मला जर पैसे मिळाले तर मी ते रिअल इस्टेटमध्येच लावते व माझा नेहमीच फायदाच झालाय आणि मी फक्त परिसर बघुनच पैसे गुंतवते.” इव्हाना ट्रंप.
इव्हाना मेरी ट्रंप या चेक-अमेरिकी महिला व्यावसायिक, माजी फॅशन मॉडेल, लेखिका, व दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्या डोनाल्ड ट्रंप यांच्या पहिल्या पत्नी होत्या.
“प्रत्येक जण दिवसाची सुरुवात घरापासूनच करतो” टी.एस.इलियट.
‘थॉमस स्टर्न्स इलियट’ हा ब्रिटीश निबंधलेखक, प्रकाशक, नाटककार, साहित्य व सामाजिक समीक्षक तसेच विसाव्या शतकातील महत्वाच्या कवींपैकी एक होता. त्याला आधुनिक कवितेतील त्याच्या उल्लेखनीय व प्रवर्तक योगदानासाठी १९४८ साली साहित्यातील ‘नोबेल पुरस्काराने’ गौरविण्यात आले होते.
मी माझ्या लेखाच्या सुरुवातीला दोन वेगळी अवतरणे का वापरली याबद्दल तुम्ही गोंधळून गेला असाल तर तुम्हाला सांगतो की हा विषयच दोन घटकांचं मिश्रण आहे, जे सकृतदर्शनी सारखेच वाटू शकतात मात्र त्या पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत.
- होय मी रिअल इस्टेट व घराविषयी बोलतोय, या दोन्ही संज्ञा एकमेकांशी संबंधित आहेत तरीही रिअल इस्टेट म्हणजे पैसे कमावणे (म्हणजेच व्यावसायिकांसाठी) व घर म्हणजे, इलियट यानं म्हटल्याप्रमाणे केवळ एक भौतिक गोष्ट नाही तर ती एक भावना आहे, जी सगळ्यांचीच महत्वाकांक्षा असते.
- त्याचवेळी इव्हाना ट्रंप यांच्यासाठी (ट्रंप या नावातच सगळं काही आलं) घर म्हणजेच रिअल इस्टेट व भरपूर पैसे कमावण्यासाठीचे साधन! त्यांच्यासाठी त्याचा अर्थ परिसर असाही होतो, जो रिअल इस्टेटचा एक घटक आहे. विनोद म्हणजे रिअल इस्टेट नावाच्या व्यवसायात जिथे भावनेला अजिबात थारा नाही ते बहुतेकांसाठी घर नावाची भावना साकार करण्याचं एक साधन आहे, किमान आपल्या देशात तरी असंच चित्रं आहे.
- लोकांना घरं बांधण्यासाठी रिअल इस्टेटची गरज असते, मात्र याबाबत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक (म्हणजे घराचा ग्राहक) या दोन्ही पक्षांचा घराच्या बाबतीत पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन असल्यामुळे, रिअल इस्टेटची प्रतिमा फारशी चांगली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याशिवाय रेरा, जीएसटी, निःश्चलनीकरणानंतर रिअल इस्टेट ढवळून निघालंय व परिणामी रिअल इस्टेटमधील बरीच मोठी नावं कर्जाच्या डोंगराखाली दबली गेली आहेत.
- सार्वजनिकपणे काही नावांविषयीच चर्चा होत असली तरीही खाजगीत इतर अनेक नावांविषयी बोललं जातंय. परिणामी रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकदार गोंधळून गेलेत.
- लहान ठेवीदारांचीही अशीच परिस्थिती आहे ज्यांना याचा सर्वाधिक चटका बसलाय कारण त्यांचे दैनंदिन जीवन बांधकाम व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या चढ्या व्याजावर अवलंबून असतं. अगदी बँकाही रिअल इस्टेट क्षेत्राला बिगर प्राधान्य क्षेत्रात टाकताहेत.
- त्याचवेळी ज्या लोकांनी त्यांची घरे (म्हणजेच सदनिका) बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये आरक्षित केली होती ते सगळ्यात अडचणीत आले आहेत. हे प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबवणीवर टाकण्यात आले आहेत, या लोकांना ईएमआयही भरावा लागतो व भाडंही. तसंच त्यांच्या कष्टाच्या पैशातून घेतलेल्या घराचा ताबा त्यांना कधी मिळेल याचीही त्यांना खात्री नाही.
- त्यानंतर मुख्य समस्या म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्राची वस्तुस्थिती जाणून घेणे. कारण माध्यमं एकतर एकतर्फी बातम्या छापतात किंवा सामान्य माणसाला जे वाचायला आवडतं ते छापतात, उदाहरणार्थ निःश्चलनीकरण, रेरा व जीएसटी या सगळ्या गोष्टींमुळे घरे आणखी स्वस्त होतील. तर आता सामान्य माणूस प्रश्न विचारतोय की, स्वस्त घरे कुठे आहेत?
- त्याचवेळी बांधकाम व्यावसायिक रिअल इस्टेटच्या मंदीसाठी व प्रकल्प पूर्ण करण्यास होणाऱ्या उशीरासाठी वरील तीन घटकांना जबाबदार मानताहेत! याचवेळी नागरी विकास खातंही दरदिवशी काहीतरी नवीन धोरण जाहीर करून रिअल इस्टेटवर (जर आपण त्याला उद्योग म्हणत असू) बाँबगोळे डागत असतं, ज्यामुळे गोंधळात भरच पडते.
- बाजारातील बांधकाम व्यावसायिकांची आर्थिक स्थिती याबाबतीत अनेकांचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक मोठे बांधकाम व्यावसायिक, कर्ज किंवा आर्थिक ओझ्याखाली दबलेले आहेत व त्यांचे ठेवीदार तसंच त्यांच्या प्रकल्पांमध्ये सदनिका आरक्षित करणारे ग्राहक घाबरून गेलेत, तर वस्तुस्थिती काय आहे? नव्याने सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकाने बांधकाम व्यावसायिकाकडे ती आरक्षित करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत? हे केवळ प्रश्न असले तरी यात संपूर्ण रिअल इस्टेट सामावलेले आहे.
- त्यासाठी आपण मागे जाऊन रिअल इस्टेटच्या आर्थिक यंत्रणेचा विचार केला पाहिजे. इथे मला एक सांगावसं वाटतं की रिअल इस्टेटच्या बाबतीत बोलायचं तर मी काही वित्त किंवा विपणन क्षेत्रातील तज्ञ नाही. मात्र मी या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे. मी सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणे मी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माझा बांधकामातील अनुभव वापरणार आहे.
(क्रमश:)
– संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2r7LOsF )