तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes

विचार करा, तुमच्या अत्यंत महत्वाच्या कामासाठी तुम्ही एखाद्या विक्रेत्याकडे गेला आहात आणि एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट वेळी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे वचन तो तुम्हाला देतो आणि त्याच्यावर विश्वास टाकून तुम्ही निर्धास्त होता. 

परंतु, तो विक्रेता कबुल केलेली अंतिम मुदत पाळू शकत नाही आणि त्या वेळी तुमच्यापर्यंत ती वस्तू पोहचत नाही, चार चौघांमध्ये तुमची मान खाली जाते आणि त्याचा तुम्हाला प्रचंड त्रास होतो. 

हे का झालं? घेतलेले काम मुदतीत पूर्ण न करू शकल्याने विक्रेता ग्राहकांचा विश्वास गमावून बसला. 

आता जागांची अदलाबदल करा. 

तुमच्याकडून कोणाला तरी दिलेली वेळ पाळली गेली नाही, तर? आपण दिलेली अंतिम मुदतीची वेळ ही फक्त तारीख नसते, तर आपण समोरच्या माणसाला दिलेला विश्वास असतो. आणि त्या मुदतीत काम पार पडणे ही आपली जबाबदारी आहे. 

कामाचा व्याप वाढल्याने कधीतरी चुकून वेळ पाळली जात नाही, पण हे सतत होत असेल तर मात्र याच्यावर विचार करायला हवा. आणि व्यवस्थित नियोजन करून आपल्यामध्ये वक्तशीरपणा कसा बाणवता येतील हे बघावे लागेल. 

आपल्या कामाची डेडलाईन पाळून तुमच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांचा म्हणजे तुमचे शिक्षक, बॉस, उच्च अधिकारी, ग्राहक, घरातील लोक यांचा विश्वास जिंका. यासाठी तुम्हला मदत हवी आहे? तर खालील मुद्दे लक्षात घ्या-    

१.  लिखित नोंद- 

 • लिखित स्वरुपात आपले काम आणि ते संपवण्याची अंतिम तारीख नोंदवून ठेवली की गोष्टी सोप्या होतात. 
 • आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवणे जरा धोक्याचेच आहे. कित्येक वेळी काम पूर्ण होणं शक्य असतानाही केवळ अंतिम तारीख लक्षात नसल्या कारणाने गोष्टी चुकतात. 
 • त्यापेक्षा अशी जोखीम नकोच! सर्व गोष्टींची कुठेतरी नोंद करणे आवश्यक आहे.

२.  कामाचे विभाजन- 

 • तुमच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन आपल्याकडे असणारी एकूण कामे वेगवेगळ्या भागात विभाजित करून ठेवा. 
 • यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे दीर्घ मुदत, मध्यम मुदत आणि तत्काळ असे तीन रकाने करा. तुमच्या लक्षात येईल की यापैकी ‘तत्काळ’ मध्ये मोडणाऱ्या गोष्टींची पूर्तता त्याची मुदत जवळ येत असल्याने लवकरात लवकर करावी लागणार आहे. 
 • त्यानंतर मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या गोष्टी संपवाव्या लागणार आहेत. असे नियोजन नेहेमी तयार ठेवा.

३.  कामाचे वाटप- 

 • बहुतेकदा एका प्रोजेक्टवर अनेक लोक काम करतात. त्यामुळे पहिली पायरी म्हणजे कोणी काय काम करावे, हे वाटून घ्यावे. म्हणजे प्रत्येकाला आपली भूमिका स्पष्ट होते आणि कामाची गती वाढते. 
 • ‘मला वाटले तो करेल’/ ‘मला वाटलं ती करेल’ अशी उत्तरं येऊन वेळ वाया जात नाही.

४.  दिनदर्शिका आणि घड्याळ- 

 • वक्तशीर माणसाचे आयुष्य घडाळ्याच्या काट्यांवर आणि दिनदर्शिकेच्या चौकटीनुसार चालते. आपले काम योग्य वेळी पूर्ण व्हावे यासाठी या दिनदर्शिका (Calender) आणि घड्याळ या दोन शिपायांची नेमणूक करा, जे तुमच्या कामाचा मागोवा घेत राहतील. त्यांच्या आज्ञा ऐका आणि वेळेत काम पूर्ण करा.

५.  दोन कामांमध्ये योग्य ते अंतर ठेवावे– 

 • दोन अक्षरामध्ये किंवा पानामध्ये ज्याप्रमाणे अंतर ठेवतो तसे दोन कामांमध्ये योग्य ते अंतर सोडावे. म्हणजे एखाद्या कामामध्ये झालेली चूक सुधारण्यासाठी त्याचा वापर होईल आणि वेळेचे सारेच गणित बिघडणार नाही. 
 • खूपच काटेकोर वेळापत्रक आणि लगतच्या मुदती देऊन आपली पंचाईत होऊ शकते. म्हणून व्यावहारिक विचार करून आणि चूका होऊ शकतात हे गृहीत धरून मुदत द्यावी.

६.  पुनरावलोकन  

 • काही गोष्टी सादर करण्यापूर्वी त्यांची तपासणी आवश्यक असते. तरच ते वेळेवर मार्गस्थ होऊ शकते. उदा. एखादे विमान उड्डाण करण्यापूर्वी त्याची पूर्णपणे चेकलीस्टसह तपासणी केली जाते. 
 • काही कामे योग्य प्रकारे झाली आहेत की नाही हे तपासून घेण्यासाठी जो वेळ हवा असतो तो मुदतीच्या काही काळ आधीचा असला पाहिजे म्हणजे दुरुस्तीची गरज भासल्यास तो वेळ मिळतो आणि ऐन वेळी फजिती होत नाही.

“कल करेसो आज कर, आज करेसो अब” हा मंत्र आजही खरा वाटतो. कोणतेही काम असो, वस्तूचा पुरवठा असो, गृहपाठ असो किंवा कौटुंबिक समारंभाची तयारी, कामाची दिलेली अंतिम मुदतीची वेळ पाळणं महत्वाचं. तरच तुमच्या कामाचे वेगळेपण उठून दिसेल.

कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?

कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)

घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]