Reading Time: 3 minutes
‘ठग ऑफ हिंदुस्थान’ लोकांना ‘ठग’ बनविण्यात अपयशी ठरला असला तरी आपल्या आजूबाजूला अनेक ठग वावरत असतात ज्यांच्यापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.
‘विमा’ हा गुंतवणुकीचा एक महत्वाचा पर्याय आहे. त्यामुळे करबचत होऊन त्याद्वारे भविष्यासाठीची आर्थिक तरतूदही होते. जवळपास प्रत्येक नागरिक कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विमा खरेदी करत असतो. पण जेव्हा ही आर्थिक तरतूद नुकसानीचे कारण ठरते तेव्हा मात्र ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकते. असाच फसवणुकीचा एक प्रकार घडला आहे एका इंश्युरन्स कंपनीकडून.
- पॉलिसीधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या पाच पॉलिसी बंद करून त्याच्या नावे दोन नवीन पॉलिसी परस्पर उघडून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात त्या इन्शुरन्स कंपनीच्या (पुणे शाखा) मार्केटिंग डिपार्टमेंटच्या चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.
-
- फसवणूक झालेल्या ग्राहकाकडे सिटी बँकेतून काढलेल्या एकूण पाच पॉलिसीज होत्या. यापैकी त्यांच्या स्वतःच्या नावे दोन तर त्यांच्या पत्नीच्या नावे तीन पॉलिसीज होत्या.
- १६ ऑक्टोबर २०१८ रोजी कंपनीच्या पुणे कार्यालयातून एका कर्मचाऱ्याचा फोन आला. त्याद्वारे त्यांना, बँक व सदर लाइफ इन्शुरन्स कंपनीचा कोणताही करार राहिलेला नाही व यापुढे पॉलिसीबाबतचे पूर्व व्यवहार आमच्यामार्फतच केले जातील असे सांगण्यात आले.
- २३ ऑक्टोबर रोजी कंपनीचे पुणे कार्यालयातील ४ मार्केटिंग कर्मचारी हे ग्राहकाकडे आले. आता यापुढे पॉलिसीसंदर्भात सिटी बँकेमार्फत सेवा देण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच पॉलिसीतील फंड व्हॅल्यू अत्यंत कमी झाले आहे त्यामुळे त्याच पॉलिसीअंतर्गत इतर फंडमध्ये स्वीच करून चांगला फायदा करून देऊ, असेही सांगितले.
- त्यावर ग्राहकाने पॉलिसी सरेन्डर करण्यास व नवीन पॉलिसी काढण्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी फंड फक्त स्वीच करू असे सांगत त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या तसेच आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स व स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे दोन धनादेशही व मार्किंगच्या नावाखाली मूळ पॉलिसीदेखील घेतल्या.
- १ नोव्हेंबर रोजी सदर ग्राहक व पत्नीच्या बँक खात्यांत काही पैसे जमा झाले. त्याबाबत शंका आल्याने त्यांनी आरोपीला फोन करून चौकशी केली असता आम्ही जो फंड स्वीच करत आहोत, त्या राउंड फिगर रकमेवर असलेली रक्कम आपल्या खात्यावर जमा झाल्याचे आरोपीने सांगितले.
- दिनांक ६ नोव्हेंबर रोजी एसबीआयकडून ३५ लाख पाच हजार काढण्यासाठी केलेल्या सहीत तफावत आढळल्याचा मेसेज आला. तेव्हा आपण कोणताही व्यवहार केला नसल्याचे ग्राहकाने बँकेला ईमेलद्वारे कळविले.
- यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी संबंधित ग्राहक कंपनीच्या औरंगाबाद येथील कार्यालयामध्ये गेला असता पाचही पॉलिसीज सरेन्डर झाल्याचे व दोन नवीन पॉलिसी कुरिअरने मिळतील असे त्यांना सांगण्यात आले.
- त्यानंतर सदर ग्राहकाकडून आठ नोव्हेंबर रोजी कुरिअर कार्यालयात विचारपूस केली गेली तेव्हा, “पॉलिसीधारक गुजरातला गेले असून पॉलिसीज घरी पाठवू नका, ती घेण्यासाठी आम्ही स्वत: येऊ असं कंपनीच्या कर्मचाऱ्याने फोन करून सांगितल्याचे कुरिअर कर्मचाऱ्याने सांगितले.
- त्यावर मीच स्वतः पॉलिसीधारक असून ते कुरीअर माझेच असल्याचे कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानंतर सदर कुरिअरमध्ये ग्राहकास त्या दोन नव्या पॉलिसी आढळल्या. त्यातील एक त्यांची व दुसरी पत्नीची होती. मात्र पॉलिसीजवर दुसऱ्याचे मोबाइल व ई-मेल आयडी नोंदविण्यात आले होते. तसेच त्यामध्ये कोणतीही वैद्यकीय तपासणी केलेली नसताना ३० ऑक्टोबर रोजी इंदूर येथील एका डॉक्टरांची स्वाक्षरी असलेला वैद्यकीय तपासणी केल्याचा बनवाट अहवालही आढळला.
- सदर ग्राहकाने यासंदर्भात आरोपींना विचारणा केली असता समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे त्यांची आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली व त्यांनी चारही आरोपींच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली आहे.
- १९९० सालानंतर विमा कंपनीचे खाजगीकरण झाल्यावर विमा जगतात खूप मोठी क्रांती झाली. ग्राहकांना विम्याचे महत्व समजावून देण्यात खाजगी कंपन्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे खाजगीकरणामुळे विमा क्षेत्राला सुगीचे दिवस आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
- पण प्रत्येक नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. खाजगी विमा कंपन्यांनी ‘दुरून डोंगर साजरे’ भासणाऱ्या अनेक चकचकीत पॉलिसीज मार्केटमध्ये आणल्या. आकर्षक व्यक्तिमत्व असणाऱ्या ‘टारगेट ओरिएंटेड’ स्मार्ट विमा प्रतिनिधींनी गोड बोलून मोठी मोठी स्वप्न दाखवून आवश्यकता नसणाऱ्या काही पॉलिसीज ग्राहकांच्या गळी उतरवल्या आणि ग्राहकांची अवस्था ‘काय भुललासी वरलिया रंगा’ अशी झाली. पॉलिसीजची कागदपत्रं नीट न वाचता, त्यातल्या छुप्या अटी समजून न घेता, मागचा पुढचा कसलाही विचार न करता ग्राहक अशा पॉलिसी खरेदी करतात आणि क्लेम करताना याच छुप्या अटी नुकसानीचे कारण ठरतात.
- ‘फेक फोन कॉल्स’, ‘मेसेजेस, ‘इमेल्स’, अशा अनेक माध्यमांचा वापर करून ग्राहकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होत असते. अर्थात या फसवणुकीच्या प्रकारांमधून विमा कंपन्यांही सुटलेल्या नाहीत.
- IRDA यासंदर्भात वेळोवेळी कारवाई करत असते तसेच ग्राहकांना सूचनाही देत असते. परंतु फसवणूक करणारे ठग प्रत्येकवेळी नवनवीन युक्त्या लढवून ग्राहकांची फसवणूक करत असतो. सर्वोतपरी काळजी घेऊनही एक छोटीशी चूक होते आणि ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे व्यवहार करताना किती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हे या घटनेवरून लक्षात येते.
(चित्रसौजन्य:https://bit.ly/2FMkqKT )
Share this article on :