Stock Market Investment
Reading Time: 4 minutes

Stock Market Investment

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी (Stock Market Investment) कंपन्यांनी १६ जुलैला संपलेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. 

शेअर बाजारात जे जे नागरिक गुंतवणूक करत आहेत, ते खरोखरच पैसा कमावत आहेत का, याचे हो किंवा नाही, असे उत्तर देता येणार नाही. पण जे शेअर बाजाराचा कल ओळखू शकतात, ते निश्चितपणे पैसा कमावत आहेत आणि जे कल ओळखू शकत नाहीत, ते पैसा गमावत आहेत, हेही तेवढेच स्पष्ट आहे. कोरोनाच्या दोन लाटांनंतर भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, या प्रश्नाचे उत्तरही प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने असेच वेगवेगळे आहे. उदा. ज्या नागरिकांचा रोजगार असंघटीत क्षेत्रात होता किंवा कोरोनाचा अधिक प्रभाव पडला अशा हॉटेल आणि पर्यटनासारख्या क्षेत्रात होता, त्याच्या दृष्टीने देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. पण जे नागरिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणजे आयटी क्षेत्रात कार्यरत होते, त्यांच्या दृष्टीने भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे चालली आहे. अर्थात, ही दोन्ही टोकाची उदाहरणे आहेत. खरे पहाता कोरोनाचा प्रभाव जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून भारतही त्याला अपवाद असू शकत नाही, हे जास्त खरे आहे. 

महत्वाचा लेख: शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

Stock Market Investment: बाजारात नवे विक्रम का होत आहेत? 

  • भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना साथीचा परिणाम होणे, हे अपरिहार्य आहे. पण जेव्हा व्यवहार हळूहळू सुरु होत आहेत, तेव्हा त्यातून जी निर्मिती प्रक्रिया सुरु होईल, तिचा वेग लवकरच वाढेल आणि भारताची ग्रोथस्टोरी पुन्हा पूर्वीसारखी सुरु होईल, असे आर्थिक जगत मानू लागले आहे. 
  • त्यात केवळ भारताच्या आर्थिक जगतातील नागरिक असते तर ते गंभीरपणे घ्यायचे की नाही, अशी मनात शंका येण्यास वाव होता. पण परकीय गुंतवणूकदारही त्यावर विश्वास ठेवताना दिसत असून ते भारतात पैसा ओतत आहेत. 
  • यातील बहुतांश पैसा हा भांडवली बाजार म्हणजे शेअर बाजाराच्या मार्गाने येत असला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 
  • गेली अनेक वर्षे भारतीय शेअर बाजारावर परकीय गुंतवणूकदारांचे वर्चस्व आहे, मात्र कोरोनाच्या गेल्या दीड वर्षांच्या काळात भारतीय नागरिक मोठ्या संख्येने शेअर बाजारात उतरले असून त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. 
  • बाजारातील सध्याचे नवनवे विक्रम हा त्याचा थेट पुरावा आहे. 

लोकसंख्येचा लाभांश 

  • किती भारतीय नागरिक शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक करू लागले आहेत, याचा आकडा माहीत करणे, हे काही फार अवघड नाही. तो आकडा गेल्या दीड वर्षात साधारण दीड कोटींच्या घरात गेला आहे. 
  • हे दीड कोटी आणि आधीचे चार कोटी असे सहा कोटी नागरिक शेअर बाजारात थेट गुंतवणूक करतात, अशी आजची स्थिती आहे. 
  • १३७ कोटींच्या देशात केवळ सहा कोटी नागरिक थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात, हा काही मोठा आकडा म्हणता येणार नाही. पण त्यात गेल्या दीड वर्षात झालेली वाढ अभूतपूर्व अशी आहे.
  • त्यामुळे या व्यवहारांशी संबंधित ज्या कंपन्या आहेत, त्यांच्यात आलेली तेजी विस्मयकारक आहे. भारताची लोकसंख्या जास्त असल्याचे जे काही फायदे आहेत, त्यातील हा एक फायदा म्हटला पाहिजे. 
  • दीड कोटींच्या घरातील नागरिक जेव्हा असे व्यवहार करू लागतात, तेव्हा कंपन्यांचे नफा तर वाढतोच, पण त्यांच्या भविष्यातील वाढीविषयीच्या अपेक्षाही वाढतात, असे यावरून लक्षात येते. 

हे नक्की वाचा: शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

अबब, केवढी ही तेजी ! 

  • १६ जुलैला संपलेल्या आठवड्यात काय झाले, पहा. शेअर बाजारातील व्यवहारांचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांमध्ये सेन्ट्रल डीपॉजिटरी सर्विस लिमिटेड (सीडीएसएल) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसइ) यांचा समावेश होतो. 
  • यातील पहिल्या कंपनीचा भाव पाच दिवसात ३८ टक्के वाढला (१०५२ वरून १४४९ रुपये) तर दुसऱ्या कंपनीचा भाव २२ टक्के वाढला. (९७८ वरून ११९१ रुपये) आता या क्षेत्रातील इतर काही कंपन्यांना झालेला लाभ पाहू. 
  • शेअर बाजारात जशी थेट गुंतवणूक वाढली आहे, तशी ती म्युच्युअल फंडाच्या मार्गानेही वाढली आहे. त्यामुळे या उद्योगाचे व्यवस्थापन करणारी कॉम्पुटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (कॅम) हिचा शेअर पाच दिवसात २० टक्क्यांनी वधारला. (२८८० वरून ३४३४ रुपये) कमोडिटी मार्केटचे व्यवस्थापन करणारी कंपनी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) चा शेअर पाच दिवसांत १५ टक्क्यांनी वाढला. (१५०० वरून १७१७ रुपये) म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ज्या कंपन्या डीमॅट खाते काढून सोयी उपलब्ध करून देतात, त्या ब्रोकिंग कंपन्यांनी या पाच दिवसात मोठी कमाई केली. 
  • त्यातील प्रमुख अशा. एँजेल ब्रोकिंग (३२ टक्के वाढ), जेएम फायनान्सीयल (२० टक्के), आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट (१५ टक्के), मोतीलाल ओसवाल (१४ टक्के) एचडीएफसी असेट मॅनेजमेंट (सहा टक्के) आयसीआयसीआय सेक्युरिटीज (सात टक्के) निप्पोन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट (११ टक्के) एका आठवड्यात अशा काही कंपन्यांचे बाजारमूल्य इतक्या वेगाने वाढले, असा याचा अर्थ आहे. 
  • उदा. सीडीएसएल ही दहा हजार कोटी रुपयांची कंपनी आता १५ हजार कोटी रुपयांची झाली आहे. या सर्व कंपन्या नफा कमावत आहेत, हे तर खरेच आहे. पण त्यांचा भाव इतका वाढावा, इतका काही त्यांना नफा झालेला नाही. पण अधिकाधिक गुंतवणूकदार भविष्यात या मार्गाकडे वळतील आणि त्यांचा नफा यापुढील काळातही वाढतच जाईल, असे गृहीत धरून या कंपन्या तेजीत आल्या आहेत. 

नवा मार्ग – जगासोबत राहण्यासाठी 

  • एवढ्या मोठ्या व्यवहारांचा आणि आपला काही संबंध आहे काय? निश्चितच आहे. पण तो समजून घ्यावा लागेल. 
  • पैसा शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांत जास्त खेळू लागला आहे, असा या व्यवहारांचा थेट अर्थ आहे. त्यामुळे आपले आतापर्यंतचे गुंतवणुकीचे जे मार्ग होते, त्यात आपल्याला काहीतरी बदल करावे लागणार आहेत. 
  • तो बदल असा की त्यात शेअर बाजारातील आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीलाही स्थान द्यावे लागणार आहे. 
  • अर्थात, आपल्याकडे असलेली सर्व पुंजी या गुंतवणुकीत आणण्याची अजिबात गरज नाही. पण हा एवढा मोठा बदल आहे की त्याची आपल्याला दखल घ्यावीच लागणार आहे. 
  • महामार्गावर एखादी रिक्षा जशी बसशी स्पर्धा करू शकत नाही, तसेच गुंतवणुकीचे जुने मार्ग नव्या मार्गाशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत कदाचित आपण या गुंतवणुकीच्या मार्गांपासून फटकून राहिलो असू, पण यापुढे तसे राहता येणार नाही. 
  • अर्थात, ही काही थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची शिफारस नव्हे. पण या बदलाची दखल घेण्याचा आग्रह जरुर आहे. तो बदल म्हणजे म्युच्युअल फंडाच्या मार्गाने या बदलाचा लाभ घेऊन जगासोबत राहण्याचा प्रयत्न करणे होय. 

विशेष लेख: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

शेअर बाजारासंबंधी कंपन्यांची १६ जुलैला संपलेल्या आठवड्यातील विक्रमी तेजी 

कंपनीचे नाव  पाच दिवसांपूर्वी भाव (रुपये) शुक्रवारचा भाव 

(रुपये) 

वाढीची टक्केवारी 
सीडीएसएल १०५२  १४४९ ३८ %
बीएसइ ९७८ ११९१ २२%
कॅम २८८० ३४३४ २०%
एमसीएक्स १५०० १७१७ १५%
एँजेल ब्रोकिंग ९६५ १२७२ ३२%
मोतीलाल ओसवाल ९८६ ११२५ १४%

– यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Stock Market Investment Marathi, Stock Market Investment in Marathi, Stock Market Investment Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…