Current Account & Saving Account
बँकेमध्ये अनेक प्रकारची खाती उघडली जातात, यातील दोन प्रमुख खाती म्हणजे चालू खाते आणि बचत खाते (Current Account & Saving Account). या दोन्ही संकल्पनांमधला आणि त्या खात्यांसाठी मिळणाऱ्या सुविधांमधला मूलभूत फरक आपण आज समजून घेणार आहोत. अनेकांना बचत खाते सामान्य लोकांसाठी आणि चालू खाते व्यवसायिकांसाठी एवढीच माहिती असते.
भारतात जवळपास प्रत्येक व्यक्तीचं बचत खातं असतं. बचत खात्यांचं प्रमाण चालू खात्यांपेक्षा निश्चितच जास्त आहे. जर शंभर लोकांचे बचत खातं असेल, तर केवळ त्यामागे दहा लोकांचेचालू खाते असते. बचत खाते हा भारतीय व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आजच्या लेखात आपण या दोन महत्वाच्या खातेप्रकारांमधला मूलभूत फरक समजून घेऊया.
हे नक्की वाचा: बँक खाते आणि रोख रक्कम मर्यादा
Current Account & Saving Account: चालू खाते आणि बचत खाते यामधील मूलभूत फरक
१. उद्देश:
- बचत खाते हे खाते नावाप्रमाणेच बचत करण्यासाठी असतं. त्याचं प्रयोजन हे व्यक्तीने बचत करून खात्यामध्ये पैसे जमा करणे हेच असतं. आपल्या बचतीचं वैयक्तिक खातं म्हणून बचत खातं काढलं जातं.
- चालू खाते हे व्यवसायासाठी आवश्यक असते. व्यावसायिक उद्देशासाठी व व्यवहारांसाठी बँकेमध्ये चालू खाते उघडून ते वापरणे बंधनकारक असतं.
२. पात्रता:
- कोणतीही व्यक्ती बँकेत जाऊन बचत खाते उघडू शकते.
- चालू खाते हे फक्त व्यावसायिक लोकांसाठी असतं.
३. कागदपत्रे:
- बचत खाते उघडताना तुमच्या आर्थिक उत्पन्नाची कोणतीही कागदपत्रे संबंधित बँकेत सादर करावी लागत नाहीत.
- चालू खाते उघडताना तुम्हाला तुमच्या व्यवसायासंदर्भातील कागदपत्रे सादर करावी लागतात.
४. व्यवहार:
- बचत खात्यामधून रोज व्यवहार होत नाहीत. तसेच दरमहा होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचे प्रमाण तुलनेने कमी असते.
- चालू खात्यामधून मात्र जवळपास दररोज आर्थिक व्यवहार होत असतात.
५. रक्कम मर्यादा:
- बचत खात्यामध्ये दिवसाला ठराविक रकमेपर्यंतच (Transaction Limit) व्यवहार करता येतात. ठराविक मर्यादा ओलांडली की बँक दंड आकारू शकते. अर्थात प्रत्येक बँकेचे यासंदर्भातील नियम व अटी वेगवेगळेअसतात.
- चालू खात्यामध्ये दिवसाला कितीही रकमेचे व्यवहार म्हणजे ट्रान्सजॅक्शन्स करता येतात. यासाठी कोणतीही रक्कम दंड म्हणून आकारली जात नाही.
६. व्याज:
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बचत खात्यामध्ये ग्राहकाला त्याच्या ठेवींवर ठराविक दराने व्याज मिळतं. व्याजाचा दर प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असतो.
- चालू खात्यामध्ये मात्र ग्राहकाला कोणतंही व्याज प्राप्त होत नाही.
७. किमान मर्यादा (Minimum Balance):
- बचत खात्यामध्ये किमान रक्कम मर्यादा म्हणजेच मिनिमम बॅलन्ससाठी नियम निश्चित केलेला असतो. बँकेत खाते सुरू करताना ही निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. तसेच खाते चालू ठेवण्यासाठी निश्चित रक्कम बँकेत ठेवावी लागते. यासाठी प्रत्येक बँकेची किमान मर्यादा वेगवेगळी असते. सामान्यतः खाजगी बँकेत पाच हजार ते दहा हजार तर सरकारी बँकेत ही मर्यादा पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत असू शकते. काही बँकांमध्ये शून्य बॅलन्समध्येही खाते सुरू करता येतं आणि चालू ठेवता येतं. तसंच ग्रामीण भाग, छोटे शहर तसेच महानगरांसाठी या मर्यादा वेगवेगळ्या असू शकतात.
- चालू खात्यामध्ये मात्र मात्र किमान रक्कम मर्यादा बचत खात्याच्या तुलनेत जास्त असते. तसेच शून्य किंवा ‘झिरो बॅलन्स अकाउंट’ ही सुविधाही चालू खात्याला मिळत नाही.
विशेष लेख: बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था,
बचत खात्यामध्ये चालू खात्याच्या तुलनेत जास्त फायदा आणि सुविधा मिळत असतील, तर चालू खाते का आणि कशासाठी उघडावं, व्यवसायासाठी चालू खाते का उघडावे लागते, असे प्रश्न पडणं साहजिक आहे.
याचं उत्तर हे की,
चालू खाते हे व्यावसायिक, व्यापारी, मोठया संस्था ज्यांचे आर्थिक व्यवहार रोज होत असतात अशांसाठी असतं. कारण जर बचत खात्यामधून जास्त व्यवहार केले गेले, तर पुढील प्रत्येक व्यवहारात बँक काही फी आकारेल आणि यातच एक मोठी रक्कम जात राहील.
चालू खात्यामधून व्यावसायिक व्यक्ती त्यांच्याकडे नोकरी करत असलेल्या नोकरदारांचा पगार, रोजचे व्यावसायिक व्यवहार असे मोठे आर्थिक व्यवहार केले जातात. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चालू खाते उघडणं आवश्यक असतं. चालू खात्याचा अजून एक फायदा म्हणजे यासाठी मिळणारी ‘ओव्हरड्राफ्ट सुविधा’!
ओव्हरड्रॅफ्ट सुविधा म्हणजे समजा खात्यामध्ये बॅलन्स कमी आहे आणि व्यवहारासाठी जास्त पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, अशावेळी बँक आपल्याकडील मर्यादित रक्कम चालू खात्यामध्ये कर्जाऊ रक्कम म्हणून देते. त्यासाठी प्रत्येक बँकेची स्वतःची वेगळी पॉलिसी असते. एकप्रकारे क्रेडिट कार्डप्रमाणे ही सुविधा काम करते.
अर्थात, याचा अर्थ असा नाही की व्यवसायिकांचं बचत खातं नसतं. त्यांचीही बचत खाती असतात, ज्यात ते रोजच्या वैयक्तिक आयुष्यातील बचत करण्यासाठी पैसे ठेवत असतात. चालू खाते मात्र संपूर्णपणे व्यवसायासाठीच असतं.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies