जॉबवर्क आणि ई-वे बिलाची समस्या

Reading Time: 2 minutes

अर्जुन (काल्पनिक पात्र)- कृष्णाई-वे बील आता सर्व राज्यांमध्ये व सर्वत्र लागू झाले आहे. परंतु, अनेक व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री व्यतिरिक्त व्यवहारांसाठी ई-वे बील कसे लागू करावे किंवा बनवावे याबाबतीत संभ्रम आहे.

कृष्ण (काल्पनिक पात्र)- अर्जुना, बरोबर आहे. खरेदी-विक्री सोडून इतर अनेक व्यवहार व्यापाऱ्यांना व्यापारासाठी करावे लागतात. जसे फ्री सॅम्पल, जॉबवर्क, वस्तू पाछविताना ग्राहक माहित नसणे, इ. परंतु असे व्यवहार करताना त्याच्या जीएसटी व ई-वे बिलाच्या तरतूदी माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील.

अर्जुन- कृष्णा,  जॉबवर्कसाठी पाठवलेल्या वस्तुसांठी ई-वे बील बनवावे लागते का?

कृष्ण- अर्जुना, जर वस्तुंचे दळणवळण खालील कारणासांठी होत असेल तर त्याला ई-वे बील बनविणे अनिवार्य आहे-

 • वस्तुंच्या पुरवठ्यासाठी
 • पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणांसाठी
 • अनोंदणीकृत व्यक्तीकडून माल खरेदी करताना.

पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणांसाठी यामध्ये जॉबवर्करचाही समावेश आहे. म्हणून ई-वे बील बनविणे गरजेचे आहे. ई-वे बील प्रिन्सीपलने जॉबवर्करला दिलेल्या डिलीव्हरी चलनच्या आधारावर बनवले जाईल. तसेच जेव्हा माल परत येईल, जॉबवर्कर डिलीव्हरी चलन बनवेल.

अर्जुन- कृष्णा,  जॉबवर्कसाठी माल पाठविताना ई-वे बील न बनविण्याची ५०,००० रूपयांची मर्यादा लागू आहे का?

कृष्ण- अर्जुना, जॉबवर्कसाठी पाठविलेल्या वस्तुंचे दोन प्रकार आहेत-

 • राज्यांतर्गत- जर वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जॉबवर्कसाठी पाठवली तर त्याचे मूल्य कितीही असले तरी त्याचे ई-वे बील बनविणे अनिवार्य आहे.
  उदा.- जर औरंगाबादमधील व्यापाऱ्याने जॉबवर्कसाठी इंदौरला १०,००० रूपयांच्या वस्तू पाठवल्या, तर त्याला ई-वे बील बनविणे अनिवार्य आहे.
 • राज्यांतर्गत- जर वस्तू राज्यांतर्गत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जॉबवर्कसाठी गेल्या व त्याचे मूल्य रू. ५०,००० पेक्षा कमी असेल तर ई-वे बील बनविणे गरजेचे आहे.
  उदा.- जर वस्तू जॉबवर्कसाठी औरंगाबादहून नाशिकला गेल्या व त्याचे मूल्य रू. ३०,००० असेल तर ई-वे बील बनविण्याची गरज नाही.

अर्जुन- कृष्णा, जॉबवर्कचे ई-वे बील कसे बनवावे?

कृष्ण- अर्जुना, प्रिन्सिपलला ई-वे बील बनविण्यालाठी ई-वे बील पोर्टलवर लॉगीन करावे लागेल व त्यानंतर खालीलप्रमाणे ई-वे बील बनवावे लागेल.

 • त्याने जनरेट ई-वे बीलवर क्लिक करावे.
 • त्यानंतर व्यवहाराचा प्रकार- जॉबवर्क निवडावा
 • डॉक्युमेंटचा प्रकारृ डिलिव्हरी चलन निवडावा.
 • त्यानंतर जॉबवर्करचा जीएसटी नंबर नमूद करावा. जर जॉबवर्कर अनोंदणीकृत असेल तर अनरजिस्टर्ड पर्सन निवडावे.
 • त्यामध्ये वस्तुचे मूल्य, नाव, एस एस एन कोड, कराची रक्कम ही सर्व माहिती डिलिव्हरी चलनाच्या आधारे नमूद करावी.
 • त्यानंतर ई-वे बील पार्ट बी म्हणजेच ट्रान्सपोर्टची माहिती द्यावे.

अर्जुन- कृष्णाई-वे बील बनविताना जॉबवर्कसाठी पाठविलेल्या वस्तुंचे मूल्य कोणते नमूद करावे व जॉबवर्क झाल्यानंतर ते परत येताना जॉबवर्करने कोणते मूल्य नमूद करावे?

कृष्ण- अर्जुना, ई-वे बील डिलिव्हरी चलनच्या आधारे बनवावे. डिलिव्हरी चलनमध्ये नमूद केलेले मूल्य ई-वे बीलच्या पार्ट-अ मध्ये नमूद करावे. तसेच जॉबवर्क झालेल्या वस्तू परत प्रिन्सीपलला पाठविताने तेच मूल्य नमूद करावे.

उदा.- अ व्यक्तीने ब जॉबवर्करला २,००,००० रूपयांच्या वस्तू पाठविल्या तर अ व्यक्ती डिलिव्हरी चलन व ई-वे बीलच्या पार्ट-अ मध्ये २,००,००० रूपये नमूद करेल. तसेच जेव्हा ब जॉबवर्कर वस्तू अ ला परत ब ने ई-वे बीलमध्ये २,००,००० रूपये नमूद करावे. वरील २,००,००० कसे काढावे हा मोठा प्रश्न आहे. यासाठी व्हॅल्युएशनचे नियम पहावे.

अर्जुन- कृष्णा, जर जॉबवर्करने वस्तू प्रिन्सीपलला न पाठवता ग्राहकाला पाठवल्या तर काय होईल?

कृष्ण- अर्जुना, यामध्ये २ प्रकार आहेत.

 • जर जॉबवर्कर अनोंदणीकृत असेल व जॉबवर्कर वस्तू ग्राहकाला पाठवणार असेल तर प्रिन्सीपलला ई-वे बील बनवावे लागेल.
 • जर जॉबवर्कर नोंदणीकृत असेल व जॉबवर्कर वस्तू ग्राहकाला पाठवणार असेल तर जॉबवर्करने प्रिन्सीपलकडून बीलाची प्रत घेऊन ई-वे बील बनवावे.

अर्जुन- कृष्णा, शासन वस्तू जॉबवर्करला पाठवल्या व त्या परत आल्या हे कसे तपासेल?

कृष्ण- अर्जुना, जॉबवर्कवर वस्तू पाठवणाऱ्याला त्रैमासिक आयटीसी ०४ हा फॉर्म रिटर्नमध्ये दाखल करावा लागेल. यामध्ये डिलिव्हरी चलननुसार जॉबवर्कसाठी वस्तू पाठवल्याची व परत आल्याची माहिती द्यावी लागते.
उदा.- अ प्रिन्सीपलने १०० टिव्ही जॉबवर्कसाठी पाठवले आणि ८० परत आले. तसेच १५ टिव्ही दुसऱ्या जॉबवर्करला दिले आणि ५ टिव्ही डायरेक्ट ग्राहकाला पाठवले तर आयटीसी ०४ या फॉर्ममध्ये जॉबवर्करकडून माल कोणाकडे गेला याची माहिती द्यावी लागेल व त्याची पाठवलेल्या वस्तुंच्या गोळाबेरजेबरोबर जुळवणी करावी लागेल.

अर्जुन- कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?

कृष्ण-अर्जुना, अनेक व्यापारी जॉब वर्करकडून वस्तू बनवून घेतात. शासन आता यापुढे जॉबवर्क रिटर्न व ई-वे बिलाच्या आधारे जॉबवर्कसाठी पाठवलेल्या मालाची जुळवणी करेल. तसेच ई-वे बील बनविले नाही तर वस्तू जप्त होऊ शकतात व दंडही लागू शकतो. म्हणून प्रत्येकाने या तरतुदी समजावून घेऊन त्याचे पालन करावे.

(चित्र सौजन्य- https://bit.ly/2sw608N )

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!