Kakeibo: आर्थिक नियोजनासाठी पारंपरिक जपानी पद्धत ‘काकेइबो’!

Reading Time: 3 minutes

काकेइबो (Kakeibo)

आपल्यापैकी कितीजण नियमितपणे गृहखर्च लिहितात? किंवा असा खर्च रोज लिहिणारे आपले कोणी मित्र, नातेवाईक आहेत का? आपल्या पारंपरिक जमाखर्च वहीच्या जवळपास जाणारी काकेइबो (Kakeibo) ही जपानी पद्धत असून त्याचा अर्थ घरगुती वित्तखातेवही असा करता येईल. जगभरात या पद्धतीचा बोलबाला झाला असून यावरील अनेक पुस्तके, मोबाईल अँप, व्हिडीओ उपलब्ध आहेत. 

पूर्वी एका साध्या वहीत अगर कोणीतरी भेट दिलेल्या डायरीमध्ये तारखेनुसार हा खर्च तपशिलासह लिहिला जात असे. हेतू हा की, काही रकमेची सक्तीने बचत व्हावी, आपला पैसा कसा खर्च होतो ते समजावे,  त्यातून अनावश्यक खर्च शोधाता यावा. काही चुका झाल्या असतील तर त्या पासून बोध घेऊन त्याच चुका पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेतली जावी. काही रकमेची गुंतवणूक केली जाऊन चार पैसे जोडले जावेत. अनेक जण या पद्धतीने मासिक जमाखर्च लिहीत असत.

 • असा हिशोब करण्यासाठी कोणत्याही खास तंत्राचा वापर केला जात नसे शिल्लक असलेल्या पैशात आलेले पैसे मिळवून ते वहीच्या डाव्या बाजूला तारखानुसार जमा दाखवले जात, तर त्यातून काय खर्च केला त्याचा तपशील उजवीकडे लिहून त्याची बेरीज केली जाई. 
 • जमा रकमेतून खर्च वजा करून शिल्लक पुढील तारखेस ओढून त्या दिवसाचा खर्च लिहिला जात असे. पैसे येण्याचे प्रमाण अगदी कमी प्रामुख्याने पगार अथवा वसूल उधारी असे, तर खर्च करताना अत्यावश्यक खर्च करायलाच पाहीजे ही भावना असून त्यानुसार नियोजन केले जात असे. 
 • तुरळक परिस्थिती वगळता सर्वच जणांच्या आर्थिक स्तरात फारसा फरक नसल्याने प्राथमिक गरजा, शिक्षण, चालीरीती यावरील खर्चाला आपोआपच प्राधान्य मिळत असे, प्रसंगी अपवादात्मक स्थितीत कर्जही घेतले जाई. मी स्वतः कित्येक वर्षे अशा प्रकारे मासिक खर्च लिहून त्याचा महिन्याच्या शेवटी त्याचा एक आढावा घेत असे.
 • आता अशी परिस्थिती नाही, विविध मार्गाने एका कुटूंबात पैसा येत असून तो खर्च करायचे मार्गही कुटुंबातील प्रत्येक घटकांच्या अपेक्षेनुसार बदलले आहेत. किंबहुना पैसे खर्च कसे करायचे? हा कोणापुढेच प्रश्न नाही मोबाईलच्या एका क्लीक सरशी हा प्रश्न सुटला असून अनेक जण आपल्याला नजीकच्या काळात मिळू शकणारे अंदाजित पैसे आधीच खर्च करून मोकळे होत आहेत. 
 • समजून उमजून खर्च न केल्यामुळे, एवढे पैसे मिळवून शिल्लक का राहत नाही?  हा अनेकांना पडणारा गहन प्रश्न आहे. यामुळे सगळ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले असून यातून पुरेशी रक्कम बाजूला राहावी या हेतूने आर्थिक नियोजनकारांच्या सल्ल्याने अनेकजण आता नवीन तंत्र वापरून आपण काय खर्च करतो तो लिहायला व त्याचा आढावा घ्यायला सांगत आहेत. जर आपण यावर नियंत्रण ठेवू शकलो नाही तर भविष्याचे नियोजन कधीही करू शकणार नाही. आपले कोणतेही दीर्घकालीन ध्येय यामुळे पूर्ण होणार नाही.
 • अशा प्रकारे खातेवही तयार केल्यास अनियंत्रित खर्चावर नियंत्रण राहून गुंतवणूक करता येईल आणि आपली आर्थिक ध्येये पूर्ण करता येतील. या पारंपरिक पद्धतीने अनिर्बंध खर्चास आळा बसतो, आपला खर्च आटोक्यात राहून भविष्यातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक केली जाते.

Kakeibo: ‘काकेइबो’ काय आहे? 

ही एक हिशोबाची पद्धत असून खर्चावर नियंत्रण ठेवून खर्च  करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या हेतूने सन १९०४ मध्ये पहिली जपानी महिला पत्रकार ‘हानी मोकातो’ यांनी गृहिणींसाठी शोधून काढली. ही एक सोपी सरळ पद्धत असून कोणताही खर्च करताना खर्च करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ४ प्रश्न  विचारावेत –

 1. किती पैसे उपलब्ध आहेत?
 2. किती पैसे वाचवता येतील?
 3. किती पैसे खर्च होतील? 
 4. कोणती सुधारणा करता येईल? 
 • या चार प्रश्नांना ‘काकेइबो प्रश्न’ असे म्हणतात. ही पद्धत तुम्हाला किती उत्पन्न मिळते, तुमच्या भविष्यातील गरजा कोणत्या हे विचारात घेऊन वर्तमानात जे काही विकत घ्यायचे त्याची यादी करून त्याचे गरजेच्या गोष्टी, इच्छा, चालीरीतींमुळे होणारा खर्च खर्च, आकस्मिक खर्च या ४ प्रकारात विभागणी करून त्याप्रमाणे नियोजन करायला सांगते. 
 • यामुळे अनावश्यक खर्च कमी होऊन दीर्घकालीन ध्येय लवकर पूर्ण होण्यास मदत होते. कोणताही खर्च करण्यापूर्वी अशा प्रकारे वर्गीकरण करून वरील ४ प्रश्न विचारल्यास खर्च योग्य रितीने केला जाऊन त्याचा आनंद घेता येतो. 
 • हे करत असताना वेळोवेळी खर्चाचा आढावा घ्यावा आणि तो आपण ठरवलेल्या उद्दिष्टांशी मिळताजुळता आहे हे पाहावे. जर एखाद्या महिन्यात नियोजन फसले, तर त्याची कारणे शोधावी. 
 • नियोजन करण्यास कुटुंबातील प्रत्येक सदस्यास सहभागी करावे. याप्रकारे निश्चित उद्दिष्ट धरून खर्च करत राहिल्यास पूर्वी ज्या गोष्टी आपणास कठीण वाटत होत्या त्या सोप्या कधी झाल्या ते समजणार देखील नाही आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेता येईल. आता या पद्धतीस तंत्रज्ञानाची जोड देता येऊ शकते. जगभरात अनेकांनी ही पद्धत वापरली असून उपयुक्त असल्याचा निर्वाळा दिला आहे.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search: Kakeibo Marathi Mahiti, Kakeibo in Marathi, Kakeibo Marathi 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!