Reading Time: 2 minutes
कोपरखळी म्हणजे काय तर कोणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली कृती. फेसबुकवर ‘पोक’चा पर्याय असतो, त्याचा उपयोग बऱ्याच जणांना माहिती असेल. पोक करणे म्हणजेच लक्ष वेधून घेणे म्हणजेच कोपरखळी मारणे. भारतीय कर तसेच महसूल विभागानेही आता नवीन पद्धतीचा आणि उपाययोजनांचा वापर करून करदात्यांना विशेष करून बेजबाबदार करदात्यांना कोपरखळी मारली आहे.
- १ जुलै २०१७ रोजी ‘अप्रत्यक्ष कर सुधार वस्तू आणि सेवा कर’ म्हणजेच जीएसटी (GST) सुरू करण्यात आला. जीएसटी सिस्टम आता हळूहळू स्थिरावत आहे. परंतु ‘द सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स (CBIC)’ आता अनुपालन आणि चोरीची (tax evasion) तपासणी करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाऊले उचलीत आहे.
- जीएसटी कायद्याच्या अंतर्गत करविलंब आणि कर चोरीच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी सरकारने डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंसची (DGGSTI) स्थापना केली आहे. हे मंडळ करचोरी, करविलंब याबद्दल लक्ष ठेवणार आहे.
- यासंदर्भात ‘नज टीम’ ची (Nudge Team) पहिली मिटिंग लवकरच ‘प्रिंसिपल डायरेक्टर जनरल जीएसटी’ यांच्यामार्फत बोलाविण्यात येईल.
- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, मेक्सिको इ. देशांकडून कर भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध जे धोरण अवलंबले जाते, त्याच धोरणाचे अवलंबन भारतीयकर व महसूल विभाग आता करणार आहे.
- लवकरच भारतीय महसूल विभाग करदात्यांच्या कर भरण्यासंबंधित वर्तवणुकीचा अभ्यास करून त्यानुसार वेळेवर कर भरण्यासाठी करदात्यांचे लक्ष कोपरखळीने वेधून घेणार आहे, जेणेकरून कर भरण्याची टाळाटाळ करणारे त्यांच्या करदायित्वाचा गांभीर्याने विचार करतील.
- द सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स (CBIC) यांनी करदात्यांना वेळेवर कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी खंडिकृत दृष्टिकोनाद्वारे धोरण राबवणार आहे. यामध्ये करदात्यांच्या कर भरण्याच्या पद्धतीच्या वर्तणुकीचा अभ्यास करून त्याचे वर्गीकरण केले जाईल. प्रामाणिक करदाते, ‘कर भरण्यास टाळाटाळ करणारे’, ‘कर चुकविण्याचा प्रयत्न करणारे’, इत्यादी प्रकारांमध्ये करदात्यांचे वर्गीकरण केले जाईल.
- प्रामाणिक करदाते नेहमीच आपला कर वेळेवर भारत असतात त्यांना या वर्गीकरणामध्ये ‘टॅक्स सपोर्टर’ तर कर भरण्याची इच्छा असणारा परंतु त्यासंदर्भात अडचणी असणाऱ्या करदात्याला ‘ट्रायरर’ समजण्यात येईल. याशिवाय डिसएंगेज्ड (कर न भरणारे) व रेझिस्टर्स किंवा प्रतिरोधक म्हणजेच कर चुकविणारे करदाते, इत्यादी प्रकारही या वर्गीकरणामध्ये समाविष्ट केले जातील.
- यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या मते वर्तणुकीचा अभ्यास व त्याचे वर्गीकरण (Behavioural pattern) करताना करदात्याची सामाजिक पत, निष्पक्षपात, समज आणि करनीती यावरही भर दिला जाणे आवश्यक आहे.
- काही करदाते त्यांच्या करदायित्वाबाबत निष्काळजी असतात. अशा बेजबाबदार करदात्यांच्या बाबतीत काहीसं मवाळ धोरण स्वीकारून त्यांना समज दिली जाईल . त्यांना आयकर विभागाकडून वैयक्तीक ई-मेल केले जातील व कर भरण्यासंबंधी विनंती वजा आदेश देण्यात येईल.
- तसेच, पैशाची कमतरता अथवा अन्य काही अडचणींमुळे करदात्याला कर भरणे शक्य नसल्यास, त्यांच्याबाबतीत वेगळा विचार केला जाईल. तसेच अशा करदात्यांना आयकर हप्त्यातसुद्धा भरता येईल. यासंबधीत तरतुदींची माहिती करदात्याला देण्यात येईल. शिवाय करदात्यांना संबधीत कायद्यांची व त्यातील तरतुदींची माहिती देऊन कर भरण्याचे महत्व, पद्धती समजावून सांगितली जाईल, जेणेकरून करदाता ‘करसाक्षर’ होऊन वेळेवर कर भरण्याचा प्रयत्न करेल.
कोपरखळी ही लक्ष वेधण्यासाठी असते. करदात्यांनी कोपरखळीचा अर्थ लक्षात घ्यावा, कोपराने जोरात धक्का देण्याची वेळ येऊ देऊ नये.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Q8LTdY )
Share this article on :