म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

Reading Time: 3 minutes

“म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?” ह्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर म्हणजे “नाही!!” मात्र तरीही गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्याच शंका उपस्थित राहत असतात. आज आपण ह्या विषयावर अधिक माहिती घेऊ. 

म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स

सेबीने भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रातील कंपन्यांची संरचना अतिशय सुंदर बनविली आहे. भारतात सध्या एकंदर ४४ म्युच्युअल फंड आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंडाचा एक प्रायोजक असतो. मांडणी मध्ये दोन भाग असतात. 

१.म्युच्युअल फंड ही एक विश्वस्त संस्था(Public Trust) आहे. आणि ह्या विश्वस्त संस्थेमध्ये जमा झालेल्या फंडाचे योग्य नियोजन करण्याकरिता, 

.“निधी व्यवस्थापन कंपनी” (Asset Management Company) असते. विश्वस्थ संस्था ही पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेली असते व निधी व्यवस्थापन कंपनी ही कंपनी ऍक्ट खाली नोंदणी झालेली असते. 

म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

 • विश्वस्थ संस्थेचे संचालक मंडळ आणि निधी व्यवस्थापन कंपनीचे संचालक मंडळ हे निरनिराळे असतात. 
 • म्युच्युअल फंडाचे कामकाज सदैव गुंतवणूकदारांचे हित जपणारे असावे, याकरिता सेबीने दोन्ही संचालक मंडळांना मार्गदर्शक नियमावली बनवलेली आहे. 
 • म्युच्युअल फंडाचे कामकाज या नियमावलीप्रमाणे व्हावे याकरिता सेबीने त्यांना जबाबदार धरलेले आहे. 
 • विश्वस्थ संस्थेचे संचालक मंडळ हे दर दोन महिन्यांनी म्युच्युअल फंड कामकाजाचा आढावा घेत असतात. त्याचप्रमाणे निधी व्यवस्थापक कंपनीचे संचालक मंडळ हे किमान दर तीन महिन्यांनी कंपनी कामकाजाचा आढावा घेत असतात. 
 • गुंतवणूकदारांचे हीत जपण्याकरिता सेबीने अतिशय कडक नियमावली बनवली आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला कोणतेही चुकीचे आमिष दाखवले जाऊ नये, तसेच निधी व्यवस्थापकाकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, याला जास्त प्राधान्य दिलेले असते.
 • गुंतवणूकदारांनी जर म्युच्युअल फंडाची ही संरचना नीट जाणून घेतली तर, म्युच्युअल फंड वरील त्यांचा विश्वास नक्कीच द्विगुणित होईल.
 • काही वेळा आपण असे ऐकतो की अमुक म्युच्युअल फंड बंद होणार आहे. मग अशावेळी त्या म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार घाबरून जातात. आपण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की वर माहिती दिल्याप्रमाणे, म्युच्युअल फंड ही एक विश्वस्थ संस्था आहे व त्याचे कामकाज हे निधी व्यवस्थापक कंपनी पाहत असते. काही कारणास्तव या कंपनीला जर त्याचे कामकाज पाहणे शक्य होत नसेल, तर ते आपला म्युच्युअल फंड बाजारातील दुसऱ्या सक्षम निधी व्यवस्थापक कंपनीला हस्तांतरित करू शकतात. 

हीच ती वेळ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची

हस्तांतरण प्रक्रियेमध्ये दोन शक्यता असू शकतात. 

१.योजनांचे विलीनीकरण- 

 • बाजारातील एखादी अस्तित्वात असलेली निधी व्यवस्थापक कंपनी, ह्या म्युच्युअल फंडाला आपल्या म्युच्युअल फंडामध्ये समाविष्ट करू शकते. म्हणजेच समान उद्दिष्ट असलेल्या योजना विलीन करू शकतात. 
 • गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीच्या निव्वळ मालमत्तेवर, विलीन झालेल्या म्युच्युअल फंड योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर आधारित नवीन योजनेचे युनिट्स मिळतात. 
 • त्यांची गुंतवणूक नवीन योजनेमध्ये तशीच पुढे चालू राहते. म्हणजेच गुंतवणूकदारांचे कोणतेही नुकसान होत नाही.

२. नवीन प्रायोजक-

 • बाजारामध्ये एखादा नवीन प्रायोजक, म्युच्युअल फंड चालू करण्याच्या प्रयत्नात असेल, तर तो ह्या म्युच्युअल फंडाचे कामकाज आपल्या निधी व्यवस्थापक कंपनीकडे घेऊ शकतो. 
 • या प्रक्रियेमध्ये गुंतवणूकदारांच्या योजनेचे युनिट्स कायम राहतात मात्र योजनेच्या नावात फक्त बदल होतो.

म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती

वर उल्लेखिलेल्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये गुंतवणूकदारांचे हीत काळजीपूर्वक जपले जाते. सेबीने आखून दिलेली नियमावली नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. गुंतवणूकदारांनी आपण गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड बाबत जर बंद होण्याची बातमी आली तर गोंधळून न जाता, सेबीच्या नियमावली प्रमाणे आपले मालमत्ता नुकसान होणार नाही याची खात्री बाळगावी.

 • प्रत्येक म्युच्युअल फंड घराण्याची निधी व्यवस्थापन पद्धती निरनिराळी असते. सरकारी म्युच्युअल फंडची कामकाज पद्धत ही खाजगी किंवा विदेशी म्युच्युअल फंड घराण्याचा कामकाजापेक्षा वेगळी असते. 
 • आपण गुंतवणूक केलेला म्युच्युअल फंड दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये विलीन होणार असेल, तर आपण आपल्या आर्थिक सल्लागाराकडे नवीन म्युच्युअल फंडाच्या कामकाज पद्धतीविषयी चौकशी करावी. 
 • आपले आर्थिक सल्लागार हे नेहमी सर्व म्युच्युअल फंड व्यवस्थापकांशी संपर्कात असल्याने, नवीन म्युच्युअल फंड घराणे आपल्या गुंतवणूक तत्वांना पोषक आहे किंवा नाही ह्याचे खात्रीने मार्गदर्शन करू शकतात. 
 • काहीवेळा आपण असेही ऐकतो की एखाद्या म्युच्युअल फंडाचा मुख्य निधी व्यवस्थापक ( चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर) सोडून गेला, अशावेळी ही गुंतवणूकदारांना ताबडतोब गोंधळून / घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. 
 • प्रत्येक म्युच्युअल फंडाची निधी व्यवस्थापनाची विशिष्ट मार्गदर्शक तत्वे आखलेली असतात. नवीन येणाऱ्या निधी व्यवस्थापकाला त्या विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या चौकटीतच काम करावे लागते, त्यामुळे एखादा नावाजलेला तारांकित निधी व्यवस्थापक म्युच्युअल फंड सोडून जरी गेला तरी गुंतवणूकदारानी गोंधळून न जाता आपल्या आर्थिक सल्लागाराच्या संपर्कात राहावे.
 • साधारण एक किंवा दोन तिमाही कामगिरीवरून आपण आपली गुंतवणूक पुढे त्याच फंडात चालू ठेवावी की दुसऱ्या फंडात वळती करावी याबद्दल आपले आर्थिक सल्लागार आपल्याला मार्गदर्शन करू शकतात.

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे

भारतातील सेबीद्वारे अतिशय चांगले नियमन केलेले म्युच्युअल फंड क्षेत्र ज्यात इतर कोणत्याही गुंतवणूक पर्यायांपेक्षा सर्वात जास्त पारदर्शिता आहे, त्यावर विश्वास ठेवून, डेट /इक्विटी / हायब्रीड या सर्व कॅटेगरी मध्ये गुंतवणुकीचे योग्य संयोजन करून आपली आर्थिक उन्नती करा.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखिमेचा अधीन असते, योजने संबंधित सर्व कागदपत्र काळजीपूर्वक वाचा.

धन्यवाद

निलेश तावडे,

९३२४५४३८३२

nilesh0630@gmail.com

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते, सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *