आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutes

आर्थिक नियोजन

विश्वासरावांना पेशवाईत उत्तराधिकारी म्हणून नेमले जावे अथवा गादी मिळावी म्हणून गोपिकाबाईंचा अनाठायी हट्ट म्हणजे तीन वर्षानंतर येणाऱ्या वित्तीय ध्येयपूर्तीसाठी स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यासारखे आहे. सल्लागाराची फी दयावी लागू नये किंवा वितरकाला आपल्या मुद्दलातून कमिशन जावू नये म्हणून ऑनलाईन गुंतवणूक करून भांडवली नफा मिळविण्याचे स्वप्न पाहणारे नजीब उद्दौलासारखे वारंवार आश्रय बदलत असतात. 

कर चुकवेगिरी करता यावी म्हणून मराठयांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी परकीय आक्रमकांना कुर्निसात करणारे राजे व संस्थानिक म्हणजे मोठया परताव्याच्या हव्यासापोटी पोन्झी स्कीम्समधे खिसे पोळून घेणारे दीनश्रीमंत आपल्या आजूबाजूस नेहमीच वावरत असतात.

आर्थिक नियोजन आणि पानिपतचा (अर्थ)बोध……

  • पानिपतचा लढा मराठयांच्या शौर्याने व पराक्रमाने इतिहासात अजरामर असला, तरी तो एक शोकांतिका म्हणून मनात कायमच सलत राहतो. तीच अवस्था आर्थिक शिस्तीचा गुंतवणूकदार जेव्हा वित्तीय ध्येय विसरून परताव्याच्या वाटेने जातो, तेव्हा त्याच्या अर्थनिरक्षरतेची किव येते. 
  • तुमचा सल्लागार म्हणजे पानिपतच्या कथेतील सदाशिवभाऊ. कारण कथानकात सदाशिवभाऊ नसते, तर कदाचित पानिपत घडलेच नसते. उदगीरच्या विजयी मोहिमेनंतर लढवय्या सदाशिवभाऊंची नेमणूक अर्थमंत्री म्हणून गोपिकाबाईंच्या आग्रहाखातर केली जाते. हे म्हणजे गुंतवणूक सल्लागाराने ज्ञान असून देखील पतसंस्थेच्या दैनंदिन आवर्ती ठेव योजनेचे पैसे गोळा करण्याचे काम करणे.
  • अर्थमंत्री म्हणून काम करतांना देखील सदाशिवभाऊंची राज्याच्या कारभाराप्रती असलेली निष्ठा तसूभरदेखील कमी होत नाही. दिल्लीचा बादशाह करचुकवेगिरी करत आहे हे ध्यानात आल्यावर त्याला जाब विचारण्याची हिम्मत ठेवणारे सदाशिवभाऊ म्हणजे जास्त कमिशन मिळणार आहे म्हणून चुकीच्या योजना न विकणारे नैतिक गुंतवणूक सल्लागार वाटतात. 
  • पानिपतच्या कथानकात राजकारणापेक्षा सत्ताकारण जपण्याचा अधिक प्रयत्न केला आहे. गुंतवणूकीचा विचार केला तर बऱ्याचदा मुद्दल(सत्ता) गेली तरी चालेल पण अधिकचा परतावा (राजकारण) मिळाला पाहिजे असे धोरण असते.
  • सोबत पुरेशी कुमक व रसद नसतांना सदाशिवभाऊंचा पुणे ते यमुना नदीच्या काठा-काठाने होणारा प्रवास म्हणजे, सेवा व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळत नसताना देखील ग्राहक हिताला प्राधान्य देणे यासारखे समर्पण नाही. 
  • उत्तरेकडील राजांना सोबत घेऊन सेना वाढवितांना सदाशिवभाऊंना आलेले शह-काटशहांचे अनुभव म्हणजे सल्लागाराने ग्राहकासाठी अचूक योजना निवडणे परंतु योजना व्यवस्थापकाचा अभ्यास कमी पडणे किंवा गुंतवणूक केलेल्या कंपनीला बाजाराच्या मंदीचा फटका बसणे. परिणामी ग्राहकाला भांडवली नफा कमी होणे किंवा अल्पावधीसाठी नुकसान सोसावे लागणे.
  • योद्धयाशी नुकतेच लग्न झालेल्या नववधूचे आपला पती युद्धावर जाणार या बातमीने मन कासावीस होणे नैसर्गिक आहे. पार्वतीबाईंचा लाडीवाळ हट्ट पुरविण्यासाठी कुटूंब कबिला युद्धावर घेऊन जाणे, ही सदाशिवभाऊंची पहिली चूक असावी, असे राहून राहून वाटते. याचा संबंध फावला वेळ आहे किंवा खूप ओळखी आहेत म्हणून आर्थिक सेवा व्यवसाय सुरु करण्यासारखे आहे.  याच्याशी मिळता जुळता आहे. 
  • पुरेसे युद्ध कौशल्य अंगी नसतांना देखील भावी राज्यकर्ता म्हणून विश्वासरावांनी युद्धावर जाणे आणि त्यांची जबाबदारी सदाशिवभाऊंवर देणे. म्हणजेच सल्लागाराने गुंतवणूकदाराचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी गुंतवणूकदाराने आधी स्वतःहून केलेल्या चुका निस्तारत बसणे. 
  • विश्वासरावांनी रणांगणावर काय करायचे आहे? याची स्पष्ट रूपरेषा सदाशिवभाऊंनी सांगून देखील त्यांनी रणांगणावर उतरून अडचण वाढवून ठेवणे. म्हणजेच गुंतवणूकदाराने संयम सोडून चुकीचा निर्णय घेऊन सल्लागाराचा गरजेच्या वेळी हात सोडण्यासारखे आहे.
  • अफगाणिस्तानातून मदतीसाठी नजीब उद्दौलाने बोलावून घेतलेला अहमदशाह अब्दाली स्वार्थासाठीच आला होता. पोन्झी स्कीम्स विकणारे व झटपट श्रीमंतीचा मार्ग दाखविणारे स्वार्थी अब्दाली चौका चौकात तुम्हाला गाठत असतात. खरंतर अब्दालीला चकवत सदाशिवभाऊंनी दिल्ली काबीज केली होती. पण ज्यांच्या भरवशावर अब्दालीचे वर्चस्व मोडीत काढण्याचा विडा सदाशिवभाऊंनी उचलला होता त्यातील काही राजांनी दगाफटका केल्यामुळे रणांगणात ते एकाकी पडले. 
  • विश्वासराव रणांगणात धारातीर्थी पडल्यावर सदाशिवभाऊ बेभान होऊन एकटेच लढले पण पराजीत झाले. कारण त्यांचा गनीम मातब्बर ठरला होता. युद्धाची रणनीती आखण्यात सदाशिवभाऊ निपुण होते, हे तर अब्दालीनेसुद्धा मान्य केले होते. अशीच लढाई तुमचा सल्लागार तुमच्या हितासाठी लढत असतो. मग चुकते कोण?
  • तुमचा सल्लागार म्हणजे पानिपतच्या कथेतील सदाशिवभाऊंप्रमाणे का असावा? कारण सातारच्या छत्रपती शाहू महारांजाच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवभाऊंनी राजकारण, प्रशासन यांची धुळाक्षर गिरवली. 
  • आधुनिक युद्धशास्त्राचे महत्व ओळखून त्यांनी तोफखान्याचे कौशल्य आत्मसात केलेल्या शत्रूपक्षातील इब्राहीम खान गार्दीला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. हा त्यांचा निर्णय अंगलट येऊ शकेल, असे इतर सरदारांचे म्हणणे होते. पण सदाशिवभाऊ ठाम होते. त्याचे उत्तर कथानकात मिळालेच आहे. 
  • त्यांच्याप्रमाणेच तुमचा सल्लागार देखील नवनवीन गुंतवणूक साधनं, कर नियमन, नियंत्रकांचे कायद्यातील बदल याबद्दल धुळाक्षर गिरवत असतो. इब्राहीम खान गार्दी सारख्या नियंत्रित जोखीम घेण्यासाठी तुम्हाला धीर देत असतो. कारण अशा जोखमीतून दिर्घावधीत खात्रीशीर परतावा मिळण्याची शाश्वती त्याला दिसत असते.
  • आर्थिक नियोजन करताना रोजच युद्धाचा प्रसंग असतो. मग तो उदयोजक असो किंवा नोकरदार, विदयार्थी असो किंवा गृहिणी. आर्थिक नियोजन करताना गरज व आवश्यकता यातला फरक समजला पाहिजे. 

आर्थिक नियोजनात महत्वाचे घटक कुठले? याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. त्यातला पहिला घटक आज लक्षात आलाच असेल. आर्थिक नियोजनाचे महत्व आहे किंवा नाही? यासाठी पुढच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःलाच विचारा.

तुम्हाला भूक जास्त लागते की पैसा?

-अतुल प्रकाश कोतकर

9423187598

[email protected]

(अस्विकृती – सदर लेखात संदर्भासाठी घेतलेले कथानक व उल्लेख केलेले पात्र हा गुंतवणूकदार जागृती कार्याचा भाग आहे. यात कुणाच्याही भावना दुखावणे अथवा टीका करणे हा उद्देश नाही.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…