, ‘Consumer International’ (CI) या आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेची ती सदस्य आहे.
- वितरण हा संस्थेचा पाया असून त्याद्वारे दैनंदिन वापराच्या ९० ते ९५ वस्तू आणि साठवणीच्या किंवा विशेष अशा ५ ते १० वस्तू अशा एकूण १०० हून अधिक वस्तू संस्थेच्या सभासदांना दरमहा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात.
- आधी मागणी, मग पैसे, नंतर वस्तू वितरण या वितरणाच्या अभिनव पद्धतीने त्या संस्थेच्या सदस्यांना वितरित केल्या जातात.
- ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर जेवढी मागणी तेवढीच वस्तूंची खरेदी ह्या पद्धतीने प्रामुख्याने उत्पादकांकडून अथवा मुख्य वितरकाकडून एकत्रित खरेदी केल्या जातात.
- या व्यवस्थेमधे मध्यस्थ किंवा दलाल वगळले जातात. यामुळे १०% ते १५% मासिक बचत संस्थेच्या सदस्यांची होतेच, शिवाय योग्य भाव, योग्य दर्जा, योग्य वजन या ग्राहकांच्या प्राथमिक अपेक्षा पूर्ण होतात. हे करत असताना शाश्वत जीवनशैली, पर्यावरण रक्षण, प्लास्टिकचा कमीतकमी वापर, ग्राहकांचे आरोग्य याचा विचार केला जातो.
- सध्या या वितरण व्यवस्थेचा लाभ मुंबईसह ठाणे, वसई, पालघर, रायगड, दापोली, रत्नागिरी, पुणे येथील ३३००० कुटुंबांना होत आहे. कोणतीही सरकारी मदत न घेता केवळ सभासदांच्या वार्षिक वर्गणीतून संस्थेचा कारभार आणि ग्राहक हिताच्या मोहिमा आणि उपक्रम राबविले जातात.
- दोन हजारहून अधिक स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या बळावर संस्थेचे कार्य चालते. अशा तऱ्हेने स्वबळावर सुरू असलेली, मोठया प्रमाणात विविध उपक्रम राबवणारी, ग्राहकांनी ग्राहकांसाठी चालवलेली ही जगातील एकमेव स्वयंसेवी ग्राहक संस्था आहे. सर्वाधिक सभासद असल्याने ग्राहकांचा स्वतंत्र असा दबाव गट यामुळे निर्माण झाला आहे.
- संस्थेतर्फे शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे यांच्यासाठी ग्राहक जागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जातात. विविध वृत्तपत्रातून ग्राहक जागृतीचे लेख आकाशवाणी, दूरदर्शन अशा माध्यमांवर ग्राहक जागृतीचे कार्यक्रम सादर केले जातात.
- ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मदत व्हावी म्हणून विनामूल्य तक्रार मार्गदर्शन केंद्रे संस्थेतर्फे चालवली जातात. ग्राहकांच्या रक्षणाचे अनेक पथदर्शी निकाल संस्थेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन मिळवले आहेत.
- घर खरेदीदारांच्या रक्षणासाठी ‘रेरा’ कायदा घडवण्यात संस्थेचा मोठा वाटा आहे. रेरा कायद्यांतर्गत सलोख्याने, (Conciliation) घर खरेदीदारांच्या तक्रारीचे निवारण विनाविलंब करण्याची संकल्पना देखील संस्थेचीच!
- ग्राहक हिताचा विचार करून वितरणात देता न येणारी नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी ग्राहक पंचायत पेठांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येते.
- येणारे सणवार, लग्नसराई, पूर्वनियोजित कार्यक्रम यासाठी योजना आखून त्याप्रमाणे वस्तूंची खरेदी करता येणे यामुळे शक्य होते.
- ज्यावेळी अशा प्रकारे हॉल भाड्याने घेऊन पेठ भरवण्याचा कोणी विचारही केला नव्हता तेव्हापासून आजपर्यंत गेले ४२ वर्षांहून अधिक काळ हा अभिनव उपक्रम चालू असून दरवर्षी त्यात नवीन ठिकाणांची भर पडत आहे.
- सध्या अनेक वस्तू जसे पर्सेस, साड्या, ड्रेस मटेरियल, सर्वांसाठी तयार कपडे, स्वेटर्स, होजियरी, घरगुती वापरासाठी उपकरणे, गृहसजावटीच्या वस्तू, पडदे, चादरी, परफ्युम्स, भेटवस्तू याशिवाय इतर नाविन्यपूर्ण उत्पादने येथे उपलब्ध आहेत.
मुंबई ग्राहक पंचायत पेठांची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
- नावीन्यपूर्ण दर्जेदार उत्पादने रास्त किंमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध.
- छोट्या उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय उभारणीच्या काळात व्यासपीठ दिले जाते.
- गाळेधारकांची मुलाखत घेऊन त्यांच्या मालाची पारख करून विक्री किंमत आधीच ठरवून घेतलेली असते. याहून अधिक अथवा कमी किंमतीत वस्तू येथे विकता येत नाही. इथे किंमतीची घासाघीस नाही, फ्री, फुकटचे आमिष नाही.
- काळानुरूप पेठेत बदल होत असून, आता तिची आखीव रेखीव अशी मांडणी केली आहे. सुसज्ज हॉल, पार्किंगची सोय व मध्यवर्ती ठिकाण याचा पेठ भरवण्यापूर्वी विचार केला जातो.
- वाजवी दारात दर्जेदार उत्पादने, प्रत्येक खरेदीची पावती, प्लास्टिक पिशव्यांना मज्जाव, सदोष वस्तू बदलण्याची सोय येथे आहे.
- बाजारपेठेतील उचित व्यापारी प्रथांचा अवलंब करून व्यवसाय कसा करावा ह्याचा आदर्श वस्तूपाठ या ग्राहक पंचायत पेठांतून उद्योजकांना दिला जातो.
- नियमित वितरणात देत असलेल्या वस्तूंपैकी मोजक्याच वस्तू येथे ग्राहकांना उपलब्ध असून यामागे लोकांनी त्या वस्तू पहाव्या त्याची किंमत व दर्जा पारखावा आणि संघ स्थापना करून अथवा नजीकच्या संघात सामील होऊन वितरणात सहभागी व्हावे हा आहे.
- ‘जागो ग्राहक जागो’ हा ग्राहकांचे सक्षमीकरण करणारा स्टॉल प्रत्येक पेठेत चालवला जातो. ग्राहकांनी फक्त खरेदी न करता ‘सुजाण ग्राहक’ बनावे अशा रीतीने याची मांडणी केलेली असते. प्रश्नावली सोडवून घेऊन, भेसळ प्रात्यक्षिक दाखवून, दूध भेसळ तपासणी करून, बीएसआय, हॉलमार्क, एफएसएसएआय यांच्याविषयी माहिती सांगून ग्राहक जागृती केली जाते. ग्राहकपयोगी प्रकाशने येथे उपलब्ध आहेत.
- स्वयंसेवी संस्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विनामूल्य स्टॉल देऊन सामाजिक बांधिलकी जपली जाते.
आपण सर्वांनी येथे भेट देऊन भरघोस खरेदी करावी आणि ‘जागो ग्राहक जागो’ च्या स्टॉलवर भेट ‘सजग ग्राहक’ होण्याच्या अभियानात सामिल व्हावे यासाठी आग्रहाचे निमंत्रण!
नियमित सभासद होऊन वितरणात सामील व्हावे ते शक्य नसेल, तर सहयोगी सभासद होऊन या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे.
ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून आपली काही योजना असेल, या कार्यास हातभार लावायचा असेल, सूचना असतील किंवा त्यात सहभागी व्हायचे असेल तर ग्राहक पंचायत पेठेत ठेवलेल्या अभिप्राय वहीत आपल्या संपर्कासहीत लिहाव्यात. त्या योग्य वाटल्यास आपल्याशी निश्चित संपर्क साधला जाईल.
– उदय पिंगळे
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/