Child Future Plan: मुलांच्या भविष्याची तरतूद
आपल्यापैकी प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या भविष्यातील वाटचालीचा (Child Future Plan) विचार करत त्यांच्यासाठी काही बचत करून ठेवलेली असतेच. आपल्या मुलाला भविष्यात लागणाऱ्या खर्चाची तजवीज आत्ताच केली तर त्यांना त्यांचं इच्छित भविष्य घडवण्यात कुठलीही अडचण येणार नाही. परंतु, आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असताना, त्यासाठी बचत करत असताना आपण अनेक बाबींचा विचारच करत नाही म्हणजे दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्रात वाढणारा खर्च, आरोग्य सुविधांमध्ये वाढणारा खर्च यासारखे अनेक लहान-मोठे खर्च आपल्याकडुन देखील राहून जातात. ज्यामुळे भविष्यातील आपला ठोकताळा चुकू शकतो. तेव्हा मुलांच्या भविष्यासाठी कशा पद्धतीने आर्थिक नियोजन करायला हवे याबद्दल आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊयात.
आपल्यापैकी अनेक पालकांनी त्यांच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी थोडं आधीपासूनच नियोजन करायला सुरुवात केलेली असते. परंतू, वर सांगितल्याप्रमाणे लहान-मोठ्या गोष्टी हिशोबात घ्यायच्या राहून जातात आणि मग याच गोष्टी तुमचे भविष्यातील आर्थिक नियोजन बिघडवायला कारणीभूत ठरते. मुलांसाठी आर्थिक नियोजन करताना काही महत्वाच्या घटकांचा विचार तुम्ही करायला हवा.
हे नक्की वाचा: लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १
Child Future Plan: काही महत्वाच्या गोष्टी
१. एकूण खर्चाचा आकडा तयार करा
- आपल्या मुलाला कुठल्या क्षेत्रात रुची आहे किंवा तो भविष्यात कुठल्या क्षेत्रात करिअर करू शकतो याचा विचार करत अंदाजे खर्चाचा एक आकडा तुम्ही तयार करायला हवा.
- हा खर्च लक्षात घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, भविष्यात शिक्षणाचा खर्च हा किमान नऊ ते दहा टक्क्यांनी वाढू शकतो त्यामुळे या घटकाचा विचार करूनच तुम्ही तुमचा अंतीम आकडा ठरवा.
- त्यासोबतच यामध्ये इतरही लहान-मोठ्या गोष्टींचा म्हणजेच कोचिंग क्लास, वह्या पुस्तकांचा खर्च, इत्यादी घटकांचा विचार देखील नक्कीच करायला हवा.
- जर तुम्ही तुमच्या मुलाला विदेशात उच्चशिक्षणासाठी पाठवणार असाल, तर त्यासाठी देखील तुम्हाला नियोजन करावे लागेल.
- अर्थात या सर्व गोष्टी कोर्सवर अवलंबून आहेत, म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जास्त खर्च लागतो तर इतर अभ्यासक्रमांसाठी त्यापेक्षा तुलनेने कमी खर्च गृहीत धरावा.
२. विचारपूर्वक नियोजन करा
- जेव्हा तुमचा अंतिम खर्च ठरेल तेव्हा अगदी कौशल्यपूर्वक बचतीचे नियोजन करा.
- तुमचे आर्थिक गणित तुम्हाला महिन्याला किती प्रमाणात पैसे वाचवावे लागतील याचा तपशील देईल.
- एवढेच नाही तर तुम्हाला बचतीच्या पैशांना योग्य पद्धतीने गुंतवणूक करायला लागेल.
- नेहमी लक्षात ठेवा जर भरपूर काळासाठी तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यातून जास्त प्रमाणात बेनिफिट मिळू शकतो.
- जर तुमच्याकडे वेळ कमी आहे, अगदीच दोन-तीन वर्षात तुम्हाला पैसे परत हवे आहेत तर भरपूर गोष्टींचा विचार न करता बँकेत एफडी केलेली केव्हाही चांगले.
लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २
३. पर्यायांचा विचार करा
- तुमची प्रत्येक महिन्याला होणारी बचत ठरली की मग तुम्हाला आवश्यकता आहे एका चांगल्या ‘चाइल्ड एज्युकेशन प्लॅनची’!
- आपण कुठल्या माध्यमाने पैसे गुंतवणार आहात हे ठरलं की तुम्हाला हा प्लॅन अगदी व्यवस्थित पद्धतीने तयार करता येईल, त्यासाठी तुम्ही एखाद्या गुंतवणूक तज्ज्ञाची मदत घेऊ शकता.
- हा प्लॅन तयार करताना मात्र भविष्यातील सर्व गोष्टींचा विचार करा, अगदी सर्व दुर्भाग्यपूर्ण गोष्टींचा विचारही करा, कारण वेळ काही सांगून येत नाही.
४. प्रीमियम वेव्हर बेनिफिट
- आपला प्लॅन तयार करताना तो ‘प्रीमियम वेव्हर बेनिफिट’ या प्रकारात बसेल याची काळजी घ्या, म्हणजेच जर भविष्यात दुर्दैवाने तुमचा अपघात झाला किंवा काही कारणाने तुमचा मृत्यू झाला, तरीदेखील त्याचा परिणाम त्या प्लॅनवर होणार नाही आणि तुमच्या मुलाला तेवढीच किंमत मिळेल जेवढी सुरवातीला मिळणार होती.
- तुम्ही तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करत आहातच, परंतु त्यासोबतच आपल्या मुलांमध्ये देखील चांगल्या विचारांची गुंतवणूक करा. त्याला तुमच्या व्यवहारांबद्दल माहिती देत चला.
- तुम्ही त्याच्या भविष्यासाठी केलेल्या गुंतवणूक त्याला माहिती असू द्या. यामुळे तो अधिक जबाबदारीने वागेल.
हे नक्की वाचा: मुलांना आर्थिक नियोजन शिकवणारे ‘किड्स सेव्हिंग अकाउंट’
५. कर नियोजनाचाही विचार करा
- आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपला कर वाचायला हवा आणि हा वाचणारा पैसा कुठेतरी आपल्याला उपयोगी यायला हवा.
- कर वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये उत्तम पर्याय निवडा. विचारपूर्वक व्यवस्थित नियोजन केले तर कर नक्कीच वाचला जाऊ शकतो.
- सध्या अनेक करबचत करून देणाऱ्या योजना उपलब्ध आहेत. उगाच उच्च परताव्याच्या अमिषाला बळी पडून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे केव्हाही उत्तम
- तुम्ही वाचवलेला प्रत्येक पैसा तुमच्यासाठी मौल्यवान आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे लक्षात घ्या जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात करा आणि लक्षात घ्या विचारपूर्वक केलेलं नियोजन तुमचं आणि तुमच्या मुलाचं भविष्य (Child Future Plan) घडवू शकतं.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Child Future Plan in Marathi, Child Future Plan Marathi Mahiti, Child Future Plan Marathi