सध्या अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा फिरत असलेले संदेश म्हणजे –
- कोणता डाएट प्लॅन योग्य? खाद्यपदार्थात ग्लूटेन (पदार्थातील पिष्टमय पदार्थ काढून घेतल्यावर उरणारा चिकट द्रव) नसणे चांगले की वाईट?
- भात खाणे अयोग्य आहे का? मी कोणते मीठ खाऊ?
- ब्राऊन शुगर, ब्रेड, ओट बिस्किटे खाणे चांगले की वाईट?
- साखरेऐवजी गूळ खाणे किंवा मध वापरणे चांगले?
- बिट, पालक यात भरपूर लोह असते का? पोषणमुल्यांबाबत काय विचार करावा?
- भाज्यांमध्ये असलेली कीटकनाशके, प्लास्टिक राईस संदर्भात लोकप्रिय झालेले व्हिडीओ यामुळे आपण चलबिचल होतोय का?
यासारख्या लोकांनां पडणाऱ्या सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊन नवीन वर्षाची सुरुवात पोषणमूल्य व अन्नसुरक्षेविषयीचे गैरसमज दूर करून करावी, या हेतूने FSSAI अंधेरी मुंबई यांच्यावतीने ६ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० ते १२ या वेळात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ग्राहकोपयोगी मालाच्या किमतीचे गौडबंगाल
मुंबई ग्राहक पंचायतीच्यावतीने माझ्यासह शिक्षण विभागातील २५ च्या आसपास कार्यकर्ते व फूड टेक्नॉलॉजी, डाएटिंगचे शिक्षण घेणारे ७५ च्या आसपास महाविद्यालयीन विद्यार्थी अशा १०० अधिक लोकांनी नोंदणी करून, सदर कार्यशाळेत भाग घेतला. खरेदी करताना आपण चिकीत्सा करतो त्यासोबत येणाऱ्या कर्तव्याचे काय? तेव्हा आपल्याला पडलेल्या शंकांचे समाधान करून घ्यावे.
- भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण ही कायद्याने स्थापन करण्यात आलेली स्वतंत्र संस्था असून, तिची स्थापना खाद्य सुरक्षा व मानके कायदा सन २००६ नुसार करण्यात आली आहे. यानुसार खाद्यपदार्थांचा दर्जा ठरवण्याची तरतूद असून, त्याचे उत्पादन, विक्री व वितरण करणाऱ्यांना परवानगी घेणे/ नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे कोणतेही नवीन पॅकबंद खाद्यान्न विक्रीसाठी प्राधिकरणाची मान्यता घेणे आवश्यक असून, त्यांचा वेष्टणावर त्यातील त्यातील घटक पदार्थांच्या पोषणमुल्यांचा तक्ता, परवाना क्रमांक, वजन, पदार्थ शाकाहारी की मांसाहारी, एकावेळी किती पदार्थ सेवन करावा, किती दिवसात वापरावा, कोणत्या तापमानात ठेवावा, निर्मात्याचे नाव पत्ता फोन नंबर, उत्पादनाविषयी तक्रार करण्याचा नंबर इ अनेक गोष्टी काही अपवाद वगळून लिहायची आवश्यकता असते. याचा दर्जा, जाहिरातीतील दावा त्याची वैधता याबाबत ग्राहक तक्रार करू शकतात. प्राधिकरणाच्या किंवा त्यांनी मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेतून त्याची तपासणी करू शकतात.
- प्राधिकरणाने मान्य केलेल्या दर्जानुसार पदार्थ नसतील, तर परीक्षण करण्यास आलेला खर्च परत मिळण्याची तरतूद असून, असे पदार्थ सेवन करून झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्याचा ग्राहकास अधिकार आहे.
- खाद्यान्न जाहिरातीतील जाहीर केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी उत्पादकाची आहे. यासंबंधीची तक्रार आपण FDA, ASCI आणि FSSAI कडे करू शकता. ग्राहकांना मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा योग्य असून, त्यामुळे त्याचे काही नुकसान होऊ नये, हा यामागील हेतू आहे.
- या नवीन कायद्यामुळे यापूर्वी अस्तित्वात असलेले खाद्यपदार्थ विषयक सात कायदे रद्द झाले आहेत. ही सर्व माहीती देण्याचे कारण असे की खाद्यपदार्थ विषयक अनेक गैरसमज लोकांच्या मनात असून, समाजमाध्यमात येणाऱ्या आणि कोणताही संदेश त्याची सत्यासत्यता न पडताळता पुढे पाठवायच्या लोकांच्या सवयीमुळे त्यात भर पडत आहे. त्यामागे नक्की तथ्य काय, याची खात्री कोणी करत नाही. यामुळे गैरसमज अधिक वाढीस लागत असून, त्यामानाने त्यावरील आलेले खुलासे, त्यात सनसनाटी खुलासे कोणतीही जाहिरातमूल्य नसल्याने, लोकापर्यंत सहज पोहोचत नाहीत. तेव्हा ही जाणीव लोकांच्यामध्ये वाढावी त्यांनी योग्य माहिती करून मिळालेल्या माहितीची खात्री करून घ्यावी माहिती पुढे पाठवावी.
आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे
कार्यशाळेविषयी –
- ITCFSAN च्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ही कार्यशाळा झाली त्यात केंद्राच्या मुख्य संचालक, अन्न तंत्रज्ञानतज्ञ सुभप्रदा व आहारतज्ञ शेरील या दोन मान्यवर तज्ञांनी सादरीकरण किंवा शैक्षणिक कार्यक्रम अशा प्रकारे हा कार्यक्रम न करता थेट संवादातून लोकांशी छानपैकी गप्पा मारल्या.
- अन्नसुरक्षेविषयी ज्या बातम्या पसरवल्या जातात काय सत्य काय आणि तथ्य काय? यामागील शास्त्र काय आणि भावना प्रधानता किती? ते समजावून सांगितले. पदार्थाच्या लेबलवर काय असतं त्यापेक्षा समाजमाध्यमातील मुक्त विद्यापीठातून पसरवले जाणारे गैरसमज, यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.
- कोणत्याही अन्नपदार्थामुळे ग्राहकाचे नुकसान होत असेल, तर ग्राहक त्यापासून दूर जाईल तेव्हा ग्राहकाने तो पदार्थ पुन्हा पुन्हा खावा यातच उत्पादकाचे हित आहे याची जाणीव ठेवून मगच त्याबद्दल शंका घ्यावी.
ग्राहक पंचायत पेठ – सजग ग्राहक अभियान
कार्यशाळेतून समजलेल्या महत्वाच्या गोष्टी –
-
- अन्नसुरक्षेविषयी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली, तर त्यासंबंधी खरीखुरी व विश्वासार्ह माहिती आपल्याला fssai कडून त्यांच्या संकेतस्थळावर Myth Buster हा ऑप्शन निवडून मिळू शकते.
- त्याचप्रमाणे itcfsan यांना मेल पाठवून मिळवता येईल. तेव्हा असे मॅसेज पुढे न पाठवता त्यातील सत्य शोधून ते आपल्याला ज्याच्याकडून मॅसेज आला त्याला कळवावे, म्हणजे यासंबंधीचे गैरसमज वाढणार नाहीत.
- अन्नसुरक्षेविषयी आणि आरोग्यकारी सवयीची माहिती विविध वयोगटातील मुलांना व्हावी म्हणून त्यांच्यासाठी 3 टप्यात येलो बुक, घरगुती अन्नसुरक्षेविषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी पिंक बुक, कामाच्या ठिकाणांवरील, कँटीन, रेस्टॉरंट मधील अन्नसुरक्षेविषयीचे ऑरेंज बुक, तर फ्रिजिंग केलेला भाजीपाला, फळे यांच्या सुरक्षिततेची माहिती देणारे ग्रीन बुक प्रकाशित केले असून, त्यात वापर, साठवणूक, आरोग्यावरील परिणाम यांची माहिती देतात. तर डार्ट बुक हे कच्या मालाची निवड, त्याच्या दर्जाची तपासणी, पदार्थावरील प्रक्रिया, साठवण, हाताळणी विल्हेवाट यासंबंधीची माहिती देते. ही पुस्तके तज्ञाच्या मदतीने प्रकाशित केली असून ती कोणालाही मोफत डाउनलोड करून घेता येतील.
- बाजारात येणारी प्रत्येक गोष्ट तपासण्यास मर्यादा येतात. तसेच पदार्थ टिकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते, त्यातून रासायनिक अंश त्या पदार्थात राहातात ते मानवास अपायकारक नसावेत. ते नक्की किती प्रमाणात असावेत त्याची मर्यादा fssai आखून देते. ती जागतिक मान्य मर्यादेहून खूप कमी आहे.
- प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, करावे लागत असलेले काम, खाण्यापिण्याच्या सवयी, आवड निवड वेगवेगळ्या असतात तेव्हा त्याचे प्रमाणीकरण करता येणे केवळ अशक्य असून आहारतज्ञाच्या सल्याशिवाय स्वतःहून कोणताही डाएट प्लॅन ठरवू नये.
- सध्या दीक्षित डाएट आणि दिवेकर डाएट शिवाय, पालिओ, ग्लूटेन फ्री, मेडिटेरिअल, विगन, पास्को यासारखे शेकडो डाएट प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे नेमके काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत संभ्रम निर्माण होतो. एकादी गोष्ट वर्ज करणार असाल, तर त्याची भरपाई कशी करणार, ते तज्ञांच्या सल्याशिवाय परस्पर ठरवू नये. त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे कोणतेही कृत्रिम पूरक पदार्थ आहार तज्ज्ञांनी सुचवले असतील तरच घ्यावेत. हे छान प्रकारे समजून दिले.
- ग्लूटेन शरीरास आवश्यक असून आटा मैद्या मध्ये ते ६% ते ८% असते. यापेक्षा कमी टक्केवारी असलेला आटा मैदा दुय्यम दर्जाचा असतो. ज्या व्यक्तींना ग्लूटेन फ्रि आहाराची गरज आहे अशा व्यक्तीसाठी ग्लूटेन विरहित असे सांगून जे पदार्थ विकले जातात त्यात त्याची कमाल मात्रा किती असावी ते fssai ने ठरवून दिले आहे.
- प्रत्येक तेलाचा ज्वलांक वेगवेगळा असतो. त्यातील घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते. तेल वेगवेगळ्या प्रकारचे आलटून पालटुन खावे. घाणीचे तेल आणि प्रक्रिया केलेले तेल यातील घाणीचे तेल चांगले असले, तरी या तेलात आणि प्रक्रिया केलेल्या तेलात फारसा फरक नसतो.
- तेल पुन्हा पुन्हा तापवल्यास त्याचे गुणधर्म बदलतात. प्रक्रिया करून काढलेल्या तेलाचे शेल्फ लाईफ जास्त असते. यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतलेली असते. प्रक्रिया करण्यामुळे कमी झालेल्या खनिज, जीवनसत्त्वे वेगळी भरपाई केली असल्यास त्यावर F+ लिहलेले असते ते पाहून खरेदी करावे. कोणतेही खाद्य तेल सुटे विकण्यास बंदी असून याविषयी वैध वजन माप कार्यालयात तक्रार करता येईल.
- तेल, मीठ, साखरेचा वापर कमीत कमी करावा. अमुक एक तेल आरोग्यासाठी चांगले किंवा वाईट असे नाही. कोणत्याही वनस्पतीजन्य तेलात केलेट्रॉल नसते. आपल्याला जे तेल खाणे योग्य वाटत असेल किंवा आपल्या घरात जे वर्षानुवर्षे वापरले जाते तेच वापरावे. साखरेला गूळ, मध हा पर्याय होऊ शकत नाही. मिठाला पिवळे मीठ, सैंधव हे पर्याय नाहीत. साध्या ब्रेड पेक्षा ब्राऊन ब्रेड चांगला यात तथ्य नाही.
- केमिकल विरहित गूळ अस्तीत्वात नाही. गूळ बनवताना केमिकलचा वापर करावाच लागतो.
- नैसर्गिक पदार्थ तयार करण्याचे निकष वेगळे असून त्याची स्वतंत्र तपासणी करून, खात्री करून, त्याला मानांकन दिले जाते.
- वजन कमी अधिक करणे यासाठी योग्य आहार, व्यायाम व पुरेसा कालावधी या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असून, यातील कोणतीही एक गोष्ट वगळून हे शक्य आहे, या भ्रमात राहू नये. आपल्याला नक्की काय पाहिजे? आपण जाड व्हावे की बारीक? यापेक्षा सुदृढ कसे राहू, यावर लक्ष दिले पाहिजे. यासाठी कोणी काही झटपट उपाय सुचवल्यास, हे आपण सातत्याने करू शकू का? ते आपल्याला परवडेल का? याप्रमाणे घरातील सर्वाना ही पद्धत एकसारखी लागू होऊ शकेल का? याचाही विचार करावा.
- आपण परंपरागत असे पदार्थ ऋतुमानानुसार खातो यामागे शास्त्र असून असे पदार्थ जेव्हा मुबलक मिळतात तेव्हा भरपूर खावेत. सीझनमध्ये उपलब्ध फळे कच्ची खावी त्यांचे रस पिऊ नयेत. शक्यतो मधल्या वेळेत फळे दिवसा खावीत.
- जेवणात भाज्यांचे प्रमाण सर्वाधिक असायला हवे ५०% हून जास्त आणि त्यात पुरेश्या प्रोटिनचा आणि कार्बोहायड्रेटचा समावेश असावा.
- चिंगम खाल्यास ती ६ महिने शरीरात तशीच राहते हे खोटे असून, कोणतीही अनावश्यक न पचू शकणारी गोष्ट शरीरात ४८ तासाहून अधिक काळ शरीरात राहात नाही. रेड बुल मध्ये बैलाच्या शरीराचा अंश घातलेला असल्याने ती उत्साहवर्धक असते ही थाप आहे.
- सॉफ्ट ड्रिंकमध्ये पूर्वी जेव्हा कीटकनाशकांचे अंश मोठ्या प्रमाणात सापडले होते त्याला जवळपास 20 वर्षे झाली असून तेव्हा बाटलीबंद पाण्यात इतर पदार्थांचे प्रमाण किती असावे तेही त्याचे मान्य प्रमाण किती ते ठरलेच नव्हते, आता ते ठरवण्यात आले असून, ते जागतिक मान्य मर्यादेहून कमी आहे.
- लहान मुलांमध्ये होत असलेली वजनवाढ त्यांना होत असलेले मधूमेह उच्यरक्तदाब यासारखे आजार चिंताजनक आहेत ते होऊ नयेत म्हणून मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यावर सक्ती करावी. मुले एखादा पोषक पदार्थ खाण्यास टाळाटाळ करत असतील, तर त्याला अन्य पर्यायी पदार्थ शोधावा. मुलांना चांगला वेळ द्या त्यांना कोणतेही बाहेरील पदार्थ बक्षीस देण्याचे आमिष दाखवू नका. आरोग्यदायी सवयी मुलांना लहानपणापासूनच लावाव्यात.
- सर्वच खाद्यपदार्थ निर्मिती, विक्री, साठा, वितरण करणाऱ्यानी परवाना मिळवणे /नोंदणी करणे आवश्यक असून ही प्रक्रिया सहज, सुलभ ऑनलाईन उपलब्ध आहे. यासाठी येणारा खर्च त्याचे वेळात केलेले नूतनीकरण अत्यल्प दरात होते.
- दर दोन तासांनी काहीतरी खावे, परंतु ते काय खाणार हे महत्वाचे आहे. या काळात ताक लिंबूपाणी घ्यावे.
- आपल्या दिवसाची सुरुवात कोणत्यातरी हालचाल होऊ शकणाऱ्या कार्यांनी करावी. स्वतःसाठी वेळ द्यावा.
- शास्त्र सतत बदलत असते, त्यामुळे अधिक अद्ययावत शास्त्रशुद्ध माहिती नेहमीच विचारात घ्यावी. आपल्याला माहिती झालेल्या प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्यावी.
- पदार्थावरील लेबल तपासून पहा, फक्त खास असे कोणतेही पदार्थ नसून, हे एक मार्केटिंग टेक्निक आहे. त्यामुळे ते पदार्थ जास्त खाल्ले जातात हे अपायकारक असून, असे विशेष पदार्थ खाण्याऐवजी उपलब्ध पदार्थ मर्यादेत खावे. कोणतेही टिकाऊ व पॅकबंद पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत यामधून जास्त मीठ खाल्ले जाते. पदार्थ शिजवताना त्यात मीठ न टाकता शिजल्यावर त्यात ते टाकावे. कणिक मळताना, भात बनवताना त्यात मीठ टाकू नये.
- वेल क्वालिफाईड आहारतज्ञाचा सल्ला घ्यावा, त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, अनुभव किती ते माहिती करून घ्यावे.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात ही खाद्यपदार्थ आणि डाएट यांच्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहायला हवे या जाणिवेतून झाली.
– उदय पिंगळे
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/