कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?

Reading Time: 3 minutes

एका नगरात एक कुशल मूर्तिकार होता, त्याने बनविलेल्या मूर्तीं अतिशय सुबक असत. तो पंचक्रोशीतल्या सर्वच गावात एक उत्तम मूर्तिकार म्हणून प्रसिध्द होता. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक राजेही त्याला कामासाठी पाचारण करायचे. पण त्याच्या कामातील सर्वात मोठा दोष म्हणजे, कामाच्या वेळा पाळण्याच्या बाबतीत अगदी ढिसाळ कारभार. कोणते काम आधी करायचे आहे, हे त्याच्या कधीच लक्षात राहायचे नाही. तो मूर्ती घडवायचा आणि चुकीच्या मूर्ती चुकीच्या लोकांकडे जायच्या. एकदा तो एखाद्या कामात रमला म्हणजे त्याला वेळेचं भान राहायचं नाही. अनेकदा गणेशोत्सवासाठी मागितलेली मूर्ती घटस्थापना झाल्यावर तयार असायची. लोक त्याच्या या वागण्याला वैतागले होते. त्याच गावात अजून एक मूर्तिकार होता. तो या मूर्तिकाराएवढा कुशल नव्हता पण वक्तशीर होता. कोणाचं काम कधी आणि कुठे द्यायचं हे त्याच्या नीट लक्षात असायचं. लोकांनी आपल्या सोयीचा विचार करून या दुसऱ्या मूर्तिकाराकडे जाणंच निवडलं होतं. कुशल मूर्तिकार ना पैसे कमवू शकायचा ना त्याला लोकाच्या अपेक्षा पूर्ण करता यायच्या. दुसरा मात्र आपलं पोट भरायचा आणि लोकांची वाहवा देखील मिळवायचा.

आता विचार करा तुम्ही स्वतःला कोणत्या मूर्तिकाराच्या रुपात पाहता? तुमची कला, मेहनत, कौशल्य, ज्ञान योग्य वेळी योग्य ठिकाणी कमी येत नसेल, तर त्याचा तुम्हाला काय फायदा? 

तुमच्यातहून कमी ज्ञान असणारी एखादी व्यक्ती आपल्या वक्तशीर आणि सुसंघटीतपणे काम करून यशाच्या आकाशात भरारी मारत असेल, तर तुम्हाला ही कंबर कसायलाच हवी ना? 

शाळा, महाविद्यालय, नोकरी, निवृत्ती अगदी घरात असणाऱ्या व्यक्तींनीही स्वतःच्या कामाची आखणी करायला हवी. आतापर्यंत सवय लागली नाही, काही हरकत नाही. आता तुम्ही हे करूच शकता.

तुम्हाला करायचं एकच आहे, आपल्या कामाची यादी बनवायची आहे. कोणत्या कामाला किती वेळ लागू शकतो? किती वेळेच्या आत हे काम व्हायला हवं? कोणते काम अधिक महत्वाचे आहे?अशा प्रश्नाची उत्तरे शोधून आपल्या कामांचा अग्रक्रम ठरवा. आपली प्राधान्य यादी डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास तुमच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. 

कशी तयार कराल प्राधान्य यादी (to do list)?

१. लिखित प्राधान्य यादी– 

  • सर्वात महत्वाच्या कामापासून ते सामान्य कामापर्यंतच्या कामांची, एक प्राधान्य यादी बनवा आणि तुमच्या कामाच्या/अभ्यासाच्या टेबलवर किवा बेडरूममध्ये किंवा तुम्ही जाता येता बघू शकता अशा कोणत्याही जागी चिकटवा. 
  • कामाचा भडीमार तुमच्यावर असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे या कामांचे विभाजन करू शकता. उदा. ‘घर’ आणि ‘ऑफीस’ किंवा ‘आठवडा’, ‘महिना’, ‘वर्ष’ किंवा ‘अभ्यास’, ‘वाचन’, ‘नोकरी’ असे विभाजन करून बघा.  

२. रंगांचा वापर- 

  • यादी लिहिताना यादीतील गोष्टी वेगवेगळ्या रंगांमध्ये लिहा. 
  • उदा. ‘तात्काळ/तातडीने’ करायची कामे निळ्या रंगाने, ‘अत्यंत महत्वाच्या’ कामांना पिवळ्या रंगाने आणि इतर कामे काळ्या रंगाने लिहा. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल कोणते काम आधी करायचे आहे.

३. अंतिम तारीख- 

  • काही कामांसाठीची अंतिम तारीख तुम्हाला माहित असेल, तर ती तारीख तुमच्या कामासमोर लिहून ठेवा. उदा. कर/वीजबिल/घरभाडे भरण्याची शेवटची तारीख.  
  • कामांची डेडलाईन तुम्हाला डोळ्यासमोर दिसत असेल, तर कामं अधिक चपळाईने होतील. समजा नोकरीचे/कॉलेजचे प्रोजेक्ट देण्याची अंतिम तारीख असेल, तर ते काम डेडलाईन पूर्वी होणं आवश्यक आहे. ते न झाल्यास खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अंतिम तारीख डोक्यात ठेवूनच त्याचं नियोजन करणं भाग आहे. 

४. सर्वोत्तम वेळ- 

  • प्रत्येक काम करण्याची स्वतःची एक ठराविक वेळ असते. उदा. समजा तुम्ही गायक असाल, तर रियाजासाठी पहाटेची वेळ सर्वोत्तम असते. 
  • अशी तुमच्या प्रत्येक कामाची वेळ निवडा आणि ती वेळ फक्त त्याच कामासाठी राखून ठेवा. म्हणजे त्या वेळेचा प्रत्येक क्षण कारणी लागेल आणि तुमचे काम वेळेत संपेल.

५. तपासणी वेळ- 

  • आठवड्यातील किंवा महिन्यातील अशी एक तारीख ठरवा ज्या दिवशी तुम्ही काय केले, काय राहीले, कुठले काम नव्याने लिहायचे, कुठले काढून टाकायचे, हे सर्व नव्याने लिहा. 
  • थोडक्यात तुमची यादी अपडेट करा.

मोठमोठे अधिकारी, पंतप्रधान किंवा उच्च पदस्थ व्यक्तींकडे हे काम करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केलेली असते. आपल्या पातळीवर मात्र या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो, जेणेकरून आपले काम ‘चोख’ असल्याचा शिक्का नक्कीच बसेल.

कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)

घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]