वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ आणि एका इंग्रजी नियतकालिकाने नुकत्याच केलेल्या आरोग्यविषयक सर्वेक्षणाचे निष्कर्ष वाचल्यावर आपण आरोग्याचा काय खेळ मांडलाय?… असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे.
आर्थिक नियोजन आणि सल्लागाराची भूमिका -भाग १
आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते.
-
विम्यासाठी खर्च करणे हाच मुळात नावडता विषय. त्यात विविध कंपन्यांच्या विविध योजना आणि त्यांच्या अटी, नियम, छुपे पोटनियम वगैरे सतराशे साठ भानगडी.
-
प्रत्येकाचा कधी ना कधी विम्याचा दावा नाकारला गेलेला असतो. मग प्रथम विमा विक्रेता लक्ष्य केला जातो आणि नंतर विमा कंपनी.
-
खरंतर आरोग्य विमा घेतांना विमा नियंत्रकाने घालून दिलेले समान कायदे विमा खरेदी करून घेतांना जाणून घेणे आवश्यक आहे.
-
आरोग्य विमा ही एकमेव अशी योजना आहे ज्यात विमा वितरक कंपनी आपल्या ग्राहकावर संपूर्ण भरवसा ठेवून योजना देत असते.
-
न्यायालयात साक्ष देतांना जसे (मी गीतेवर हात ठेवून देवाशपथ खरे सांगतो की…) सांगणाऱ्याची साक्ष ग्राह्य धरली जाते, तसेच काहीसे विमा कंपन्या ग्राहकावर संपूर्ण विश्वास ठेवून विमा योजना देत असतात. परंतु याचाच गैरफायदा घेऊन अनेकवेळा विमा विक्रेते व ग्राहक माहिती लपविण्याचा भीम पराक्रम करतात. त्याचे परिणाम मग दावा नाकारण्यात किंवा विमा योजनेच्या लाभापासून कायमचे वंचित केले जाऊ शकते. म्हणजेच ग्राहकाला भविष्यात कुठलीही विमा कंपनी विमा योजना देऊ शकत नाही.
-
दावा आला नाही म्हणून योजना नुतनीकरण न करण्याचे प्रमाण योजना घेतल्यापासून दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी जास्त असते.
-
साथीच्या आजारांसाठी ३० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरीयड) असतो तर हाच कालावधी विशिष्ट आजार, तसेच शस्त्रक्रियांसाठी २४ महिन्यांचा असतो.
-
एकदा योजना खंडीत झाली की प्रतीक्षा कालावधी पाहिल्या दिवसापासून सुरु होतो. याची माहिती असूनदेखील विमाधारक धैर्यशीलपणे योजना खंडीत होऊ देण्याचा निर्णय घेतात.
-
जर तुमच्या शरीरात विमा योजना घेण्यापूर्वी एखादया दुर्धर आजाराने प्रवेश केला असेल, तर योजना मिळणे अशक्यप्राय गोष्ट असते.
-
व्हाट्स अपच्या माध्यमातून निरोगी आरोग्य राखण्यासाठी असंख्य मेसेजेस अग्रेषित केले जात असतात. त्यात कसे झोपावे इथपासून तर पाणी कसे प्यावे इथपर्यंत ज्ञानवर्धक उपदेश असतात. एखादा आरोग्य विमाविषयक मेसेज असला कि हमखास कानाडोळा केला जातो.
-
कदाचित जाहिरातींचा अतिभडीमार हे सुद्धा एक कारण असू शकते. परंतु आर्थिक नियोजनातील दुसऱ्या क्रमांकाचा टाळूच नये असा खर्च म्हणजे आरोग्य विम्याचा हप्ता.
आर्थिक नियोजन – भाग २
आरोग्याची बिकट वहि‘वाट’ –
-
एकीकडे प्रगत वैद्यकीय शास्त्रामुळे मानवाचे आयुर्मान १०० पर्यंत वाढू शकते. हेच वाढलेले आयुर्मान निरोगी असेल अशी शक्यता आपल्या आजूबाजूस पाहिल्यास नक्कीच वाटत नाही.
-
१००% शाकाहारी असलेल्या माझ्या बहिणीला यकृताच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर आपण कितीही मेसेजेस वाचले, व्हिडीओज बघितले तरी आजारांपासून आपली सुटका होणे दुरापास्त आहे, याची जाणीव झाली.
-
नित्यनेमाने देवपूजा करणाऱ्या माझ्या मित्राला वयाच्या ३२व्या वर्षी उजव्या पायात काढता न येऊ शकणारी गाठ होणे.
-
दररोज योगाभ्यास करणाऱ्या अजून एका चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मित्राला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होणे.
-
सततच्या तुलनात्मक तणावाखालील जीवनशैलीमुळे तिशीतल्या मैत्रिणीला मूल होण्यासाठी उपचार घेण्याची वेळ येणे. अशी उदाहरणे तुमच्यापण ऐकण्यात किंवा पाहण्यात नक्कीच असतील. मग तरी सुद्धा ही बेफिकिरी का?
-
चीनमधे अचानक आलेल्या “करोना” विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. करोनाच्या साथीने आजवर अधिकृत ३,००० लोकं मृत्युमुखी पडले आहेत. अनधिकृत मृतांचा आकडा लाखांत आहे, असे म्हणतात.
-
चीन सरकारने “करोना” विषाणूमुळे येणाऱ्या दाव्यांसाठी विमा कंपन्यांना ९ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे.
-
या विषाणूमुळे केवळ झाली असे नाही, तर संपूर्ण जगावर आर्थिक अरिष्टाचे संकट उभे ठाकले आहे. या विषाणूमुळे गेल्या आठवडयात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक मूल्य ११ लाख कोटींनी कमी झाले आहे.
-
आज ना उद्या या साथीच्या रोगाचे समूळ उच्चाटन होईल देखील, पण या आजारामुळे ज्या कुटुंबांची वित्तीय हानी झाली असेल ती भरून येण्यास कित्येक दिवस जावे लागतील.
आर्थिक नियोजन – भाग ३
आपण चीनचे उदाहरण बघितले. आता आपल्याच राज्यात काय चालले आहे? याची माहिती घेऊ.
-
गेल्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत राज्यभरात जन्मतः हृदयविकाराचा त्रास असलेली ३,४९४ बालके आढळून आली. त्यापैकी २,६१४ बालकांवर डिसेंबर २०१९ अखेर यशस्वीरित्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर नवीन वर्षात १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत १,८६० बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही झाली सरकारी आकडेवारी. खाजगीत माझ्या माहितीतील २ लहान बालके आहेत.
-
त्याच अहवालात अनियमित व असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, मानसिक व शारीरिक तणाव यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईच्या हृदयाचे आरोग्य बिघडू लागले आहे, असा देखील गंभीर इशारा देण्यात आला आहे. याचा तरी विचार करणार ना
-
“प्री-वेडिंग शूट” नावाचा खर्चिक उपहार सध्या लग्नाआधी घेण्याची मॉडर्न परंपरा सुरु झाली आहे. त्याचा बजेट किमान २५,००० पासून लाखापर्यंत असतो. दोन नवदाम्पत्यांना त्यांच्या संसारात नवीन पाहुण्याचे आगमन सुखकर व्हावे म्हणून विमा योजना घेण्याचे सुचविले. पण आता बजेट नाही आणि अजून प्लानिंग पण नाही असे उत्तर मिळाले.
-
इथून पुढे लग्नाच्या रुखवतात दोन्हीकडच्या मंडळींनी याबाबत पाऊल उचलण्यास हरकत नसावी. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विम्यांच्या दाव्यांची वारंवारिता वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वच विमा कंपन्यांनी त्यांच्या हप्त्यांमधे नवीन आर्थिक वर्षात संभावित वाढ करण्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक समृद्धीवर समग्र राष्ट्राची संपन्नता अवलंबून असते.
कारण राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सकल राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी) वाढीसाठी हातभार लावत असते.
परंतु आर्थिक समृद्धी टिकविण्यासाठी “निरामय आरोग्य” ही प्राथमिकता असली पाहिजे.
नवीन वर्षातील २ महिने संपले आहेत. वर्षारंभी केलेले “संकल्प” पुन्हा एकदा पडताळून बघा.
नाहीतर “होळी” आहेच.
– अतुल प्रकाश कोतकर
9423187598
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/