आयकर रिफंडचे संशयास्पद इमेल्स आणि करदात्यांची फसवणुक

Reading Time: 2 minutes

नुकतेच IT रिटर्न्स भरून झाले आहेत…

तुम्ही निश्चिन्त मनाने ऑफिसमध्ये आला आहात…

तुम्ही ईमेल उघडता… आणि पहिलाच मेल असतो… “donotreply@incometaxindiafilling.gov.in” किंवा “donotreply@incometaxindiaefiling.gov.in” वरून. incometax आणि gov.in बघून आपले धाबे दणाणतात…(येथे वाचकांच्या लक्षात आलेच असेल कि ‘efiling’ शब्दातून “e” हे अक्षर गाळलं आहे आणि ‘filing’  हा शब्द ‘filling’ असा लिहून हि फसवी इमेल आयडी बनविण्यात आली आहे.)

घाई गडबडीत आपण इमेल उघडून पाहतो… तुमच्या रिटर्न्स फायलिंग मध्ये काही घोळ झाला आहे आणि लवकरात लवकर तुमचे नेटबँकिंग डिटेल्स द्या जेणेकरून  “रिफंड अमाऊंट” तुमच्या खात्यात जमा करता येईल…” 

आनंदाच्या भरात आणि ई-मेल आय डी अगदी सरकारी वाटून आपण आपले डिटेल्स देऊन मोकळे होतो आणि मग लक्षात येते कि, आपण फसवले गेलो आहोत…!! 

नावात किंवा संबंधित मूळ इमेल आयडी च्या स्पेलिंग मध्ये अगदी लक्षात न येण्याइतका एखाद्या अक्षराचा काहीतरी फरक करायचा व हे असे इमेल पाठवून सर्वसामान्य करदात्याला लुबाडायचे असे प्रकार हल्ली सर्रास सुरु आहेत. 

  • वारंवार घडणारे हे असे प्रकार लक्षात आल्यावर सरकारने व अर्थखात्याने त्यासंबंधात आपापल्या माध्यमांवर सूचना जाहीर केली आहे. अश्या कोणत्याही गैरव्यवहारापासून स्वतःला वाचवण्यासाठी नागरिकांनी काय करावे यासंबंधी माहिती जाहीर केली आहे. 

  • तसेच अश्या प्रकारे खात्याविषयी माहिती मागवणाऱ्या कोणत्याही इमेल वा तत्सम संदेशावर विश्वास ठेऊ नये असेही आवाहन केले आहे. 

  • विशेषतः ‘रिफंड अमाऊंट’ असे नमूद केलेल्या कोणत्याही इमेलवर क्लिक केल्यास तिथे आपल्या बँक खात्याविषयीची माहिती भरल्यास आपले खाते हॅक होऊ शकते, असा इशाराही दिला आहे.

  • त्याचसोबत संबंधित माहितीगारांनी असेही नमूद केले आहे कि जर खरेच आपल्या इन्कम टॅक्स संबंधित काही जमा/खर्चाची बाब असेल तर त्या संबंधी आयकर विभागाकडून आपल्याला यथायोग्य “कर सूचना” पाठवली जाईल. 

  • जाणकारांनी असेही नमूद केले आहे कि जेंव्हा आपला टॅक्स रिटर्न भरला जातो तेंव्हा आपण आयकर खात्याला आपले अकाऊंट नंबर, IFSC कोड आणि संबंधित इतर माहितीही पुरवत असतात. 

  • तेंव्हा जरी असे काही टॅक्स रिटर्न परताव्याचे प्रसंग उद्भवले तरी अर्थखाते ते आपल्या बँक अकाऊंट मध्ये NEFT द्वारे पैसे चुकते करते. कोणत्याही प्रसंगात कोणत्याही करदात्याला असे एखाद्या इमेलच्या माध्यमातून अथवा मोबाईलवर संपर्क साधून अकाऊंट चा तपशील विचारला जात नाही. 

तरी, अश्या प्रकारच्या गैरव्यवहारातून आपले नुकसान टाळण्यासाठी खालील उपाय करता येईल :

१. बँक अकाऊंट ची माहिती विचारणाऱ्या कोणत्याही इमेल,फोन वा अन्य कोणत्याही संदेशावर चटकन विश्वास न ठेवणे. 

२. अश्या इमेलमधील कोणत्याही लिंक वर क्लिक न करणे. 

३. कोणत्याही संभ्रमाच्या प्रसंगी आपल्या चार्टर्ड अकौंटंन्टस किंवा अन्य जाणकारांशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतेही आर्थिक  निर्णय न घेणे. आयकर खात्याने या प्रत्येक समस्येसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केलेली आहे. हे हेल्पलाईन नंबर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

४. असे संशयित इमेल्स किंवा फोन्स वारंवार येत असल्यास आयकर खात्याकडे त्यासंदर्भात तक्रार करणे. त्यासंबंधीची सर्व माहिती आयकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. किंवा आपण आपल्या जवळच्या  इन्कम टॅक्सच्या कार्यालयात संपर्क साधू शकतो.

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, : “उपचारांपेक्षा काळजी बरी…! “. या म्हणीतून बोध घेत आपल्यासारख्या करदात्यांनी जखमेवर मलमपट्टी करताना होणारे त्रास सहन करण्यापेक्षा जखमच होऊ न देण्याचा विचार आधी करणे जास्त श्रेयस्कर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.