कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे
कर्जबाजारीपणाची लक्षणे आपल्याला आधीपासूनच दिसू लागतात. ती समजून घेऊन वेळीच सावध झाल्यास आपण कर्जमुक्तीच्या दृष्टीने प्रयत्न करून कर्जबाजरीपणाच्या दुष्टचक्रातून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो.
हे नक्की वाचा: पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १
‘कर्ज’ हा एक शब्द अनेक भावनांना साद घालतो.
प्रत्येक व्यक्तीनुसार या शब्दाभोवती असणाऱ्या भावना बदलत जातात. लहानपणापासून घरात कर्जावरून ताणतणाव बघितलेल्यांना ‘कर्ज’ शब्द ऐकल्यावर एकप्रकारची शिसारी येते.
तर घेतलेली कर्जे वेळच्या वेळी फेडून त्यातून घर, ऑफिस, कारखाना अशी मालमत्ता उभी करणाऱ्या ‘अर्थसाक्षर’ कर्जदारांसाठी कर्ज घेणे म्हणजे सर्वोत्तम निर्णय होय.
-
“कर्ज घेणे चांगले की वाईट?” या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे, परिस्थितीसापेक्ष तसेच ते व्यक्तिसापेक्षही आहे.
-
भारतीय समाज बचतीला महत्व देणारा आणि शक्यतो कर्जापासून दूर राहणारा आहे. पण गेल्या काही वर्षांत आक्रमक जाहिरातबाजीमुळे गरजा वाढल्या. नवीन गाडी, नवीन घर, टिव्ही, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी विविध प्रकारचे कर्ज मोठ्या प्रमाणावर घ्यायला लोकांनी सुरुवात केली.
-
तुमचे घर, शिक्षण आणि व्यवसायवृद्धी सारख्या संपत्ती निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी घेतले जाणारे कर्ज म्हणजे ‘चांगले कर्ज’ समजले जाते.
-
अनावश्यक फर्निचर, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, परदेशी सहली आशा दिखाव्यासाठी आणि ‘हवा’ करण्यासाठी घेतले जाणारे कर्ज म्हणजे ‘वाईट कर्ज’!
संबंधित लेख: सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया
-
तुम्ही दरमहा मिळवलेलं बरंचसं उत्पन्न कर्जाचे हफ्ते फेडण्यात जात असेल तर काहीतरी गडबड आहे. एखादी व्यक्ती कर्जबाजारी आहे किंवा कर्जात गळ्यापर्यंत बुडाली आहे हे ओळखण्याचे काही संकेत आहेत ते पुढीलप्रमाणे:-
-
कर्जबाजारी व्यक्तीला दर महिन्याचे उत्पन्न आजिबात पुरत नाही. त्याच्याकडे अथवा तिच्याकडे कुठलीही बचत नसते.
-
सारखे सारखे पैसे मागून आणि घेतलेले पैसे वेळेवर न फेडून जवळचे नातेवाईक, मित्र दुरावलेले असतात.
-
तो जवळपास सगळीच बिले कधीही वेळेवर भरत नाही. उदा: विजवीतरण विभागातील कर्मचारी विजेचे कनेक्शन तोडायला येईपर्यंत तो बऱ्याचदा वीज देयके भरत नाही
-
एखाद्या न माहितीच्या क्रमांकावरून फोन आल्यास कर्जबाजारी व्यक्ती तो फोन घेण्याचे नेहेमी टाळतो कारण कुठला देणेदार कधी कॉल करेल हे माहिती नसते.
-
तगादा करणाऱ्या लोकांपासून लपण्यासाठी किंवा त्यांना टाळण्यासाठी मोबाईल क्रमांक सारखे बदलले जातात.
-
बँक खात्यात पैसे नसल्याने बराचसा खर्च क्रेडिट कार्डने भागवावा लागतो.
-
क्रेडिट कार्डची दरमहा देणे असलेली रक्कम कमीत कमी जेवढी भरणे आवश्यक आहे, तेवढीच म्हणजे ‘मिनिमम अमाउंट ड्यु’ इतकी भरली जाते.
-
क्रेडिट कार्डची देणी विहित तारखेला न भरल्याने लेट फी भरणे भाग पडते कारण वेळेवर भरण्यासाठी तेवढे पैसे नसतात.
-
गळ्याशी आलेल्या खर्चांसाठी क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढली जाते. त्यावर वार्षिक ३६% ते ४२% दराने व्याज भरावे लागते.
-
कर्जबाजारी व्यक्ती नक्की किती देणेदारी आहे याची यादी करायचे सुद्धा सोडून देतो.
-
एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज नेहेमी घेतले जाते. गृह कर्जाचे ‘टॉप अप’ या गोंडस नावाखाली नवीन कर्ज घेऊन त्यातून थकलेलं क्रेडिट कार्ड बिल किंवा वाहन कर्ज फेडले जाते.
-
विविध बँका, क्रेडिट कार्डवाले ‘वसुली अधिकारी’ नियमितपणे कर्जबाजारी व्यक्तीला थकीत हफ्ते फेडण्यासाठी कॉल करतात किंवा त्याच्या घरी येतात.
-
वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे वारंवार जोडीदाराशी खोटे बोलावे लागते आणि कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते.
-
कर्जाचा ताण घालवण्यासाठी पावले आपोआप व्यसनांकडे वळतात आणि अजूनच परिस्थिती बिकट होते.
हे नक्की वाचा: होम लोनचं प्रीपेमेंट करताना ह्या बाबींचा विचार जरूर करा
कर्ज प्रत्येकवेळी वाईटच आहे असे नाही. कर्जाचा सुयोग्य वापर करण्यासाठी आपण कर्ज आवश्यक गरज भागवण्यासाठी घेतो आहोत की मजा करण्यासाठी घेतो आहोत याचा स्वतः आधी विचार करायला हवा. कुठलीही बँक तुम्हाला तुमच्या इच्छेशिवाय कधीही कर्ज देत नाही. पुढच्या लेखात कर्जाच्या जोखडातून सुटकेचे सहज, सोपे मार्ग बघू.
– सी.ए. अभिजीत कोळपकर
(अभिजीत कोळपकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून ते अर्थसाक्षरता अभियानात काम करतात.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies